– मनोज वैद्य
(राजकिय विश्लेषक )

 

विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे काँग्रेसच्या आघाडी सरकार विरोधात किल्ला त्वेषाने लढवत होते. त्यानंतर २०१४ च्या लोकसभेत मोदीलाटेत भाजप व शिवसेनेने महाराष्ट्रात ४८ पैकी ४२ खासदार जिंकून विरोधकांचा सुपडा साफ केला. पण आता मित्र पक्षाचासुध्दा घास घ्यावासा भाजपला वाटू लागले होते. शिवसेनेला नामोहरम करण्याची योजना तयार झाली होती. कमळाबाईला मागील अनेक वर्षाच्या अपमानाचा सूड घ्यायचा होता.

शिवसेनेला जागावाटपात गुंतवत शेवटच्या टप्प्यावर युती तोडण्यात येत असल्याचे जाहीर करायचे होते. पण मांजराच्या (सोयीने वाघ वाचावे) पायात घंटा बांधायची कोणी? हा प्रश्न भाजपपुढे होताच. एकनाथ खडसे यांना पुढे करण्यांत आले. खडसे यांनी देखिल बाहुबलीची भूमिका अंगावर घेतली. त्यांना वाटले भविष्यात मुख्यमंत्री होण्याचे संकेत आहेत. खडसे यांनी शिवसेनेशी असलेली युती तोडत असल्याचे जाहीर केले. शिवसेनेशी ऐतिहासिक शत्रूत्व खडसे यांनी घेतले. फक्त भाजपचा खंदा कार्यकर्ता म्हणून त्यांनी हे भूमिका पार पाडली होती. परंतु शिवसेनेच्या नजरेत मात्र खडसे एकटेच खलनायक ठरले. वास्तविक पहाता तेव्हा देवेंद्र फडणवीस हे सुध्दा राज्यातील भाजपचे अग्रणी होते.

पण आज त्या एकनाथ खडसे यांची काय परिस्थिती आहे. भाजपने त्यांना अगदी ठरवून महाराष्ट्राच्या राजकारणांतून बेदखल करुन टाकले. भाजपसाठी त्यांनी एकाचवेळी सगळ्या विरोधी पक्षांना अंगावर घेतले होते. आज त्यांना त्यांच्याच पक्षाने वाळीत टाकले आहे. यथावकाश युती होऊन सेना सरकारमध्ये सामील झाली , पण खडसे कायमचे बाहेर गेले. शिवसेना-भाजप युतीची २०१९ साठी घोषणा करण्यासंबंधी पत्रकार परिषदचे सभागृह खचाखच भरले आहे. त्या सभागृहमध्ये पहील्या रांगेत भाजपचे खासदार किरीट सोमय्या बसले आहेत. मंचावर शहा-ठाकरे असे नेते येणार आहेत. तितक्यात सोमय्या यांना निरोप येतो, ते जागा सोडून उठतात आणि त्यानंतर ते सभागृहाच्या परिसरातसुध्दा दिसत नाहीत.

किरीट सोमय्या यांनी भाजपसाठी मुंबई महानगरपालिका निवडणूकीचे दरम्यान शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना, तमाम शिवसैनिकांचे तिर्थक्षेञ असलेल्या मातोश्रीवर शाब्दिक आघात केले. त्यामुळे शिवसैनिक दुखावला गेला आहे. त्याला मराठी-गुजराथी अस्मितेची किनारसुध्दा आहे. पण ज्यावेळी युती झाली त्यावेळी मात्र त्यांना पक्षाकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्यांनी भाजपच्या श्रेष्ठींच्या संमतीशिवाय मातोश्रीवर आरोप करण्याची हिम्मत दाखविणे अशक्यच आहे.

येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषास सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे तिथे आघाडीकडून सेनेला भावेल असा योग्य उमेदवार दिला गेल्यास किरीट सोमय्या यांना पराभवाच्या छायेत वावरावे लागेल. पक्षासाठी त्यांनी केलेल्या शत्रूत्वामुळे त्यांची राजकिय कारकिर्द धोक्यात आली आहे. त्यांचे बोलविते धनी मात्र गळ्यात गळे घालून वडे आणि साबूदाण्याच्या खिचडीचे गुणगान करीत आहेत.

तिकडे शिवसेनेचे राज्यमंञी अर्जून खोतकर यांचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात विस्तव जात नाही. दोघांचेही कार्यक्षेत्र एकच ते म्हणजे जालना होय. इथे शिवसेना विरुध्द भाजपमध्ये जुंपली असताना खोतकर विरुध्द दानवे यांच्या वादाला आणखीनच बळ मिळाले. त्यामुळे अर्जून खोतकर यांनी दानवेंच्या खासदारकीला आव्हान द्यायचे ठरविले. शिवसेनेने राष्ट्रीय कार्यकारीणीत ठराव केला की, भाजपशी भविष्यात युती करायची नाही. त्यामुळे शिवसेनेच्या खोतकर यांनी खासदारकीची जोरदार तयारी केली.

नविन पुन्हा झालेल्या युतीच्या वातावरणात उध्दव ठाकरे आता आपल्याच राज्यमंत्री असलेल्या खोतकरांना भेटायला वेळ देत नाहीत, त्यामुळे या हाडाच्या शिवसैनिकाला आपली भूमिका आदित्य ठाकरे यांना एका कार्यक्रमाच्या दरम्यान रस्त्यावर सांगावी लागली. अर्जून खोतकर आता कोणत्या तोंडाने भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्यासाठी मते मागतील हा एक मोठा प्रश्नच आहे. कारण खोतकर व दानवे एकमेकांच्या विरोधात जाहीर भूमिका घेत होते. आता उध्दव ठाकरे जसे मोदींना पहारेकरी चोर आहे असे म्हणून पुन्हा चोराची पाठराखण करीत आहेत, तशी प्रत्येक कट्टर शिवसैनिकाला जमेलच असे नाही.

अशा पध्दतीने पालघरला भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या राजेंद्र गावीत यांना आपल्या खांद्यावर घेतले.तर भाजपची ज्याने त्या भागात बांधणी केली त्या दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या मुलाला शिवसेनेने उमेदवारी दिली. अशा विचित्र परिस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालघरची जागा राखण्याची कामगिरी केली होती. पण युतीच्या वाटपांत ती जागा शिवसेनेला आंदण देण्यांत आली आहे.पालघरमध्ये भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करताना त्यांची मानसिकता काय असेल?

भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांना शिवसैनिकांचा तीव्र विरोध आहे. कारण भिवंडी लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे प्राबल्य त्यांचे पदाधिकारी आकडेवारीसहीत पटवून देत आहेत. त्यामूळे त्यांना आता भिवडी मतदारसंघ शिवसेनेकडे पाहीजे आहे. अशा पध्दतीने प्रत्येक शहरांत व गांवात कार्यकर्त्यांची कुचंबणा झाली आहे. नेत्यांनी जरी युती केली असली तरी, त्या मानसिकतेमध्ये दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाहीत. निवडणूकींना फक्त चाळीस दिवस उरले आहेत.त्यामध्ये साडेचार वर्षाची जखम भरुन येणे हे दोन्हीही पक्षांच्या नेत्यांपुढे मोठे आव्हान आहे .

सध्याच्या परिस्थितीत भाजपचे कार्यकर्ते मोदींना पंतप्रधान करायचे आहे म्हणून कमीपणा घेतील. त्यासाठी ते शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील. पण शिवसैनिक असे भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे प्रयत्न करतीलच याची शाश्वती देता येणार नाही. त्यामुळे पक्षाची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मध्यस्थाची भूमिका पार पाडणारा कार्यकर्ता पक्षाच्या पिंजऱ्यात अडकलेला असतो. तो नेत्याच्या मानसिक गुलामगिरीत असतो, हे जरी मान्य केले तरी यांवेळी त्याची चडफड मात्र लक्षात घेण्यासारखी आहे. यावेळची चलबिचल वेगळीच आहे.

पक्ष कार्यकर्त्यांनासुध्दा प्रश्न पडत आहेत. समाजमाध्यमावरुन त्याला वास्तविक परिस्थिती कळत आहे.त्याच्या मनातल्या शंकाना वेगवेगळ्या माध्यमातून उत्तरे मिळत आहेत. त्याच्या नेत्यांचे व विरोधकांचे भाषणाच्या कालच्या चित्रफिती व आज बदललेली भाषा त्याच्या लक्षात येऊ लागली आहे. तोसुध्दा आता व्यक्त होऊ लागला आहे. येणाऱ्या काळात पक्षनेते आपल्या कार्यकर्त्यांना व मतदारांना त्यांचे वेठबिगार म्हणून मतदान करु शकेल का  हे येणाऱ्या निवडणूकीत दिसून येईल.तंत्रज्ञान युगामुळे प्रत्येक पक्षाचे मतदार क्षणाक्षणाला नविन माहीती मिळवून स्वतःला अपडेट् करतोय की खोट्या पोस्टला बळी पडतोय हे या निवडणूकीत सिध्द होईल.

पक्षांनी लावलेल्या पिंजऱ्यात अडकलेला कार्यकर्ता नेत्याने शिकविलेली पोपटपंची करतो की, त्याला जे सत्य दिसतेय ते बोलून नेत्याचा खोटेपणा उघड करणार आहे. सरतेशेवटी किती दिवस तो स्वतःची फसवणूक करुन पक्षाच्या पिंजऱ्यात अडकून राहील. त्यालासुध्दा कळले पाहीजे, पिंजरे पशू-पक्षांसाठी असतात, तो तर एक बुध्दीमान परिपूर्ण माणूस आहे.त्याने पक्षाच्या पिंजऱ्यात का बंदी राहायचं ?