scorecardresearch

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ‘प्रचारकी’ असेल, तर मग इस्रायलच्या बहुचर्चित ‘फौदा’ या वेबसीरिजला काय म्हणावं?

जर हा चित्रपट प्रचारकी आहे तर मग ऑस्कर विजेता ‘शिंडलर्स लिस्ट’ किंवा ‘द पियानिस्ट’ बद्दल काय म्हणावं

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ‘प्रचारकी’ असेल, तर मग इस्रायलच्या बहुचर्चित ‘फौदा’ या वेबसीरिजला काय म्हणावं?
IFFI मध्ये 'द काश्मीर फाइल्स'मुळे निर्माण झालेला वाद (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शेवट एका वेगळ्याच वळणावर झाला. ज्युरी प्रमुख आणि इस्रायली चित्रपटनिर्माते नदाव लॅपिड यांनी मनोगत व्यक्त करताना दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर निशाण साधला. त्यांच्या मते हा एक ‘प्रोपगंडा’ आणि ‘वल्गर’ चित्रपट आहे. हे त्यांनी तिथल्या मंचावर उघडपणे बोलून दाखवलं आणि वादाला तोंड फुटलं. आधीच वादातीत असलेल्या या चित्रपटावर केलेल्या टिप्पणीमुळे दोन्ही बाजूकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या. या चित्रपटाचा सुरुवातीपासून विरोध करणाऱ्या लोकांनी ज्युरी यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं तर या चित्रपटाला डोक्यावर घेणाऱ्या काही लोकांनी या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. मनोरंजनसृष्टीतील काही लोकांनी याबद्दल खेद व्यक्त केला. वास्तविक पाहता या गोष्टी बाजूला ठेवल्या तर ‘द काश्मीर फाईल्स’ हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. ही गोष्ट नाकारून चालणार नाही.

या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यानही प्रचंड वाद झाले, पण तरी लोकांनी हा चित्रपट उचलून धरला कारण यात काश्मिरमध्ये झालेल्या नरसंहारावर उघडपणे बाजू घेऊन भाष्य करण्यात आलं होतं. काश्मिरमध्ये नरसंहार कधी झालाच नाही असे विचार मांडणारी लोकंसुद्धा आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. या वादात न पडता इस्रायलच्या निर्मात्याने केलेलं हे वक्तव्य आणि त्यांच्याकडे बनणाऱ्या कलाकृतीवर आपण प्रकाश टाकायचा प्रयत्न करुयात.

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक इस्रायली वेबसीरिज प्रचंड गाजली, तीचं नाव आहे ‘फौदा’. या वेबसीरिजचा लवकरच चौथा सीझन येणार असून या सीरिजच्या निर्मात्यांनीही गोव्यातील चित्रपट महोत्सवात हजेरी लावली होती, एवढंच नाही तर त्यांच्या या सीरिजचं सादरीकरणही या सोहळ्यात पार पडलं. इस्रायली डिफेन्स फोर्समधील एक ‘अँटी टेररिस्ट युनिट’ आणि एकंदरच इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील वाद, या वादातून जन्म घेणाऱ्या वेगवेगळ्या आतंकवादी संघटना आणि त्यांच्या कारवाया या सीरिजमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. यांच्याशी दोन हात करून जीव मुठीत घेऊन लढणारे ‘अँटी टेररिस्ट युनिट’मधल्या अधिकाऱ्यांभोवती या सीरिजचं कथानक लिहिण्यात आलं आहे. आतंकवादाचा खरा चेहरा, ही विकृत मनोवृत्ती कुठलाही आडमुठेपणा न ठेवता अगदी स्पष्टपणे यात मांडण्यात आली आहे.

या वेबसीरिजला इस्लामिक घृणेने भरलेली वेबसीरिज म्हणत काही लोकांनी हिणवलंसुद्धा, तरी या वेबसीरिजचा प्रेक्षकांनी खुल्या मनाने स्वीकार केला. मग हीच गोष्ट याच देशातील निर्माते का करू शकत नाहीत. अशीच गोष्ट समजा ‘द काश्मीर फाइल्स’सारख्या चित्रपटातून मांडण्यात आली असेल तर ती त्यांना प्रचारकी का वाटावी हा सवाल उभा राहतोच. ज्या पद्धतीने त्यांनी या सीरिजमधून त्यांचा इतिहास आणि वास्तव मांडलं आहे अगदी तशीच गोष्ट ‘काश्मीर फाइल्स’मध्ये दाखवली असताना यांच्या पोटात का बरं दुखायला लागलं? चित्रपटाला चित्रपटाच्याच नजरेतून पाहायचं जरी ठरवलं तरी अशा कलाकृतीच्या बाबतीत ही गोष्ट लागू होत नाही हे पटण्यासारखं आहे, पण ज्युरी प्रमुख म्हणून भूमिका बजावणाऱ्या या गृहस्थांची “आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कारटं” ही भूमिका मलातरी न पटणारी आहे.

इस्रायल हे भारताचे एक खास मित्र राष्ट्र आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. या दोन देशातील मित्रत्वाचे संबंध पदोपदी अधोरेखित झाले आहेत. इस्रायलच्या बाबतीत भारत सरकारने यापूर्वी दाखवलेली कृतघ्नता आणि इस्रायलने मित्रत्वाच्या नात्याने भारताला केलेली मदत सहसा कुणीच विसरणार नाही. पहिल्या महायुद्धाच्या काळात बॅटल ऑफ हायफा (इतिहासात लढलं गेलेलं तलवारी विरुद्ध बंदुका आणि तोफा असं युद्ध) मध्ये जोधपूर रियासतीने दिलेला लढा आणि आजही दरवर्षी इस्रायलमध्ये त्या ठिकाणी आपल्या शहीद वीरांना दिली जाणारी मानवंदना यावरुन भारत इस्रायल यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांचा अंदाज लावता येईल. त्यामुळे अशा मित्र राष्ट्रातील एका कलाकाराचं हे वक्तव्य निश्चितच लोकांना खटकणारं आहे आणि याचे राजकीय पडसाददेखील उमटू शकतात. काश्मीरमध्ये नरसंहार झाला की नाही किंवा हा चित्रपट प्रचारकी आहे अशा वादग्रस्त मुद्द्यांना खरंतर आत्ता हात घालायची काही गरज नव्हती. जर हा चित्रपट प्रचारकी आहे तर मग ऑस्कर विजेता ‘शिंडलर्स लिस्ट’ किंवा पॉलिश चित्रपट ‘द पियानिस्ट’ या चित्रपटांनाही नदाव लॅपिड प्रचारकी म्हणणार का? जर हा निकष ते या चित्रपटांच्या बाबतीत लावणार असतील तर एकाअर्थी त्यांच्याच देशात बनलेली आणि गाजलेली ‘फौदा’ ही वेबसीरिजदेखील प्रचारकीच म्हणावी लागेल.

ही सीरिज उत्तमच आहे यात काहीच वाद नाही, शिवाय इस्रायलचं भयावह वास्तव ही सीरिज आपल्यासमोर मांडते. पण तीच गोष्ट एखाद्या भारतीय चित्रपटात पाहायला मिळाली तर त्याला प्रचारकी म्हणून बिरुद लावणं ही खटकणारीच गोष्ट आहे. इस्रायलमध्ये प्रामुख्याने ज्यू, ख्रिश्चन आणि काही प्रमाणत मुस्लिम लोकं राहतात. शिवाय पॅलेस्टाईन साठी ‘यूएन’मध्ये मांडलेला विभाजनाचा प्रस्ताव पाहून जेंव्हा इस्रायलने स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं त्यानंतरसुद्धा कित्येक अरब राष्ट्रांनी इस्रायलविरुद्ध युद्ध पुकारलं आणि बहुतेक प्रत्येक युद्धात इस्रायला विजय मिळाला. त्यानंतर मात्र इस्रायलने कधी मागे वळून पहिलंच नाही. स्वतःच्या जीवावर उभा राहिलेला हा देश आज टेक्नॉलॉजी, शस्त्रास्त्रे अशा कित्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. हेरगिरीमध्ये तर या देशाने वेगळेच पराक्रम केले आहेत. याच हेरगिरीशी निगडीतच ‘फौदा’चं कथानक बांधलं आहे. अर्थात ही गोष्ट इस्रायलने त्यांच्या दृष्टिकोनातून मांडलेली आहे. भारतीयांनी किंवा इथल्या कलाकारांनी कधीच या सीरिजविषयी असे उद्गार काढल्याचं मलातरी आठवत नाही. त्यामुळे जर देशाचा आजवर कधीच समोर न आलेला इतिहास आणि धगधगतं वास्तव प्रेक्षकांसमोर मांडणारा ‘द काश्मीर फाइल्स’ हा ‘प्रचारकी’ आणि ‘व्हल्गर’ असेल तर मग इस्रायलमध्ये अतांकवादाविरोधात लढणाऱ्या संघटनेची गोष्ट मांडणारी ‘फौदा’ ही वेबसीरिजसुद्धा ‘प्रचारकी’ म्हणायला हवी. नाही का?

मराठीतील सर्व ब्लॉग्स ( Blogs ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 14:43 IST

संबंधित बातम्या