News Flash

BLOG : मै था, मै हूँ और मैही रहुंगा!

अंग्रेजी मीडियम हा इरफानचा शेवटचा सिनेमा ठरला

अभिनेता इरफान खान (संग्रहित छायाचित्र)

समीर जावळे

इरफान खान… चेहरा चारचौघांसारखाच… वागणं-बोलणंही… आणि अगदी इंग्रजीही सर्वसामान्य चाहत्याला आपलं वाटावं असं… पण अभिनयाचं विचाराल तर ‘बाप’. खर्जातल्या आवाजानं कानांमध्ये शिरकाव करताच पडद्यावर कोण आहे याची जाणीव करून देणारा कलाकार… कुठेही थिल्लरपणा नाही… ‘सिक्सपॅक्स’ नाहीत… डान्स नाही ना… ‘चॉकलेट बॉयसारखी’ इमेज.. पण अभिनयाच्या जोरावर आपल्या आयुष्याचा सिनेमा सुपरहिट करणाऱ्या इरफाननं आज या जगाच्या ‘बॉक्स ऑफिस’वर ‘एक्झिट’ची पाटी लावली अन् त्याच्या अनेक भूमिका रिल रिवाइंड व्हावी तशा डोळ्यांसमोर तरळल्या…

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अर्थात NSD मधून त्याने अभिनयाचे धडे गिरवले. ‘भारत एक खोज’, ‘चाणक्य’ या मालिकांमध्येही त्याने काम केलं. आठवतंय?? ‘चंद्रकांता’ या दूरदर्शनवर गाजलेल्या सीरियलमध्ये त्याने ब्रदीनाथ ही भूमिका साकारली होती. पंडित जगन्नाथ! अशी खणखणीत हाक मारणारा आणि रमल ज्योतिषी असलेल्या पंडित जगन्नाथाकडून भविष्याचे अंदाज जाणून घेणारा बद्रीनाथ त्याने खुबीने साकारला. त्याचं वेगळेपण ठरलं ते त्याची संवाद फेक करण्याची अनोखी स्टाईल. ‘सलाम बॉम्बे’ या सिनेमातून त्याने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. एखादा रोल इरफान करणार असेल इरफान त्या रोलमध्ये तो इतका मिसळून जाई जशी साखर पाण्यात विरघळते.

इरफानने अनेक सिनेमांधून वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भूमिका केल्या. ‘रोग’ मधला इन्स्पेक्टर उदय राठोड, ‘यूँ होता तो क्या होता?’ मधला सलीम राजपाल, ‘लाइफ इन अ मेट्रो’मधला माँटी, ‘स्लम डॉग मिलेनियर’मधला पोलीस इन्स्पेक्टर, ‘ये साली जिंदगी!’ मधला अरुण, ‘लाइफ ऑफ पाय’ मधली त्याची मोठ्या झालेल्या पायची भूमिका अशी कितीतरी नावं घेता येतील. ‘हिंदी मीडियम’, ‘मदारी’, ‘अंग्रेजी मीडियम’ हे त्याचे अलिकडच्या काळतले चित्रपट ठरले. त्यातला ‘अंग्रेजी मीडियम’ हा सिनेमा शेवटला ठरला. पण दुर्दैव हे की १३ मार्चला हा सिनेमा रिलिज झाला आणि १४ मार्चपासून महाराष्ट्रातली थिएटर्स, मल्टिप्लेक्स बंद झाली. करोनाच्या पार्श्वभूमीवर नंतर लॉकडाउनही जाहीर झाला. त्याचा फटका या सिनेमाला बसलाच. आपल्या लाडक्या मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणारा संवेदनशील बाप त्याने या सिनेमात साकारला. मात्र हा सिनेमा थिएटरमध्ये पाहता आला नाही याची खंत प्रेक्षकांना कायम लागून राहिल.

‘मदारी’ या सिनेमातला निर्मल कुमारही त्याने त्याच ताकदीने साकारला होता. ‘पिकू’मधला राणा चौधरीही आपल्या लक्षात राहतो तो इरफानच्या वेगळ्या शैलीमुळेच. या सिनेमात तर अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण या दोन कलाकारांसारखे दिग्गज होते. तरीही इरफान लक्षात राहिला तो त्याच्या खास अभिनयशैलीमुळे आणि संवादफेकीमुळे..मेघना गुलजारच्या ‘तलवार’ सिनेमातला त्याचा अश्विनी कुमार आठवा. क्लायमॅक्सच्या सीनमध्ये इरफान जी काही लाज काढतो ती लक्षात राहते त्याच्या विशिष्ट शैलीमुळे. हा सिनेमा गाजलेल्या आरुषी हत्याकांडावर आधारीत होता. त्यात काय काय आणि कसं कसं घडलं हे दाखवण्यात आलं होतं. सीबीआयचा अधिकारी अश्विनी कुमार हा ज्या ताकदीने इरफानने रंगवला होता त्याला खरंच तोड नाही. इतकं सगळं असूनही त्याच्या भूमिका कधीही एकसुरी झाल्या नाहीत हे विशेष.

‘मॅकबेथ’ या शेक्सपिअरच्या नाटकावर विशाल भारतद्वाजने मकबूल हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. त्यातली मध्यवर्ती भूमिका इरफानने साकारली होती. यातला डॉन अर्थात अब्बाजी साकारला होता तो पंकज कपूर यांनी. तर त्यांच्या मुलाची अर्थात मकबूलची भूमिका केली होती इरफानने. या सिनेमातला एक प्रसंग आहे. मकबूल बिर्याणी तयार करत असतो. तेव्हा अब्बाजी म्हणतात,”मेरे लख्ते जिगर जिस प्यारसे बिर्यानी बना रहाँ है जी करता है अपना गोश्तभी इसमे मिलाँदू!” या प्रसंगात दोघांचे जे हावभाव आहेत ते पाहून आपण स्तब्ध होतो. पुढे आपल्यासोबत आपला मुलगा काय करणार आहे याचा संकेतच जणू अब्बाजींना कळलेला असतो.

जी गोष्ट मकबूलची तीच २०१४ मध्ये आलेल्या ‘हैदर’ची. हैदर सिनेमा हा शेक्सपिअरच्या हॅम्लेटवर आधारित होता. हॅम्लेटचा धागा घेऊन विशाल भारतद्वाजने या सिनेमाची कथा गोवली होती. या सिनेमात तब्बू, के. के. मेनन, शाहिद कपूर, नरेंद्र झा आणि इरफान यांच्या भूमिका होत्या. शाहिद कपूरचा अभिनय उत्तम झाला आहे. पण नेहमी प्रमाणे लक्षात राहतो तो रुहदार अर्थात इरफान. रुहदार जेव्हा हैदरला भेटतो आणि त्याच्या हरवलेल्या वडिलांबद्दल सांगतो तेव्हांचा प्रसंग असेल किंवा इतर प्रसंग ज्यात रुहदार आहे ते वेगळे ठरतात. एका पायाने थोडासा लंगडत चालणारा, डोळ्यांवर गॉगल, डोक्यावर काश्मिरी टोपी, अंगावर ओढलेली शाल या लुकमध्ये इरफान जो काही वावरला आहे, त्यात कुठेही तो इरफान वाटत नाही. टॉप टू बॉटम रुहदारच वाटतो. “आप मरनेवाले हैं डॉक्टरसाहाब मै नहीं मरनेवाला, वो कैसे जनाब? ऐसे के आप जिस्म हैं मै रुह. आप फानी, मै लाफानी. रुहदार तुम शिया हो या सुन्नी? दरिया भी मैं, दरख्त भी मैं, झेलम भी मैं, चिनारभी मैं, शियाभी हूँ, सुन्नी भी हूँ, मै हूँ पंडित, मै था, मै हूँ और मैही रहुंगा” हा त्याचा हैदर मधला डायलॉग त्यानेच म्हणावा आणि आपण ऐकत रहावं.

पद्मश्री पुरस्कारानेही इरफानला गौरवण्यात आलं होतं. पान सिंग तोमरसाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. स्टार स्क्रिन अवॉर्ड, फिल्मफेअर अवॉर्ड तर असंख्य आहेत. अभिनय कौशल्यावर एखादा माणूस काय जादू घडवू शकतो, ते इरफाननं फक्त हिंदी सिनेसृष्टीतच नाही तर आंतरराष्ट्रीय सिनेसृष्टीतही दाखवून दिलं.

एक होता इरफान असं आता म्हणावं लागतंय कारण कॅन्सरवर मात करुनही तो परत आला होता. colon infection मुळे त्याला मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तो आजारी असला तरीही त्या आजारावर मात करेल असं वाटलं होतं. मात्र यावेळी त्याची झुंज अपयशी ठरली. पण तो प्रेक्षकांच्या मनात कायम जिवंत होता आणि कायमच राहिल…. कारण त्याचे खर्जातले ते शब्द अजूनही तसेच कोरलेले आहेत.. “मै था, मै हूँ और मैही रहुंगा”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2020 3:08 pm

Web Title: special blog on actor irrfan khan and his films scj 81
Next Stories
1 BLOG : डिजिटल व्हायरस पासून सावध राहा
2 कोरोनाच्या काळात बदलेल्या भावना; बस प्रवास एक पर्वणी!!!
3 BLOG: पिणा-या देशाचं ‘आंबट’ सत्य!
Just Now!
X