संदीप आचार्य

मुंबई महापालिकेवर स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा दावा करतानाच भाजपने एकीकडे ‘मनसे’ला साद घालत पालिकेवर ‘शुद्ध भगवा’ फडकविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीशी युती करणाऱ्या शिवसेनेचा ‘भगवा’ आता फिका झाल्याचा दावा भाजपाने केल्यामुळे आगामी काळात मुंबई महापालिकेची लढाई ‘शुद्ध भगव्या’ची होणार आहे.

पहाटेच्या अंधारात राष्ट्रवादीच्या अजित पवारांशी संधान साधून मिळवलेली सत्ता अवघ्या काही तासात हातातून गेल्यापासून भाजपा अस्वस्थ आहे. शिवसेनेने काँग्रस- राष्ट्रवादी बरोबर सत्तेचा सारीपाट मांडल्यापासून मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी भाजपाने आतापासूनच कंबर कसायला सुरुवात केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकत स्वबळावर सत्ता आणण्याचा निर्धार दोनच दिवसांपूर्वी व्यक्त केला. त्यापाठोपाठ भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह काही नेत्यांनी ‘मनसे’ला साद घालायला सुरुवात केली. मराठी मत आणि राज ठाकरे यांच्या घणाघाती भाषणाच्या जोरावर पालिकेतील शिवसेनेची सद्दी संपवता येतील हा भाजपचा होरा आहे. त्यादृष्टीने गेल्या आठवड्यात भाजप नेते आशिष शेलार यांनी गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’वर जाऊन भेट घेतली होती तर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनीही मनसे बरोबरील ‘युतीचा’ राग आळवला.

भाजपा नेत्यांनी सेनेवर टीका करताना शिवसेनेच्या भगव्याचा रंग आता विटल्याची टीका केली. मुंबईवर हल्ला करणाऱ्या कसाबला बिर्याणी खाऊ घालणारे आणि याकुब मेमनच्या फाशीला विरोध करणार्या काँग्रेसबरोबर शिवसेनेने सत्तेची गाठ बांधली तेव्हाच सेनेचा भगवा फिका झाल्याची टीका आशिष शेलार यांनी केली. सेनेने भगवा आपल्या हातानेच काँग्रेसबरोबर जाऊन उतरविल्याचे शेलार यांनी सांगितले. मुंबई महापालिकेवर पारदर्शक कारभाराची ‘गुढी’ भाजपा उभारेल आणि या गुढीला भगव्याची झालर असेल असेही आशिष शेलार म्हणाले.

शिवसेनेने भाजपच्या ‘शुद्ध भगवा’ फडकविण्याच्या घोषणेवर जोरदार हल्ला चढवत बिहारमध्ये भगवा फडकविण्याची कोणतीही घोषणा भाजपाने केली नसल्याचे सांगितले. भाजपाचा मुळातच भगव्याशी पूर्वी कधी संबंध नव्हता. शिवसेनेशी युती झाल्यापासून भाजपाचा भगव्याशी संबंध आल्याचे शिवसेना खासदार व नेते संजय राऊत यांनी सांगितले. शिवसेनेचा भगवा गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेवर फडकत असून भाजपा रुपी ‘नव्या ईस्ट इंडिया कंपनी’चा ‘युनियन जॅक’ मुंबईकर कधीच स्वीकारणार नाहीत, असेही संजय राऊत म्हणाले. शिवसेनेबरोबर मुंबईकरांची नाळ जुळलेली आहे असे सांगून परिवहनमंत्री अनिल परब म्हणाले मुंबईकरांच्या प्रत्येक बऱ्या वाईट काळात शिवसेनेनेच साथ दिली आहे.

शुद्ध भगव्याची भाषा यांनी करू नये कारण देशभरात यांनी केवळ स्वार्थासाठीच युत्या केल्या आहेत आणि त्या प्रत्येकवेळी भाजपाने आपला झेंडा गुंडाळून ठेवल्याचे अनिल परब म्हणाले. स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपाला आता अचानक ‘मनसे’च्या प्रेमाचा पान्हा का फुटला असा सवाल सेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी विचारला. बिहारमध्ये नितीश कुमारांशी युती असताना चिराग पासवानचा वापर करून नितीश कुमारांच्या जागा पाडण्याच पाप भाजपाने केले. यात चिराग पासवानही संपला. आता अचानक मनसेचे कौतुक भाजपाने सुरु केले असले तरी भाजपाचं कुटील राजकारण सर्वानाच ओळखता येऊ लागले असल्याचे सुनील प्रभू म्हणाले. शिवसेनेच्या भगव्याच्या वाटेला जाऊन भाजपा फक्त पोळून निघेल असा टोलाही त्यांनी लगावला.