History of Wajid Ali Shah: ही गोष्ट अवधच्या मिर्झा वाजिद अली शाहची आहे. मिर्झा वाजिद अली शाह हा अवधचा अकरावा आणि शेवटचा नवाब होता, त्याने १३ फेब्रुवारी १८४७ ते ११ फेब्रुवारी १८५६ पर्यंत ९ वर्षे नवाब म्हणून पद सांभाळले. वाजिद अली शाह हा इतिहासात व्यभिचारी म्हणून कुप्रसिद्ध आहे. गायन, नृत्य या ललित कलांच्या नावाखाली त्याच्या जनानखान्यात सुमारे तीनशे स्त्रिया होत्या. त्याही त्याला कमीच वाटत होत्या आणि त्यात आणखी भर पडावी अशी त्याची इच्छा होती. त्याच्या याच विक्षिप्तपणाचे वर्णन ए.के.गांधी यांच्या डान्स टु फ्रीडम: फ्रॉम घुंगरू टु गन पावडर या पुस्तकात केले आहे.
अधिक वाचा: स्वतःच्या मुलींच्या कौमार्याचा बाजार मांडणारं हीरामंडीचं भयाण वास्तव; कलंकित इतिहास काय सांगतो?
आईच्या भेटीदरम्यान..
एके दिवशी, राजकीय कामानिमित्त तो आपल्या आईला भेटायला गेला. भेटीदरम्यान, आईच्या महालात त्याला एक तरुण दासी दिसली. दासी सुंदर होती. तिच्या गालावरील खळीमुळे ती अधिक उठून दिसत होती. त्यामुळे क्षणार्धात वाजिद अली शाह तिच्यावर भाळला. त्याची अतृप्त वासना जागृत झाली. तो कशासाठी इथे आला होता हे विसरून त्याने आपल्या आईला, “मला ती माझ्या हरममध्ये हवी आहे” अशी विनंती केली. या मागणीवर ‘नाही, अजिबात नाही तू प्रशासनाकडे लक्ष देत नाहीस. प्रजेसाठी काहीच करत नाहीस’ असे उत्तर त्याच्या आईने दिले. त्यावर नवाब म्हणाला, मी तिच्या शिवाय जगू शकत नाही. तरीही त्याच्या आईवर काहीही परिणाम झाला नाही. परंतु त्याने हट्ट सोडला नाही. त्याला काहीही करून ती हवी होती. असे अनेक दिवस गेले तरीही तो हट्ट सोडत नाही म्हटल्यावर त्याची आई त्याला म्हणाली तिच्या शरीरावर अशुभ चिन्ह आहेत. तिच्या पाठीवर सापासारखी काळी वेणी आहे. ती अशुभ आहे. त्या वेणीमुळे तुला त्रास होऊ शकतो…
काळया वेणीमुळे दुर्दैव येते का?, असा प्रश्न नवाबाने केला. या त्याच्या प्रश्नावर त्याची आई थट्टेने म्हणाली, हो, नक्कीच !
दुर्दैवाची छाया..
हे ऐकून नवाब खोल विचारात बुडाला. त्याला चिंता वाटू लागली. आपल्या हरममध्ये अशा प्रकारची वेणी असणाऱ्या इतर स्त्रिया ही आहेत. त्यांच्यामुळे आपल्यावर दुर्दैव ओढवू शकते. यावर तोडगा काढला पाहिजे. म्हणून तो ताबडतोब आपल्या राजवाड्यात परतला आणि बशीर-उद-दौला नावाच्या मुख्य किन्नराला (Eunuch), मुख्य बेगम सोडून इतर सर्व स्त्रियांची तपासणी करण्याचा आदेश दिला. बशीर-उद-दौला चतुर होता. त्याने या प्रकारात पैसे कमावण्याची संधी पाहिली. त्याला हे ठाऊक होते की, कोणती बेगम पैसे देऊ शकते आणि कोणती नाही. नवाबाचा हा वेडसर निर्णय ज्यावेळी बेगमांना समजला त्यावेळी त्या घाबरल्या. अनेकींना लांब काळ्याभोर वेण्या घालण्याची सवय होती. त्यातील अनेकींनी बशीर-उद-दौला याने आपले तोंड बंद ठेवावे यासाठी त्याला हवे तितके पैसे दिले. तर ज्या स्त्रियांनी याला विरोध केला, त्यांना मात्र जाणीवपूर्वक नवाबाच्या समोर आणले गेले.
अधिक वाचा: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
आठ बेगमा अशुभ..
आठ बेगमांना अशुभ म्हणून नवाबाच्या समोर आणले. या आठही बेगमांना नवाबाने जागीच तलाक दिला. त्यात त्याची लाडकी बेगम हजरत महल देखील होती. या सर्व स्त्रियांना कैसरबाग राजवाड्यातून हाकलून देण्यात आले. त्यांना चौलखी कोठीत राहण्यासाठी जागा देण्यात आली. ही त्यांच्यावर नवाबाची झालेली कृपाच म्हणावी लागेल. नवाबाला आपल्या कोणत्याही पत्नीशी विभक्त होण्याची इच्छा नव्हती, तो निराश पण असहाय होता. त्याला हजरत महलची विशेष आठवण येत होती, कारण तिच्या सहवासात सर्वात तो सर्वात जास्त आनंदी होता. राज्य आणि प्रशासनासह जीवनाच्या विविध पैलूंवरील तिच्या व्यावहारिक विचारांचा त्याच्यावर पगडा होता.
नामी युक्ती..
ज्या बेगमांनी किन्नराला लाच दिली होती, त्यांना भीती होती की तो त्यांचे आणखी शोषण करेल. तर दुसऱ्या बाजूला नवाबाला हजरत महलपासून वेगळे होणे काहीसे अवघड असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. म्हणून, त्यांनी एकत्रितपणे एक नामी युक्ती लढवली. नवाबाला पटवून दिले की, हिंदू पुरोहित अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी उपाय सांगू शकतात. आणि नवाबाला नेमके हेच हवे होते. हिंदू पुरोहितांना त्वरीत बोलावण्यात आले. पुरोहितांनी अनेक धार्मिक ग्रंथ संदर्भासाठी चाळले. ग्रह ताऱ्यांची दिशा-स्थिती बघितली आणि उपाय सांगितला. सोन्याचा साप अग्नीत अर्पण केल्यास वेणीचे वाईट परिणाम दूर होतील, असे नबाबाला सांगण्यात आले.
हजरत महलचा नकार..
हिंदू पुरोहितांनी सांगितलेल्या उपायांची तत्परतेने अंमलबजावणी करण्यात आली आणि यावर समाधानी होऊन नवाबाने स्वत: बहिष्कृत केलेल्या आठ बेगमांना कैसरबाग राजवाड्यात परत येण्याचे आमंत्रण दिले. विशेष म्हणजे त्यातील फक्त दोनच स्त्रिया परत आल्या. हजरत महलसह इतरांनी नवाबाचे आमंत्रण नाकारले, त्या दुखावल्या गेल्या होत्या. हजरत महल आपल्या तरुण मुलासह चौलखी कोठीत राहिली. नवाबाने तिच्या निर्णयाचा आदर केला आणि तिला परत येण्यास भाग पाडण्याऐवजी तो स्वतः तिला भेटायला जायचा.
अधिक वाचा: दख्खनमधील ‘या’ गुलामाने केला होता मुघलांचा पराभव; का महत्त्वाचा आहे त्याचा इतिहास?
नवाबाचा विक्षिप्तपणा..
नवाबाचा विक्षिप्तपणा इथेच थांबला नाही. एकदा त्याने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना भगव्या रंगाच्या कपड्यांमध्ये तीन दिवस चालणाऱ्या उत्सवात सामील होण्याचे आदेश दिले. हे फक्त ते एकत्र कसे दिसतात हे पाहण्यासाठी त्याने केले होते.
नबाबाचे पर्व संपले..
एकूणच नवाब उत्सवात, कविता रचण्यात आणि ठुमरी गाण्यात व्यग्र असायचा. त्यामुळे संपूर्ण अवधला कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनेक प्रश्नांचा सामना करावा लागला. लोक संताप आणि असंतोषाने त्रस्त झाले होते आणि नवीन घडामोडी वेगाने घडत असल्याने, भविष्यात फार दूर नसलेल्या अधिक कठीण काळ पाहण्याचे त्यांच्या नशिबी आले. शेवटी १८५६ साली ब्रिटिशांनी नवाबाच्या हलगर्जीपणामुळे हे संस्थान हस्तगत केले आणि नबाबाचे पर्व संपले.