29 March 2020

News Flash

BLOG :मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना !

२३ जानेवारीला राज ठाकरे महत्त्वाची घोषणा करु शकतात

धवल कुलकर्णी

“एखादी वॉशिंग पावडर जर चांगली असून सुद्धा चालत नसेल तर तिचं वेगळं ब्रँडिंग करावे लागतं.” हे उद्गार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका नेत्याचे. यावरुनच मनसेत काय चाललं असेल याची कल्पना येते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभी असलेली दिसते. पक्ष आपल्या तिरंगी झेंड्यामध्ये (यात सध्या भगवा, हिरवा आणि निळा रंग यांचा अंतर्भाव आहे), बदल करून एक पूर्णपणे भगव्या रंगाचा झेंडा मनसे आणू शकते. या झेंड्यावर कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा सुद्धा असू शकते.

अर्थात हा बदल फक्त झेंड्यापुरता असणार नाही हे उघड आहे. १९८० च्या दशकात शिवसेनेने अधिकृतरित्या हिंदुत्वाची शाल आपल्या अंगावर घेतली होती. मात्र या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर ही शाल काढून ठेवत सत्तेसाठी काँग्रेससोबत निधर्मीवादाच्या नावाने शपथा घेतल्या. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने हिंदुत्ववादी अवकाश मनसे हा पक्ष भरुन काढू इच्छितो. यामुळे मनसेला भारतीय जनता पक्ष सोबत सुद्धा युती, आघाडी किंवा ॲडजस्टमेंट करायचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

असे केल्यास पक्षाला प्रस्थापित विरोधी म्हणजेच anti-incumbency स्पेस भरून काढता येईल. शिवसेना, विरोधी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष सध्या सत्तेत असल्यामुळे, ही प्रस्थापित विरोधही जागा सध्या फक्त भाजपाच व्यापून आहे हे विशेष. २००९ च्या निवडणुकांमध्ये लक्षणीय यश मिळवलेली मनसे आज मोठ्या प्रमाणावर ढेपाळली सध्या या पक्षाचा विधानसभेत फक्त एकच आमदार आहे.

तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित यांनासुद्धा राजकारणात अधिकृतरित्या लॉन्च करावं असा पक्षातून आग्रह असल्याचे सांगितले जाते. अर्थात यापूर्वी अमित हे पक्षाच्या सभांना, संमेलनांना आणि अगदी मोर्चांना सुद्धा उपस्थित होते. त्यांनी नवी मुंबई मधल्या एका मोर्चाचं नेतृत्व सुद्धा केलं होतं.  मात्र त्यांना अजूनही पक्षामध्ये अधिकृतरीत्या जबाबदारी देण्यात आली नाही. याबाबत सर्व अधिकृत घोषणा जानेवारी २३ रोजी म्हणजे राज ठाकरे यांचे काका आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त घेतल्या जाणाऱ्या सभेत राज करतील अशी अपेक्षा आहे.

पण या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नाही. मनसे हिंदुत्वाचा मुद्दा स्वीकारून कदाचित तात्कालिक फायदा पदरात पाडून घेऊ शकतील पण दीर्घकालीन गणिताचं काय? याचं कारण अस की शिवसेनेने सुद्धा हिंदुत्वाचा विचार आपल्या केल्यानंतर शिवसेनाला सुरुवातीला फायदा झाला. मात्र नंतर मात्र एक मोठा विरोधाभास पक्षाला भेडसावत होता. १९८० आणि ९० च्या दशकात मुंबईमध्ये एक अमुलाग्र बदल सुरू झाला. कधीकाळी गिरण्या आणि इंजिनिअरइंग उद्योगांचा साठी वापरण्यात येणारे जमिनी या घरं बांधणीसाठी आणि इतर कामांसाठी वापरल्या गेल्या. अर्थात त्याआधी हे उद्योग पद्धतशीरपणे आजारी पाडून मोडीत काढण्यात आले हे वेगळं सांगायला नको. परळ, लालबाग भायखळा आणि अशा अनेक मराठी बहुल भागांमध्ये असलेल्या रहिवासी लोकसंख्येमुळे यामुळे मोठ्या प्रमाणात बदल झाला.

फक्त शाकाहारींसाठी असणारी गृहसंकुले उभी राहू लागली. या अशा महागड्या इमारतीमुळे या भागांमध्ये जागांचे भाव तर गगनाला भिडले. पण एकूणच जगण्याचा खर्चही काहीच्या काही महागला. हिंदुत्वाचा एक अर्थ म्हणजे इतर हिंदू समूह म्हणजे हिंदी भाषिक, गुजराती-मारवाडी वगैरे यांच्या दादागिरी कडे दुर्लक्ष करणे. शिवसेना सुद्धा तेच करत राहिली. शिवसेनेचे पाईक असणाऱ्या वर्गामध्ये या सांस्कृतिक, सामाजिक आणि लोकसंख्येच्या आक्रमणाबाबत प्रचंड राग होता पण त्याला वाट मोकळी करून देता येत नव्हती.

पण त्यांना २००९ मध्ये मनसेच्या रूपाने एक पर्याय मिळाला. त्यामुळेच या पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लक्षणीय असे यश मिळाले. ही लाट नंतर मनसे टिकवू शकली नाही हे जरी खरं असलं तरी पण त्यामुळे एकूणच मराठी माणसं मधली खदखद उघड झाली. मनसेने उघडपणे हिंदुत्वाचा स्वीकार केला तर घड्याळाचे काटे उलटे फिरताना दिसू शकतील.

शिवसेनेचा कित्ता गिरवायचा नादात मनसे दुसरी चूक करेल आणि ती म्हणजे हिंदुत्ववादी भूमिका घेऊन समाजातला एक मोठा वर्ग जसे की मुसलमान आणि खास करून मराठी भाषिक मुसलमान आणि बौद्ध दलित यांना आपल्यापासून तोडून टाकेल. कदाचित आक्रमक हिंदुत्वाचा झेंडा घेऊन शिवसेना खऱ्या अर्थाने एक महाराष्ट्रव्यापी प्रांतीय पक्ष म्हणून पुढे येऊ शकली नसावी. हाच शिवसेना आणि दक्षिणेतले प्रांतीय पक्ष जसे की तेलुगु देसम, तेलंगण राष्ट्र समिती, डीएमके आणि अण्णाद्रमुक यांच्यातला  मूलभूत फरक. याच वळलेल्या वाटेवरून मनसे सुद्धा चालू पाहते आहे का? हा खरा प्रश्न आहे.

आज उद्या परवा आम्हाला कधीतरी का होईना बेरजेचे राजकारण करावे लागेल असे एक मनसेचा नेता म्हणाला. कितीही हिंदुत्व म्हटलं तरी आमची भूमिका अशी आहे की आमचा धर्म म्हणजे फक्त महाराष्ट्र धर्म. कुठलाही बदल अचानक केला जाऊ शकत नाही तो हळूच केला जातो. एकेकाळी राज ठाकरे यांनी गुजरातचे तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला होता. हा पाठिंबा जाहीर करायच्या वेळी तशी मागणी मोदी यांच्या स्वतःच्या पक्षातून म्हणजेच भारतीय जनता पक्षातून सुद्धा झाली नव्हती हे विशेष.

आम्ही एकेकाळी मोदींना पाठिंबा दिला होता आणि नंतर यांच्या विरोधात भूमिका घेतली. बुलेट ट्रेन सारख्या मोदींच्या ड्रीम प्रोजेक्ट ना विरोध केला. लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार न देऊन सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी प्रचार करताना नरेंद्र मोदी अमित शहा जोडगोळीच्या विरोधात प्रचाराची राळ उडवली हे जरी खरं असलं तरीपण काळाप्रमाणे आणि गरजेप्रमाणे आम्हाला बदलावे लागेल. शेवटी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुद्धा गरजेपोटी का होईना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करायला आणि सरकार स्थापन करायला निधर्मीवादाचे नावाने आणाभाका द्याव्या लागल्या. एकेकाळी उद्धव ठाकरेंनी सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली होती. भारतीय जनता पक्ष सुद्धा काळानुरूप बदलत आहे. १९६० चा दशकात शिवसेना आणि संघ परिवाराची जी भूमिका होती ती आज आहे का? काही राजकीय पक्षांमध्ये काळानुरूप बदल होतच असतो किंबहुना व्हायला हवा असे या मनसेने नेत्याने आवर्जून सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2020 4:02 pm

Web Title: special blog on mns and raj thackeray dhk 81
Next Stories
1 दिल्लीत आपचा ‘विकास’ जिंकणार की भाजपाचा ‘राष्ट्रवाद’?
2 पोलिओ लसीकरण; महत्त्व आणि गैरसमज
3 Blog: ग्लॅमरकडून गॉसिपकडे….
Just Now!
X