बातमी देण्याची घाई आणि माध्यमांमधील ‘ब्रेकिंग न्यूज’ची स्पर्धा यामुळे काल पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांकडून एक किळसवाणा प्रकार घडला. (पुन्हा एकदा म्हणतोय कारण याआधीही असे प्रकार घडले आहेत.) काल प्रसारमाध्यमांनी ‘एमडीएच’ या जगप्रसिद्ध मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या निधनाची बातमी दिली. मात्र काही तास लोटल्यानंतर अनेकांनी ती बातमी मागे घेत ही अफवा असल्याचे वृत्त दिले. महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या परिवाराकडून व्हिडीओ प्रसिद्ध करत निधनाचे वृत्त खोट असल्याचे स्पष्ट करण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांनी ही अफवा असल्याच्या बातम्या चालवल्या. मात्र या सर्व प्रकारानंतर एकदंरीतच केवळ सोशल मडियावर लोकप्रिय असणारा ‘सेलिब्रिटी डेट हॉक्स’चा प्रकार आता प्रसारमाध्यमांनाही वेड्यात काढू लागला आहे हे सिद्ध झाले.

अर्थात प्रसारमाध्यमांनी चालवलेल्या गुलाटी यांच्या मृत्यूच्या बातम्या आणि त्यानंतर या बातम्या अफवा असल्याच्या त्यांनीच चालवलेल्या ब्रेकिंग न्यूज हे वरवर दिसते तेवढी छोटी गोष्ट वाटत असली तरी हे वारंवार घडत आहे. अनेकदा सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या अशा बातम्यांच्या आधारे बातम्या करुन त्या परत घेण्याच्या नव्या ट्रेण्डमुळे प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. ही गोष्ट वेगळी सांगायला नको की आजच्या डिजीटल युगात प्रत्येक प्रसारमाध्यमाला नेटकऱ्यांनी शिक्का मारलेला आहे त्यात असे प्रकार घडत असतील तर नेटकऱ्यांनी विश्वास कोणावर ठेवावा हा मोठा प्रश्न उभा राहतो.

व्हॉट्सअॅपवर प्रसिद्ध व्यक्तींच्या मरणाच्या बातम्या वरचेवर व्हायरल होत असतात. याला ‘सेलिब्रीटी डेथ हॉक्स’ म्हणजेच प्रसिद्ध व्यक्तींच्या मरणाच्या अफवा व्हायरल होणे असं म्हणतात. परदेशात हा ट्रेण्ड काही नवीन नाही मात्र व्हॉट्सअॅपमुळे आणि अती सोशल मिडियाच्या वापरामुळे किंवा प्रसारमाध्यमांचे सोशल मिडियावर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढल्याने हा ट्रेण्ड पुन्हा नव्याने समोर येत आहे. अर्थात या विरुद्ध कोणी तक्रार केल्यास संबंधित व्यक्तीवर किंवा अफवा पसरवणाऱ्या संस्थेवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.  त्यामुळे जर व्हॉट्सअॅप वापरत असाल आणि तुम्ही सुद्धा असे मेसेजेस फॉवर्ड करत असाल तर वेळीच सावध व्हा कारण असे खोटे मेसेजेस पाठवणे कायद्याने गुन्हा आहे. यासाठी तुम्ही दोषी अढळल्यास तुम्हाला तीन वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

या आधी अनेक प्रसिद्ध व्यक्तींसंदर्भात अशा बातम्या व्हायरल झाल्यात. लता मंगेशकर यांचे हद्यविकाराने निधन, इतिहासाच्या शाहिरनभातून एक तारा निखळला बाबासाहेब पुरंदरे यांचे आकस्मीक निधन, शाहरुख खानचे विमान अपघातात निधन, अमेरिकेमध्ये कार अपघातात अमिताभ बच्चन  यांचे निधन अशा अनेक बातम्या तु्म्ही इंटरनेटवर सर्च केल्यावर डेथ हॉक्स प्रकारात सापडतील. बरं ही प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाची यादी खूप मोठी आहे बरं का, मग यामध्ये अगदी दिलीप कुमार यांच्यापासून आयुषमान खुरानापर्यंत अनेक जणांचा समावेश आहे. सांगायचेच झाले तर माधुरी दिक्षित, फरिदा जलाल, शक्ती कपूर, कटरीना कैफ, हनी सिंग, कादर खान या नावांचा समावेश होतो. हे फक्त मनोरंजन श्रेत्राचं झालं बाकी समाजिक, राजकिय आणि क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींच्या नावानेही असे अनेक खोटो मेसेजेस फिरत असतात हे व्हॉट्सअप आणि इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येकाला ठाऊक आहे. अनेकजण मागचा पुढचा विचार न करता, कोणतीही फेरतपासणी न करता थेट हे असले खोटे मेसेजेस फॉरवर्ड करतात आणि पाहता पाहता ज्याच्याबद्दलची बातमी आहे अगदी त्याच्यापर्यंत हे मेसेजेस पोहचतात आणि त्यांना चक्क आम्ही जिवंत असल्याची माहिती जगजाहीर करावी लागते. एमडीएचवाल्या गुलाटी कुटुंबियांना तेच करावे लागले. या आधीही खुद्द लतादिदींना ट्विटरवरुन आपल्याला काहीही झाले नसल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले.

काय आहे हा ट्रेण्ड ?

‘सेलिब्रेटी डेथ हॉक्स’ म्हणजेच एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या मरणाची बातमी डिजीटल मिडीयाच्या माध्यामातून पसरवणे. हॉलिवूडमध्ये अत्तापर्यंत अशाप्रकारच्या अनेक कलाकारांना #RIP म्हणत श्रद्धांजली वाहण्यात आल्या आहेत. भारतामध्येही मागील काही वर्षांपासून खास करुन सोशल मिडियाचा वापर वाढल्यापासून अशाप्रकारचे मेसेजेस फॉर्वड होण्याचे प्रमाण वाढले आहे.  सुरुवातील ईमेल पाठवण्यापासून चालू झालेला हा ट्रेण्ड आज व्हॉट्सअॅपसारख्या अगदी लोकप्रिय आणि इन्सटन्ट प्लॅटफॉर्मवर पोहचल्याने युझर्सने असे मेसेज पाठवताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. बरं आता व्हॉट्सअपच्या पुढे जात हा ट्रेण्ड अगदी प्रसारमाध्यमांनाही भूरळ घालताना दिसत आहे. अगदी अटलबिहारी वाजपेय यांच्या निधनाची बातमी चक्क डीडी सारख्या देशातील कानाकोपऱ्यात पोहचलेल्या वृत्तवाहिनिपासून ते काल एमडीएचच्या मलकांची बातमी चालवणाऱ्या वृत्तवाहिन्यांपर्यंत सर्वांचाच यामध्ये समावेश आहे.

का होतंय असं?

आज अनेक प्रसारमाध्यमांमध्ये एकमेकांहून पुढे राहण्याची स्पर्धा सुरु असते. यामध्ये अगदी ब्रेकिंग न्यूजची स्पर्धा असो किंवा आजच्या डिजीटल युगात सांगाचे तर सर्वात आधी बातमी फ्लॅश करण्याची नोटीफिकेशन सोडण्याची किंवा ट्विट करण्याची. अनेकदा एखाद्या माध्यमातून आलेली माहिती सर्वात आधी देण्याच्या उद्देशाने तपासणी न करता वाचकांपर्यंत पोहचवली जाते. यामध्ये अर्थात माहिती देणारा जितका गुन्हेगार आहे तितकाच मोठा वाटा यामध्ये ही माहिती सर्वाधिक लोकांपर्यंत पोहचवणाऱ्या प्रसारमाध्यमांचाही आहे. याशिवाय सामान्यपणे मला सर्वात आधी माहिती समजली असं समजून मी पहिला या उद्देशाने माहिती फॉरवर्ड करणारे अनेकजण आहेत. एकंदरितच समाजमाध्यमांची सध्याची स्थिती मेंढराच्या कळपांप्रमाणे झाली आहे एक मेंढरु जिकडे जाईल तिकडे कळप चालू लागतो. आणि आता दूर्देव म्हणजे या कळपात प्रसारमाध्यमांचा खास करुन डिजीटल प्रसारमाध्यमांचाही समावेश झाला आहे.

कायदा काय सांगतो?

कायदातील तरतुदीप्रमाणे अशाप्रकारचे आक्षेपार्ह खोटी माहिती पाठणे कायद्याने गुन्हा आहे. अशा मेजेसजमधील माहिती खोटी असल्याने संबंधीत व्यक्तीस त्रास झाला किंवा तिचा अपमान झाला अथवा तिला दुखापत हाईल अशा गुन्हेगारी हेतूने अथवा दहशतवादी कृत्यासाठी शत्रुत्व, द्वेष भावाने किंवा वाईट इच्छेने खोटी माहिती पसरवल्यास अशी माहिती पसरवणा-या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते. अफवा पसरवण्याच्या गुन्ह्यामध्ये दोषी अढळल्यास कलम ५०५ अंतर्गत तीन वर्षे किंवा/आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते.

– स्वप्निल घंगाळे
swapnil.ghangale@loksatta.com