श्रीरामनवमी सुपरिचित आहेच. परंतु, भारतामध्ये खासकरून बिहार आणि तामिळनाडू राज्यांमध्ये सीतानवमी उत्साहाने साजरी केली जाते. वैशाख शुद्ध नवमी ही सीतानवमी म्हणून साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी देवी सीतेचा पृथ्वीच्या पोटातून जन्म झाला असे मानले जाते. परंतु, सीतेच्या अनेक जन्मकथा दिसतात. त्यातील काही जन्मकथा खास सीतानवमीच्या निमित्ताने पाहणे औचित्याचे आहे….

सीतेच्या जन्मकथा
वाल्मिकी रामायणानुसार राजा जनकाला त्याच्या शेतामध्ये जमीन नांगरताना सीता दिसली आणि त्याने तिला दत्तक घेतले. सीता हा शब्द सृजनात्मक आहे आणि सीता ही सृजनाचे प्रतीक आहे. सीता हे नाव ऋग्वेदातील सृजनात्मक देवतेच्या नावावरून ठेवण्यात आले, असे म्हटले जाते. त्या शेवटचा संबंध धनधान्य, पीक आणि समृद्धीशी होता. ऋग्वेदातील चौथ्या मंडलातील सूक्तामध्ये ही देवता दिसते.
बृ॒हत्सु॑म्नः प्रसवी॒ता नि॒वेश॑नो॒ जग॑तः स्था॒तुरु॒भय॑स्य॒ यो व॒शी । स नो॑ दे॒वः स॑वि॒ता शर्म॑ यच्छत्व॒स्मे क्षया॑य त्रि॒वरू॑थ॒मंह॑सः ॥
बृहत्सुम्नः प्रसवीता निवेशनो जगतः स्थातुरुभयस्य यो वशी । स नो देवः सविता शर्म यच्छत्वस्मे क्षयाय त्रिवरूथमंहसः ॥ (४. ५३. ६)
म्हणजेच हे देवी तू अशीच कायम आमच्यावर प्रसन्न राहा, धन-धान्य-कुलसमृद्धी कायम राहो. आमचा कधीही क्षय होऊदेत  नको, असा साधारण भावार्थ आहे. हरिवंश कथांमध्येही सीतेचा उल्लेख येतो.त्यामध्ये सीतेला यज्ञवेदीचे केंद्र म्हटले आहे. शेतीचे संवर्धन करणारी देवता म्हणून सीता या कथांमध्ये दिसते. कौशिक सूत्र आणि पारस्कर सूत्रांमध्ये सीता ही पर्जन्य देवता इंद्राची पत्नी असल्याचे उल्लेख आढळतात.
वाल्मिकी रामायणात सीता ही सध्याच्या बिहार राज्याच्या सीतामढी  प्रदेशात राजा जनकाला सापडल्याचे सांगितले आहे. ती नांगरलेल्या भूमीच्या कुशीत सापडल्यामुळे तिला भूमिदेवी असेही म्हणतात. रामायणाची तामिळ आवृत्ती असणाऱ्या कंबनमध्येही हीच कथा आढळते.  परंतु, सीतेच्या जन्मस्थानावरून अनेक वाद आहेत. काही अभ्यासकांच्या मते सीतेचा जन्म जनकपूर, नेपाळ येथील आहे आणि काही अभ्यासकांच्या मते, तिचा जन्म बिहारमधील आहे.
सीता नक्की मुलगी कोणाची आहे, यावरून अनेक मतप्रवाह आहेत. सीता ही राजा जनकाची स्वतःची मुलगी असल्याचे उल्लेख महाभारतातील रामोख्यानामध्ये आले आहेत. परंतु, मूळ रामायणात हा उल्लेख आढळत नाही. ‘रामायण मंजिरी’मध्ये सीतेचा जन्म मेनकेपासून झाल्याचे सांगितले आहे. ३४४ ते ३६६ या २२ श्र्लोकांमध्ये सीताजन्माची कथा आली आहे. वाल्मिकी रामायणाचे पशसम बंगाल संस्कृतीत जे संस्करण करण्यात आले त्यातही हीच कथा आढळते. राजा जनकाने मेनकेला पाहून मूल प्राप्त व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. काही काळाने जनकाला सीतेची प्राप्ती होते. तेव्हा मेनका तिथे प्रकट होऊन ही तिची मुलगी असल्याचे सांगते आणि तिचा जन्म दैवी असल्याचेही स्पष्ट करते. हिंदू मिथककथांमध्ये सीता ही देवी वेदवतीचा पुनर्जन्म होती, असे सांगितले आहे. वेदवती ही बृहस्पती ऋषींची मुलगी होती. ती तपश्चर्येला बसलेली असताना रावण तिथे आला. तो तिचे सौंदर्य पाहून मोहून गेला आणि त्याने तिला लग्नाकरिता मागणी घातली. परंतु, वेदवतीने नकार दिला. तिच्या नकारामुळे क्रोधीत झालेला रावण तिला जबरदस्ती घेऊन जाऊ लागला. तेव्हा वेदवतीने त्याला शाप दिला की, ”ती पुढील जन्मी त्याच्या मृत्यूचे कारण ठरेल.” आणि स्वतःचे चारित्र्य पवित्र ठेवण्यासाठी अग्नीमध्ये ऊडी घेतली. पुढील टी सीता होऊन रावणाच्या मृत्यूचे कारण ठरली. गुणभद्रच्या उत्तर पुराणानुसार मणिवतीचा पुनर्जन्म सीता असल्याचे सांगितले आहे. अलकापुरीच्या राजा अमितवेगची मुलगी मणिवती असते. रावण तिला त्रास देत असतो. तेव्हा ती या त्रासाचा सूड घेण्याचा निर्धार करते. मणिवती रावणाची पत्नी मंदोदरीच्या पोटी जन्म घेण्याचे ठरवते. परंतु, एक ज्योतिषी ”जन्माला येणारे मूल रावणासाठी घातक आहे” असे सांगतो. तेव्हा रावण त्या मुलाला मारण्याचे आदेश देतो. परंतु, मंदोदरी ते बाळ एका पेटीत ठेवते आणि मिथिलानगरीत पुरते. पुढे ते बाळ राजा जनकाला सापडते, अशी रंजक कथा उत्तर पुराणात आहे. संघदासाच्या रामायणाच्या जैन आवृत्तीत आणि अदभूत रामायणातही वासुदेवहिंदी नावाची सीता रावणाची मुलगी म्हणून जन्मल्याचे उल्लेख सापडतात. ज्योतिषी रावणाची पहिली पत्नी विद्याधर माया हिचे मूल रावणाचा नाश करेल, असे भाकीत करतात. रावण त्या पत्नीचा त्याग करतो आणि त्या लहान मुलाला दूर देशात पुरण्याचे आदेश देतो. त्यानुसार ते बाळ मिथिला नगरीत पुरले जाते आणि राजा जनक ते दत्तक घेतो.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा >> कथा सांगू आनंदे…

जैन रामायण
रामायणाच्या जैन आवृत्तीनुसार सीता ही मिथलापुरीचा राजा जनक आणि राणी विदेहाची कन्या आहे. तिला भामंडल नावाचा भाऊसुद्धा आहे.  ज्याचे पूर्वीच्या जन्मातील काही वैमन्यस्यामुळे एका देवतेने त्याच्या जन्मानंतर लगेचच त्याचे अपहरण केले आणि त्याला रथनुपूरच्या बागेत फेकून दिले. तिथे त्याला रथनुपूरचा राजा चंद्रवर्धन भेटतो. चंद्रवर्धन राजा आणि राणी त्याला आपला मुलगा म्हणून वाढवतात. भामंडलामुळे राम आणि सीतेचा विवाह होतो आणि घटनाक्रमात सीता आपली बहीण असल्याचे भामंडलाला कळते. तेव्हा तो त्याच्या जन्मदात्या आई-वडिलांना म्हणजे राजा जनकाला भेटतो, अशी वाल्मिकी रामायणापेक्षा वेगळी कथा आहे.

हेही वाचा >> सृजनात्मक बौद्धिक संपदा दिन…

सीता नक्की कोणते प्रतीक आहे ?
सीता ही पातिव्रत्याचे प्रतीक मानले जाते. तिने पत्नीधर्म निभावला, असे सांगितले जाते. परंतु, वाल्मिकी रामायणाच्या आधी सीता नावाची शेतीमध्ये समृद्धी प्राप्त करून देणारी देवता म्हणून सीता ओळखली जात होती. वेदांमध्येही असे समांतर उल्लेख आढळतात. सीता ही धनधान्य समृद्धीचे प्रतीक आहे. वाल्मिकी रामायणामध्येही सीता राजा जनकाला जमीन नांगरताना सापडते. म्हणून तिला भूमिकन्या म्हटले आहे. बिहार राज्यामध्ये शेतीला सुरुवात करण्याआधी सीतेची पूजा करतात.

सीतेची मंदिरे
प्रभू रामचंद्रांच्या मंदिरामध्ये सीतेची मूर्ती असतेच. परंतु, बिहार, नेपाळ आणि श्रीलंकेमध्ये सीतादेवीची मंदिरे आहेत. नेपाळमधील जनकपूर येथे जानकी मंदिर आहे. हरियाणा येथे सीतामाई गावात सीतामाई असे मंदिर आहे. या गावाची सीता ही प्रधान देवता आहे. बिहार येथील सीतामढी येथे  सीताकुंड आहे. नागपूर येथेही रामटेक गिरीवरील एका कुंडात सीतेने अंघोळ केलेली असे म्हटले जाते. केरळ येथील वायनाड भागात सीतादेवी मंदिर आहे. सीताअम्मा मंदिर श्रीलंकेत आहेत.  ही सर्व मंदिरे खास सीतादेवीसाठी आहेत.

केवळ पातिव्रत्य सांभाळणारी सीतादेवी विविध अंगांनी समजून घेणे आवश्यक आहे. काही लेखकांनी रामायणाच्या धर्तीवर  ‘सीतायण’ही रचलेली आहेत. सीतेच्या दृष्टीने रामायणाचा अभ्यास केलेला आहे. तोही बघणे आवश्यक आहे.

Story img Loader