scorecardresearch

BLOG: अहो, राज ‘साहेब’ एअर स्ट्राइकबद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

भारताच्या बाह्य सुरक्षेची जबाबदारी ‘रॉ’ वर आहे. सहाजिकच ‘ऑपरेशन बालाकोट’मध्ये रॉ ने महत्वाची भूमिका बजावली असणार.

BLOG: अहो, राज ‘साहेब’ एअर स्ट्राइकबद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात न उतरता मोदी-शाह जोडगळीला राजकारणातून हद्दपार करण्याच्या उद्देशाने काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सतत बालाकोट एअर स्ट्राइकबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. इंडियन एअर फोर्सने पाकिस्तानातील खैबर पख्तूनखवा प्रांतातील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केलेली बॉम्बफेक कशी अपयशी ठरली ते राज ठाकरे आपल्या जाहीरसभांमधून सांगत असतात.

एअर फोर्सच्या फायटर विमानांनी बॉम्ब योग्य ठिकाणी फेकले पण तिथे दहशतवादीच नव्हते. दहा दहशतवादी मेले असते तर पाकिस्तानने अभिनंदन वर्थमान यांना सोडलं नसतं. इम्रान खानला त्यांच्याच देशात जिवंत जाळलं असतं हे राज ठाकरे यांचे दावे आहेत.

इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. भारत सरकारला वाटलं म्हणून त्यांनी एअर स्ट्राइकसाठी बालाकोट निवडलं नाही. इतकी मोठी कारवाई करण्याआधी गुप्तचरांकडून आधी माहिती गोळा केली जाते. त्यानंतरच कारवाईचा निर्णय घेतला जातो. भारताच्या बाह्य सुरक्षेची जबाबदारी ‘रॉ’ वर आहे. सहाजिकच ‘ऑपरेशन बालाकोट’मध्ये रॉ ने महत्वाची भूमिका बजावली असणार. राज ठाकरेंच्या दाव्यानुसार एअर फोर्सला चुकीची माहिती दिली गेली. तिथे दहशतवादीच नव्हते. राज ठाकरे जेव्हा असं वक्तव्य करतात तेव्हा ते जीव धोक्यात घालून भारताच्या सुरक्षेसाठी माहिती गोळा करणाऱ्या रॉ एजंटच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.

भारतीय हवाई दल पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बहावलपूरमध्ये असणाऱ्या जैशच्या मुख्यालयावरही एअर स्ट्राइक करु शकत होते. पण त्यांनी बालाकोटचीच निवड का केली? काही ठोस माहिती होती म्हणूनच बालाकोटमध्ये हा स्ट्राइक करण्यात आला. एनटीआरओ म्हणजे राष्ट्रीय तंत्रज्ञान संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार एअर स्ट्राइकच्या आधी बालाकोटमधल्या जैशच्या तळावर तीनशे मोबाइल फोन अॅक्टीव्ह होते. एअर स्ट्राइकनंतर हे मोबाइल बंद झाले होते. त्या आधारावरच नंतर दोनशे-तीनशे दहशतवादी मारले गेल्याचा दावा करण्यात आला.

राज ठाकरेंनी काल साताऱ्यांच्या सभेमध्ये एअर स्ट्राइकचा मुद्दा उपस्थित केला. ज्या ठिकाणी एअर स्ट्राइक झाला त्याठिकाणी पाकिस्तान पत्रकार, विदेश राजदूतांना घेऊन गेले होते. मुले तिथे शिकत होती. त्यामुळे एअर स्ट्राइकमध्ये जैशचा तळ उद्धवस्त झाला या भारत सरकारच्या दाव्यात दम नाही असे त्यांनी सांगितले. इथे एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. एअर स्ट्राइक झाल्यानंतर तब्बल ४३ दिवसांनी पाकिस्तान बुधवारी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना घटनास्थळी घेऊन गेले होते. जर भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये जैशचा तळ उद्धवस्त झाला नाही मग पाकिस्तानला पत्रकारांना घटनास्थळी घेऊन जायला दीड महिना का लागला?.

पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार जाबा टेकडीवरील तो एक साधा मदरसा होता. जिथे धार्मिक शिक्षण दिले जाते. मग मदरशाच्या भेटीच्यावेळी इतका लष्करी फौजफाटा तिथे का होता ?एअर स्ट्राइकच्या दुसऱ्याच दिवशी पत्रकारांना घटनास्थळी का जाऊ दिले नाही? एअर स्ट्राइकनंतर नवव्या दिवशी सुद्धा रॉयटर्सच्या पत्रकारांना घटनास्थळी जाण्यापासून का रोखण्यात आले ? जर नुकसानच झाले नाही मग पाकिस्तान इतके दिवस काय लपवत होता ? या प्रश्नांची उत्तरे पाकिस्तानकडे आहेत का? राज ठाकरे हे मुद्दे सुद्धा लक्षात घ्या.

स्पाइस २००० स्मार्ट बॉम्बचा वापर
भारताने बालाकोटमध्ये शत्रूच्या तळावर हल्ला करण्यासाठी स्पाइस २००० अस्त्राचा वापर केला. स्पाइस २००० हा स्मार्ट बॉम्ब असून अत्यंत अचूकतेने लक्ष्याचा वेध घेण्यासाठी या बॉम्बचा वापर केला जातो. स्पाइस २००० ला बॉम्ब म्हटले जात असले तरी हा एक ‘गायडन्स किट’ आहे. म्हणजे ज्याला मार्गदर्शक म्हणता येईल. पारंपरिक वॉरहेड किंवा बॉम्ब जो असतो त्याला स्पाइस २००० किट जोडले जाते. त्यामुळे २६ फेब्रुवारीला एअर स्ट्राइकच्यावेळी जो बॉम्ब वापरला गेला तो स्वदेशी बनावटीचा असावा. त्याची निर्मिती भारतातील दारुगोळा कारखान्यामध्ये झाली असावी. या स्पाइस किटची निर्मिती इस्त्रायलमधल्या कंपनीने केली आहे. या किटमध्ये कॅमेरा, मेमरी चीप आणि जीपीएस असते. ज्याच्या मदतीने लक्ष्यावर अचूक प्रहार करता येतो. एकदा लक्ष्य निश्चित झाले की, या स्मार्ट किटच्या मेमरी चीपमध्ये सर्व माहिती सेट केली जाते. टार्गेटचे जीपीएस लोकेशन, उपग्रहामार्फत घेतलेले फोटो, लक्ष्याच्या आसपास काय आहे त्याची माहिती मेमरी चीपमध्ये सेट केली जाते. पारंपारिक बॉम्बला हे स्मार्ट किट जोडले जाते. फक्त अचूक लक्ष्यभेद करण्यासाठी बॉम्बसोबत हे स्मार्ट किट वापरले जाते. या तंत्राच्या मदतीने काही किलोमीटर अंतरावरुन हवाई दलाला अचूक हल्ला करता येतो. त्यामुळे एअर स्ट्राइकमध्ये टार्गेट मिस होण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. त्यामुळेच पाकिस्तानने घटनास्थळी दीडमहिना कोणाला जाऊ दिले नाही. उलट भारतीय हवाई दलाने जंगलात इतक्या आतमध्ये असलेल्या भागात लक्ष्यावर अचूक प्रहार करुन आपली क्षमता दाखवून दिली. दहशतवाद्यांना तुम्ही आमच्यापासून लपवू शकत नाही हेच भारताने आपल्या कारवाईतून सिद्ध केले.

F-16 पाडल्याचा पुरावा

एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी २७ फेब्रुवारीला आकाशात झालेल्या डॉगफाईटमध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे एफ-१६ पाडले. हे सुद्धा राज ठाकरेंना मान्य नाही. आठ एप्रिलला इंडियन एअर फोर्सने एफ-१६ पाडल्याचा सबळ पुरावा सादर केला. एअर फोर्सने पाकिस्तानचे एफ-१६ पाडल्याचे रडार फोटो दाखवले. त्याशिवाय भारताने पाकिस्तानी सैन्याचे संदेशही पकडले आहेत. २७ फेब्रुवारीच्या सकाळी पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांनीच आमच्याकडे भारताचे दोन वैमानिक आहेत. एकाला रुग्णालयात दाखल केले आहे असे सांगितले होते. संध्याकाळी फक्त एकच वैमानिक ताब्यात असल्याचे त्यांनी सांगितले. मग रुग्णालयात दाखल केला तो दुसरा वैमानिक कोण होता? राज ठाकरे हे पुरावे पुरेसे नाहीत का?

मराठीतील सर्व ब्लॉग्स ( Blogs ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या