सुनिता कुलकर्णी

मुख्यमंत्र्यांची गाडी, तिच्यामागे इतर अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा आणि तिच्यामागे पाण्याचा टँकर… हा सगळा लवाजमा गरीब वस्तीत जातो आणि तिथल्या लहान मुलांचे अस्ताव्यस्त वाढलेले केस कापतो… किंवा हातात छडी घेऊन कुठल्याही खात्याच्या कार्यालयात शिरणारे आणि जागेवर नसलेल्या, काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पंख्याला लटकवण्याची भाषा करणारे मुख्यमंत्री…

हे वर्णन आहे एकेकाळच्या बिहारच्या मुख्यमंत्र्यांचं, लालू प्रसाद यादव यांचं. एकेकाळी आपल्या अशा अजब कार्यपद्धतीमुळे चर्चेत असलेले लालू सध्या ते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. पण आपला नेता असला म्हणून काय झालं… तो आपला नेताच असतो. तुरुंगाच्या दारात जाऊन त्याच्यापुढे आपलं गाऱ्हाणं मांडलं पाहिजे असं त्यांच्या अनुयायांना वाटतं.

अजब लालूंचे असे अजब अनुययी नुकतेच पहायला मिळाले बिहारमध्ये. राजद नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणी १४ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहे. ही शिक्षा ते सध्या भोगत आहेत. नुकतेच ते चर्चेत आले ते चाईबासा ट्रेजरी प्रकरणात त्यांना झारखंड उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याच्या बातमीमुळे. पण तरीही लालूंचा तुरुंगवास संपणार नाही कारण दुमका कोषागार प्रकरणात त्यांना अजून तरी जामीन मिळालेला नाही.

अर्थात लालू प्रत्यक्ष बिरसा मुंडा तुरुंगात नाहीत तर २०१७ पासून झारखंडच्या राजेंद्र आयुर्विज्ञान संस्थान (रिम्स) मध्ये उपचार (?) घेत आहेत. त्यांच्यावर तीन तीन वर्षे तिथे उपचार करावेत असं त्यांना काय झालंय हा विरोधकांचा प्रश्न बासनात गुंडाळून ठेवण्यात आला आहे हा मुद्दा अलहिदा.

करोना महासाथीमुळे काही दिवसांपूर्वी लालूंना रिम्सच्या रुग्णालयातून हलवून रिम्सच्या संचालकांच्या बंगल्यात ठेवण्यात आलं आहे. ते या बंगल्यात रहात असले तरी तुरुंगवासात आहेत. शिवाय करोनामुळे त्यांना कुणीही भेटू शकत नाही. पण परवा एक अजबच दृश्य पहायला मिळालं.

या महिनाअखेरीला होऊ घातलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक राजद उमेदवारांनी चक्क या रिम्स संचालकांच्या बंगल्याबाहेर हजेरी लावली होती. तिथे त्यांनी काय करावं ? तर आपण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं लालूंना सांगणारी पत्रं त्यांनी लालूंना लिहिली होती आणि आपले हे विनंती अर्ज नेऊन त्यांनी लालूंच्या बंगल्यासमोर ठेवले होते. जनसत्ता या हिंदी वर्तमानपत्राने हे अर्ज ठेवणाऱ्या उमेदवारांचं छायाचित्र प्रसिद्ध केलं आहे.

तुरुंगात असो की सत्तेच्या सिंहासनावर, सतत चर्चेत राहण्याचं कसब लालूंकडे आहे हेच खरं…