News Flash

BLOG: असुर… माणसाच्या मनात दडलेल्या राक्षसाची गोष्ट!

आवर्जून पाहावी अशी वेबसीरिज

समीर जावळे

‘कंपनी’ नावाचा एक सिनेमा येऊन गेला त्यातलं मलिक (अजय देवगण) हे पात्र म्हणतं “हर इन्सानके अंदर एक राक्षस होता है.. बस कुछ लोग उसे बाहर निकालनेसे डरते हैं” हा सिनेमा बऱ्याचदा पाहिला, त्यातला हा डायलॉग लक्षात राहिलाय. तो पुन्हा आठवण्याचं कारण म्हणजे नुकतीच पाहिलेली असुर ही वेबसीरिज. असुर-‘Welcome to Your Dark Side’ असं या शीर्षकाखाली लिहिलं आहे. हे वाक्य मनात घर करुन गेलं. त्यामुळेच ही सीरिज पाहिली.. आणि एक भीषण वास्तव अनुभवलं. माणसाच्या मनात दडलेला राक्षस बाहेर आला तर काय होऊ शकतं हे ही सीरिज सांगून जाते. आपण वागतोय ते चांगलं की वाईट, चूक की बरोबर? अशा अनेक प्रश्नांचं द्वंद्व कायम आपल्या मनात सुरु असतं. एखाद्या क्षणी आपण असे का वागलो? एखाद्या क्षणी आपण असे का वागलो नाही? हे आणि असे अनेक प्रश्नही आपल्याला पडतात. असुर ही वेबसीरिज या प्रश्नांची फक्त उत्तरं देत नाही तर आपल्याला चक्रावून सोडते.. विचार करायला भाग पाडते.. अंतर्मुख करते.

असुरची कथा काय?
सीबीआयचं फॉरेन्सिक डिपार्टमेंट त्यांचं काम आणि पुराणकथा यांचा एक अनोखा मेळ या वेबसीरिजमध्ये घालण्यात आला आहे. असुरची सुरुवातच बनारसच्या काठावर सुरु असलेल्या पूजेपासून होते. तिथे पूजा करणाऱ्या पुजाऱ्याचा मुलगा शुभ जोशी आपल्याच वडिलांची हत्या करतो…आपण काहीतरी चुकीचं केलंय काहीतरी वाईट वागलो आहे याचा लवलेशही त्याच्या मनात नसतो, चेहऱ्यावर तर नसतोच नसतो. दुसरीकडे आहेत सीबीआयचे दोन ऑफिसर एक आहे धनंजय राजपूत (अर्शद वारसी) दुसरा आहे निखिल नायर (बरुण सोबती) निखिलने सीबीआय सोडलंय. त्याचं मुख्य कारण आहे धनंजय राजपूत. मात्र काही गोष्टी अशा प्रकारे घडतात की निखिल सीबीआयमध्ये परततो. मग त्याची गाठ अर्थातच धनंजय राजपूतशी पडते. धनंजयला निखिलमुळे तुरुंगातही जावं लागतं. कारण पहिलाच खून झालेला असतो धनंजयच्या पत्नीचा आणि त्याचा आळ धनंजयवर येईल असे सगळे पुरावे समोर असतात.

धनंजय राजपूतला एक पॉडकास्ट ऐकण्याची सवय आहे. हे पॉडकास्ट असतात केसर भारद्वाजचे (गौरव अरोरा)
धर्माचं अत्यंत योग्य पद्धतीने केलेलं विवेचन आणि पृथक्करण यामुळे केसरचे पॉडकास्ट तो कायम ऐकत असतो.सीबीआयच्या फॉरेन्सिक टीमचा प्रमुख असलेला धनंजय तुरुंगात जातो तेव्हा तेव्हा इनचार्ज होते नुसरत सइद.. नुसरतकडे सूत्रं गेल्यानंतर निखिलचं अपहरण होतं. निखिलचं अपहरण करणारा दुसरा तिसरा कुणीही नसून असुरच असतो. हा असुर मग निखिलकडून आणि नंतर धनंजयकडून काय काय आणि कसं कसं करुन घेतो याचा आठ भागांमधला प्रवास म्हणजे असुर ही वेबसीरिज. निखिलकडून काय चुकलेलं असतं? धनंजय राजपूतकडून काय चुका झालेल्या असतात? हे दोघे दहा वर्षांपूर्वी का वेगळे झालेले असतात? असुर हा स्वतःला असुर का समजत असतो? त्याच्यापर्यंत धनंजय राजपूत पोहचतो का? या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला वेबसीरिजमध्ये मिळतात. मात्र मुख्य पगडा राहतो तो धर्मानुसार सांगण्यात आलेल्या असुर या संकल्पनेचा. ती आपण आपल्यातही शोधू लागतो. हेच या वेबसीरिजचं खरं यश आहे असं म्हटलं पाहिजे.

 

 

असुर या वेबसीरिजचे आठ भाग आहेत ‘द डेड कॅन टॉक’, ‘रॅबिट होल’, ‘पी अ बू’ , ‘अॅशेस फ्रॉम द पास्ट’, ‘द डेव्हिल हॅज फेस’, ‘द फायरवॉल’, ‘लेट देअर बी डार्कनेस’, ‘एन्ड इज बिगिनिंग’ असे हे आठ भाग आहेत. प्रत्येक भागात उत्कंठा ताणली जाते. शेवटी धनंजय आणि निखिल पुन्हा एकमेकांसमोर येतात. पण तोवर सगळे संदर्भ बदललेले असतात. या सीरिजचा पुढचा सिझन येणार हेदेखील अधोरेखित होतं. मार्च महिन्यातच ही वेबसीरिज Voot वर लाँच झाली आहे. या सीरिजमध्ये अर्शद वारसी, बरुण सोबती, अनुप्रिया गोयंका, शरिब हाश्मी, अमेय वाघ, पवन चोप्रा, विशेष बन्सल, गौरव अरोरा, रिधी डोग्रा या सगळ्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

अभिनय
अर्शद वारसीने या सीरिजमध्ये धनंजय राजपूत म्हणून वावरताना जान ओतली आहे. विशेष बन्सलने साकारलेला शुभ आणि गौरव अरोराने साकारलेला केसर भारतद्वाजही अप्रतिम झालेत. बरुण सोबतीने निखीलही अत्यंत प्रामाणिकपणे साकाराला आहे. अनुप्रिया गोयंका, रिधी डोग्रा यांच्या भूमिकाही चांगल्या झाल्या आहेत. भाव खाऊन गेला आहे तो रसूल हे पात्र साकारणारा अमेय वाघ. अमेय वाघचा रोल सुरुवातीला खूप खास आहे असं वाटत नाही मात्र एका वळणावर येऊन रसूलचे रुप उलगडतं.. ते अमेय वाघने ज्या ताकदीने साकारलं आहे त्याला जवाब नाही. पुढच्या सिझनमध्येही त्याचा रोल महत्त्वाचा असणार आहे यात काहीच शंका नाही. शरिब हाश्मीचा लोलार्क दुबेही मजा आणतो. एक वेगळ्या प्रकारचा सीबीआय ऑफिसर त्याने साकारला आहे.

 

 

 

दिग्दर्शन

ओनी सेन यांनी असुर ही वेबसीरिज दिग्दर्शित केली आहे. हिंदीतली ही त्यांनी दिग्दर्शित केलेली पहिली वेबसीरिज आहे. मात्र संपूर्ण सीरिज  पाहताना ही ओनी सेन यांची पहिली वेबसीरिज आहे असं मुळीच वाटत नाही. दिग्दर्शनातली प्रगल्भता, प्रत्येक भागानुसार उत्कंठा वाढवण्याचं कसब हे त्यांनी योग्य प्रकारे साधलं आहे. फ्लॅशबॅक आणि सद्यस्थितीतल्या घटनांची माळ गुंफण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. असुर हा असुर का होतो.. आपल्या मनात असुर कसा दडलेला असतो याचा आरसा दाखवण्यात आला आहे.

पुराणकथा

कली आणि कल्की

कली हा असुर चारही युगातला शक्तीशाली असुर आहे. मनुष्याचं रुप धारण करुन तो त्यांच्यात राहात असे आणि लोकांकडून पाप करत असे. त्यानंतर आले धर्म आणि सत्य ज्यांनी कलीला हरवलं. जख्मी झालेला कली त्याच्या किल्ल्यात जाऊन बसला.. आणि वाट पाहू लागला की कलियुगात जेव्हा अंधाराचं साम्राज्य येईल तेव्हा राज्य करण्यासाठी परत जायचं. कली परत आल्यानंतर कल्की अवतार येईल आणि त्याचा खात्मा करेल अशी एक पुराणकथा यामध्ये सांगितली गेली आहे. एक चित्रकार असलेला कलाकार ही कथा त्याच्या नातवाला सांगतो. त्यानंतर काय होतं? हे पाहणंही रोचक झालंय.

देव आणि असुर यांच्या उत्पत्तीची कथा

देव आणि असुर यांच्या उत्पत्तीची विष्णुपुराणातली कथाही यामध्ये सांगितली आहे. सप्तऋषींमध्ये सर्वात महान ऋषी होते ते कश्यप ऋषी. त्यांच्या १३ पत्नी होत्या. त्यापैकी दोन पत्नींची नावं होती आदिती आणि दिती. आदितीपासून झालेली मुलं उत्तम नक्षत्रावर झाली होती. हे पाहून दितीच्या मनात इर्षा निर्माण झाली. तिनेही कश्यप ऋषींकडे पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त केली. ग्रहस्थिती त्यासाठी चांगली नाही असं दितीला ऋषींनी सांगितलं. मात्र दितीने त्यांचं ऐकलं नाही. त्यामुळे दितीची मुलं ही अनिष्ट नक्षत्रांवर जन्मली. काही काळानंतर देव आणि असुरांचं युद्ध झालं. या युद्धात असुरांचा पराभव झाला. आदितीची मुलांना देव म्हणून स्थान मिळालं तर दितीच्या मुलांना असुर म्हणून स्थान मिळालं.

या दोन कथाही अत्यंत रोचक पद्धतीने या वेबसीरिजमध्ये गुंफण्यात आला आहे. या कथांचा असुरशी काय संबंध आहे? हे देखील उलगडतं. केसर भारतद्वाजचा रोल हादेखील महत्त्वाचा आहे. तो आपल्या बोलण्यातून धनंजयला काय सांगू पाहतो. धनंजयचा एक सहकारी केसरवर संशय का घेत असतो. या प्रश्नांची उत्तरंही आपल्याला या सीरिजमध्ये मिळतात. या सीरिजचा शेवट अत्यंत अस्वस्थ आणि अंतर्मुख करणारा आहे. या सीरिजचा दुसरा सिझनही येऊ शकतो.. शेवट करताना दुसरा सिझन येण्यास पूर्ण वाव ठेवला आहे. एका अत्यंत रंजक आणि आरसा दाखवणाऱ्या वळणावर येऊन ही सीरिज संपते. आपल्या आत असलेली आपली काळी बाजू अत्यंत ठळकपणे आपल्याला दिसते. मनातल्या द्वंद्वाचं उत्तर देण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे यात शंका नाही.

sameer.jawale@indianexpress.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 7:52 am

Web Title: special blog on asur web series and about its content direction and story scj 81
Next Stories
1 राहत, ज़माना बड़े शौक़ से सुन रहा था…!
2 BLOG: मिशीवाला रामलल्ला!
3 BLOG : लोकमान्य टिळक पुण्यस्मरण-अवघाचि झाला देह ब्रह्म!
Just Now!
X