26 January 2020

News Flash

BLOG : मुंबई किनाऱ्याचा लहरी समुद्र – रोहित शर्मा !

विश्वचषक स्पर्धेत रोहित सर्वोत्तम फॉर्ममध्ये

गोष्ट तशी बरीच जुनी आहे…पण महत्वाची आहे. “गांगुली, सचिन आणि मी असे आम्ही टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही… नवीन खेळाडूंना संधी उपलब्ध करून द्या”, अशा काहीतरी आशयाचा इ मेल तेव्हाचा कॅप्टन द्रविडनी BCCI ला पाठवल्याची बातमी सकाळी-सकाळी वाचली होती. ह्या तिघांशिवाय टीम बनूच शकत नाही वगैरे इमोशनल विचार मनात येत होते आणि गेल्या १०-१२ वर्षाच्या क्रिकेटच्या आठवणी मनावर ‘फॉलोऑन’ लादत होत्या. त्याचबरोबर ‘इंडियन क्रिकेट नीड्स तू मूव्ह ऑन’ वगैरे मॅच्युअर विचार ही मनात येत होते (मॅच्युअर विचार इंग्लिशमध्येच कसे काय येतात देव जाणे)… पण अशा विचार येण्यामागे, पहिल्यांदाच होणारा २०-२० ओव्हर्सचा वर्ल्ड कप आणि टीम इंडियाचा नवीन लूक ह्याबद्दल असणारी उत्सुकता कारणीभूत होती…टीम अनाऊन्स झाली! युवी, धोनीवगैरे ओळखीचे होतेच. पण एक नाव वाचलं……रोहित शर्मा फ्रॉम मुंबई!! “मुंबई क्रिकेट? अर्रे एक नंबर? आपल्याला पहिल्यापासूनच मुंबई क्रिकेटसाठी सॉफ्ट कॉर्नर..शितावरून भाताची परीक्षा करण्यात आपली पीएचडी. एका फटक्यात…’रोहित म्हणजे पुढचा सचिन वगैरे वगैरे बोलून मी हवेत गोळीबार करून टाकला होता.

टी-२० वर्ल्ड कप सुरु झाला… माझी अनाउन्समेंट त्याच्यापर्यंत पोचली की काय असं वाटण्याइतकं तो एकदम जबाबदारीने आफ्रिकाविरुद्ध मॅचमध्ये खेळला! पहिल्या काही मॅचेस मध्ये त्याला चान्स मिळाला नव्हता.. पण सेमी फायनलला जाण्यासाठी अशा ‘मस्ट विन’ गेम मध्ये तो खेळला आणि ते सुद्धा एक मॅच्युअर प्लेयरसारखा. टीमला गरज असताना आणि परिस्थितीला अनुरूप असा. ४ आउट ६० अवस्था असताना हा नवखा आला आणि काहीही प्रेशर जाणवू न देता धोनी बरोबर एक अतिशय महत्वाची पार्टनरशिप केली. करियरच्या सुरवातीलाच आपले खांदे मोठठी जबाबदारी उचलण्यासाठीच आहेत हे दाखवून दिलं! आणि सर्वात महत्वाचं होतं – टी २० आहे म्हणून उगाचच हाणामारी न करता शांतपणे पीचचा आदर करून ४० बॉल ५० रन्स केले! ह्या सामन्यानंतर पुढे फायनलसुद्धा खेळला. पहिल्या मॅच मध्ये शांतपणे खेळणारा, पाकिस्तान विरुद्ध मात्र आपल्या भात्यामधले विविध फटके मारत होता आणि पुन्हा एकदा टीमला उपयोगी अशा १५ बॉल ३० रन्स काढून आपण एक परिपक्व खेळाडू आहे हे दाखवून दिलं! ह्या २-२ छोटया पण महत्वपूर्ण इनिंगमुळे धोनीचा काय माझाही रोहितवरचा विश्वास वाढला! त्याची बॅटिंग म्हणजे स्वछ नैसार्गिक गुणवत्तेनी वाहणारी, बघितल्या बघितल्या मन प्रसन्न करणारी नदी आहे असं काहीसं मला वाटून गेलं!

रोहित तसा जन्मानी बनसोडचा म्हणजे नागपूरकर. पण बालपणापासून मुंबईकरच…आणि तसं ही ‘मुंबई क्रिकेटचे’ गूण अंगात भिनण्यासाठी मुंबईत जन्म घेणं महत्वाचं नसत. पण आयुष्यातली पहिली रन किंवा पहिली विकेट ही मुंबईत काढलेली असावी लागते ! मग ती गल्लीमधली असो वा शिवाजी पार्कवर!! घरची परिस्थिती अत्यंत साधारण असलेल्या रोहितच बालपण मात्र गेलं बोरिवलीला, काकाकडे. तिकडेच लागलेली क्रिकेटची गोडी आणि शाळेत कोच म्हणून मिळालेले ‘लाड’ सर अशा २ खांबांच्या आधाराने रोहित नामक खेळाडू घडत गेला. मुंबई क्रिकेटचे संस्कार, साहजिकच आलेला मुंबई क्रिकेट स्पेशल खडूसपणा, अंडर १९ मधली जोरदार कामगिरी ह्या अशा अनेक गोष्टींमुळे नैसर्गिक गुणवत्तेच्या नदीचा आता समुद्र झाला होता आणि त्याच्या उसळणाऱ्या लाटांचा पहिला अनुभव घेतला तो २००५ साली, सेंट्रल झोननी! रोहितच्या बॅटमधून १४२ रन्स निघाल्या होत्या. अर्थातच अससोसिएशन मध्ये त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पुढच्याच वर्षी म्हणजे २००६ ला इंडिया ए आणि रणजी अशा दोन्ही महत्वाच्या स्पर्धांमध्ये (हो,तेव्हा आयपीएल नसल्यामुळे रणजी ला महत्वाचं मानलं जायचं) त्याला संधी मिळाली आणि डेब्यू केला. रणजीच्या पहिल्या काही मॅचेस फेल गेल्यानंतर मात्र त्यानी अचानक चंद्रकलेप्रमाणे गिअर वाढवला आणि गुजरातच्या टीमला ‘रोहित-वादळाचा’ एक भयानक अनुभव दिला, चौफेर टोलेबाजी करत २०० रन्स मारल्या! समुद्राच्या पोटात कसं अफाट गोष्टी लपलेल्या असतात, अगदीच तसं रोहितकडे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे शॉट्स लपलेले असतात, कुठलाही शॉट खेळल्यावर अर्जुनाच्या धनुष्यातून बाण सुटल्यासारखं वाटत. काहीही असलं तरी रोहितकडे बघताना मात्र बॅटिंग मात्र एकदम सोप्पी गोष्ट आहे वाटून जातं.

२००६ मध्ये वन डे आणि २००७ मध्ये टी २० मध्ये पदर्पण केल्यानंतर हे टीम मध्ये चांगलाच स्थिरावला होता, पण CB सिरीज फायनलला सचिनबरोबर केलेली शतकी पार्टनरशिप त्याच्या करियरमधला माईलस्टोन आहे असा मला फार वाटतं! भारतानं ऑस्ट्रेलियामध्ये ट्राय सिरीज जिंकणं फार क्वचित! त्यात टीम अडचणीत असताना ६६ ची छोटी पण अतिशय महत्वपूर्ण अशी इनिंग खेळून त्यानी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवायचं हे आपल्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केलं! त्या पार्टनरशिपमध्ये रोहितची बॅटिंग समोरून बघताना ‘पुढची पिढी तयार झाली आहे, आता बॅट सोडायला आपण मोकळे’ असं सचिनला नक्कीच वाटलं असेल!

करियर मध्ये एका मागोमाग भरती सुरु असताना अचानक ओहोटी लागल्यासारखं झालं. मागून आलेले कोहली आणि रैना हे पुढे गेले. एवढच काय तर २०११ च्या वर्ल्ड कप टीमसाठी सिलेक्शन ही नाही झालं. पण ह्या सगळ्या अपयशानी डगमगेल तो समुद्र कसला…ओहोटीनंतर भरती तर येणारच. काही दिवसांनी इंडियन बॅटिंग लाईन-अप मध्ये ‘ओपनर’ ची जागा रिकामी होती,रोहितने त्वरित ती जबाबदारी उचलली. गेल्या १-२ वर्षातला कोरडा दुष्काळ त्यांनी धुवाधार बॅटिंग नी संपवला. शांत निपचित पडलेला समुद्र खवळला… हरवलेले सगळे शॉट्स बाहेर आले आणि वन डे मध्ये २ डबल सेंच्युरी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात १७१ मग टी २० मध्ये १०० अशा अनेक मोठमोठ्या लाटांनी समोरच्या बॉलरला चोफेर भिजवलं. लाटा कसल्या एक प्रकारची त्सुनामीच होती ती! सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याने झळकावलेली ५ शतकं या त्सुनामीचच द्योतक आहे. मग काही ह्या पठठ्यानी मागं वळून पाहिलं नाही. वन डे असो किंवा टी २० किंवा अगदी आयपीएल असो, रोहित शर्मा हा आपला एक महत्वाचा एक्का बनला. रोहित पाहिजेच!! अर्थातच त्याचा फॅन क्लब वाढला, त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारे फॉलोअर्स वाढले.

पण आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळतेच असं नाही! कधी कधी उशिरा मिळते आणि त्या गोष्टीचं महत्व पटतं! रोहित च्या बाबतीत टेस्ट टीममध्ये असंच व्हावं, क्रिकेट नामक किनाऱ्यावर बसलेल्या सर्वाना रोहितनी गार वाऱ्यासारखं प्रसन्न करावं, उंच उंच लाटांनी ओलं करावं आणि आयुष्याच्या इंनिंगमध्ये कायमचा लक्षात राहणार आनंद द्यावा हीच सिद्धिविनायकाकडे प्राथर्ना!!

First Published on July 7, 2019 11:42 am

Web Title: special blog on rohit sharma cricket career by swagat patankar psd 91
टॅग Rohit Sharma
Next Stories
1 अखेर उपांत्य फेरीचं समीकरण ठरलं, टीम इंडियाची टक्कर ‘या’ संघाशी
2 दक्षिण आफ्रिकेचा ‘शेवट गोड’, ऑस्ट्रेलियावर १० धावांनी केली मात
3 असा घडला बेन स्टोक्स!
Just Now!
X