Blog : बाईपणामुळे हरवलेलं पुरुषपण… विराटच्या राजीनाम्याच्या निमित्ताने

मनातल्या भावना पुरुषाने मनातच दाबून ठेवाव्यात असे संस्कार घडवणाऱ्या आपल्या समाजाला एका पुरुषाने आपल्यावरच्या ताणाबद्दल बोलून दाखवणं हे खरंच नवीन आहे.

– वैष्णवी कारंजकर (vaishnavi.karanjkar@loksatta.com)

 

“कठीण कठीण कठीण किती…पुरूष हृदय बाई”, “मर्द को कभी दर्द नही होता”, “काय रे, काय मुलींसारखं रडतोयस”, “मर्द बन मर्द, नको घाबरु भीड बिनधास्त”….चित्रपटांपासून घरोघरी आपल्याला ही वाक्यं कायमच ऐकू येतात. पण कधी विचार केला आहे का की, खरंच मर्द को दर्द होता है क्या? की खरंच पुरुष हृदय कठीणच असतं? या प्रश्नांचा उहापोह करण्याची गरज आत्ता वाटते याचं कारण म्हणजे भारतीयांचा सर्वात लाडका क्रिकेटर, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली.

नुकतंच कोहली याने आपलं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी लिहिलेल्या पत्रामध्ये विराटने आपल्यावर असलेल्या ताणाचा उल्लेखही केला आहे. मनातल्या भावना पुरुषाने मनातच दाबून ठेवाव्यात असे संस्कार घडवणाऱ्या आपल्या समाजाला एका पुरुषाने आपल्यावरच्या ताणाबद्दल बोलून दाखवणं हे खरंच नवीन आहे. यापूर्वीही विराट कोहलीने पितृत्व रजा घेऊन आपल्यातल्या संवेदनशील पुरुषाचं दर्शन घडवलं होतं. याहीवेळी आपल्यावरच्या ताणाबद्दल जाहीरपणे बोलून त्याने पुन्हा एकदा पुरुषपण जपण्याची गरज दाखवून दिली आहे.

भावना ही माणसाला मिळालेली एक अमूल्य देणगी आहे. ती व्यक्त करण्याचा हक्क स्त्री- पुरुष दोघांनाही आहे. मग पुरुषांवर आपल्या भावना दाबून ठेवण्याचे संस्कार का केले जातात? त्याने रडणं म्हणजे बायकी का समजलं जातं? मर्द को दर्द क्यों नही होता? या सगळ्याचा विचार समाजाने करणं गरजेचं आहे. जेव्हा एखादं आपलं माणूस जातं, तेव्हा बाई अगदी धाय मोकलून रडत असते पण पुरुषाने मात्र खंबीर राहून आपली जबाबदारी, कर्तव्य पार पाडायचं असतं. अंत्यसंस्काराला स्मशानात बाईने जायचं नाही, का तर ती भावनिक होते, रडू लागते, तिला दुःख होतं. म्हणून बाईने न जाता फक्त पुरुषांनी जायचं. का? पुरुषांना दुःख होत नाही, त्यांना रडू वाटत नाही? वाटत असेलच ना…पण ‘मर्द को दर्द नही होता’ या समाजाच्या प्रकृतीने किंबहुना विकृतीने पुरुषांचं हृदय कठीण असल्याचा बनाव केला आहे.

चारचौघात पुरुष रडू शकत नाही, आनंदाश्रू आले तरी तो बायल्या ठरतो. भावना व्यक्त करण्याचा जेवढा हक्क स्त्रीला आहे, तेवढा पुरुषाला नाही का? स्त्रीपुरुष समानतेबद्दल मोठ्या मोठ्या बाता मारणारा आपला समाज पुरुषाला कायमच डावलून केवळ बाईचाच विचार करत आला आहे. पुरुषाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार मिळायला हवा यासाठी कोणतीही स्त्रीपुरुष समानतेचा पुरस्कार करणारी चळवळ पुढे का येत नाही? बायकांसाठीच्या ‘राईट टू पी’ सारखी पुरुषांसाठी ‘राईट टू क्राय’ चळवळ का असू नये? स्त्रियांवरच्या बलात्काराला वाचा फोडण्यासाठी लाखो-करोडो लोक जमतात. जशी निदर्शनं, विचारविमर्श, चर्चा, वादविवाद स्त्रीयांवरचे शारीरिकबलात्कार थांबवण्यासाठी होतात, तसं पुरुषांवर होणाऱ्या मानसिक बलात्काराचं काय? ते थांबवण्यासाठी आहेत का काही उपाय? की अजून शतकानुशतके पुरुषाने कठीण हृदयाचंच बनून राहायचं. मुलीच्या जन्मानंतर मुलीला छातीशी धरुन बायकोच्या मागे चालणाऱ्या विराट कोहलीला अनेकांनी बायकोचा बैल म्हणून हिणवलं. का? आईला जसं आपल्या लेकराला छातीशी धरुन आपली माया व्यक्त करायची असते, तशी बापाला करु वाटली तर त्यात गैर काय? एक बाप म्हणून घेतली त्याने पितृत्व रजा, तर काय बिघडलं?

पुरुषप्रधान संस्थेला धक्का पोहोचेल म्हणून घाबणाऱ्यांनीच ‘मर्द को कभी दर्द नही होता’ या संस्कृतीला जन्माला घातलं आहे. स्त्रीला दाबून ठेवण्याच्या नादात या पुरुषप्रधान संस्कृतीच्या रक्षकांनी पुरुषांनाही कधी दाबून टाकलं हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही. बाईला जशी घरची काळजी, लेकराबाळांबद्दल माया, वडीलधाऱ्यांबद्दल आदर असतो, तसाच तो पुरुषालाही असतो. बाई रडून, बोलून, हसून, आपल्या कृतीतून तो व्यक्त करत राहते, तसा पुरुषाला व्यक्त करता येत नाही. पण तेच त्याचं खंबीरपण, मर्दपणा समजला जातो. खरंतर व्यक्त न होणं हे शारीरिक दिव्यांगत्वापेक्षाही मोठं आहे. मग आपणच आपल्यातल्या मर्दाला असं मानसिक दिव्यांग का करावं?

बाई आणि पुरुष ही समाजाची दोन चाकं आहेत, ही फिलॉसॉफी खरंतर मला आता भंगारात काढावी वाटते. बाई आणि पुरुष हे शारिरीकरित्या फक्त वेगळे असतात, मात्र भावनिकरित्या दोघंही सारखेच. ह्या दोन चाकांच्या फिलॉसॉफीच्या आवरणाखाली आपण बाई आणि पुरुषाला एवढं वेगळं केलं की त्याचा व्यक्त होण्याचा अधिकारही काढून घेतला आणि जन्माला आल्यापासूनच त्याच्यावर रडायचं नाही, असे संस्कार करणं सुरू केलं. जसं बाईकडे माणूस म्हणून बघायचं आपण विसरुन गेलो आहोत, तसंच पुरुषांकडेही आपण माणूस म्हणून बघणं सोडून दिलं आहे, असं वाटत नाही का?

या लेखात प्रश्नच खूप आहेत. हे प्रश्न आपल्यातल्या बाईला आणि पुरुषाला आहेत. कारण प्रत्येकाच्यात एक बाई आणि एक पुरुष असतोच. बाई आणि पुरुष ही समाजाची दोन चाकं नसून बाई आणि पुरुष हाच समाज आहे. दोघेही वेगळे नाहीत, दोघांच्याही भावनिक गरजा सारख्याच आहेत. आणि समाज बाई किंवा पुरुष चालवत नाही तर माणूस चालवतो. त्यामुळे बाईने आपल्यातल्या पुरुषाला आणि पुरुषाने आपल्यातल्या बाईला जिवंत ठेवायला हवं तरच माणसांतलं माणूसपण टिकून राहील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Blog virat kohli declares resignation from captaincy because of work stress emotions of men vsk