News Flash

स्वबळ अजमावत भाजपचे युतीसाठी चर्चेचे गुऱ्हाळ

गेल्या चार-पाच महिन्यांमध्ये भाजपने त्रयस्थ संस्थेमार्फत दोन आणि दरमहा पक्षामार्फतही सर्वेक्षणे केली.

पालिका निवडणुकीसाठी व्यूहरचना; नोटाबंदीविरोधात सेना आक्रमकच

शिवस्मारक भूमिपूजनाला मुंबईसह राज्यातून मिळालेला प्रतिसाद पाहून भाजपचा आत्मविश्वास दुणावला असून मुंबईसह काही महापालिकांमध्ये स्वबळावर लढण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून त्रयस्थ संस्थेमार्फत भाजपने सर्वेक्षण सुरू केले आहे. शिवसेनेला गाफील ठेवण्यासाठी युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ या आठवडय़ात सुरू केले जाणार आहे. मात्र नोटाबंदीविरोधात शिवसेनेची आक्रमक भूमिका, गोव्यात भाजपविरोधात आघाडी हे मुद्दे युतीत अडसर ठरत आहेत.

मुंबई महापालिकेसह काही महापालिका व २६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून पुढील आठवडय़ात होण्याची शक्यता असून राजकीय हालचालींना वेग येणार आहे. भाजपकडून शिवसेनेला युतीसाठी चर्चेचा प्रस्ताव देण्यात येत असून काही नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चा सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युती करण्यासाठी अनुकूल असले तरी पंतप्रधान मोदी व अमित शहा यांचा मात्र ठाकरे यांच्याबाबत आकस आहे. ठाकरे व खासदार संजय राऊत यांनी आतापर्यंत केलेली टीका भाजपच्या जिव्हारी लागली असून भाजपची ताकद वाढलेली असताना शिवसेनेला फारशी किंमत देण्याची गरज नाही व जागावाटपात किमान निम्म्या जागा मिळाल्याखेरीज युती करू नये, अशी भाजपमधील काही नेत्यांची भूमिका आहे. मात्र शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे राज्यात सरकार असल्याने स्थैर्य राखण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह काही नेत्यांची शिवसेनेला न दुखावण्याची भूमिका आहे. मात्र, उद्धव व आदित्य ठाकरे यांनी मेट्रो तीनच्या आरे कॉलनीतील कारशेडला तीव्र विरोध करूनही तेथेच कारशेड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या चार-पाच महिन्यांमध्ये भाजपने त्रयस्थ संस्थेमार्फत दोन आणि दरमहा पक्षामार्फतही सर्वेक्षणे केली. आता नव्याने सर्वेक्षणाचे काम सुरू  करण्यात आले असून युतीबाबतचा अंतिम निर्णय त्यावर अवलंबून राहील. मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या एक लाख सहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. म्हाडा रहिवाशांचे प्रश्न, बीडीडी चाळींचा पुनर्विकास, झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करण्याबाबतचे महत्त्वाचे निर्णय फडणवीस यांनी गेल्या दोन-तीन दिवसांत घेतले असून पुढील दोन दिवसांमध्ये म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासाबाबतचा निर्णय अपेक्षित आहे. या सर्व निर्णयांचे श्रेय भाजपला मिळणार आहे. शिवसेनेच्या किनारपट्टी रस्त्याच्या (कोस्टल रोड) मार्गात मात्र केंद्र सरकारच्या परवानग्यांचे अडसर असून निवडणुकीआधी हा प्रकल्प मार्गी लागू नये व शिवसेनेला श्रेय मिळू नये, यासाठी फडणवीस यांच्याकडून केंद्र सरकारकडे फारसा पाठपुरावा केला जात नाही. महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेत मनोरंजन उद्यान (थीमपार्क) साकारण्याच्या ठाकरे यांच्या संकल्पनेलाही फडणवीस यांनी मदत न दिल्याने तो बारगळला आहे.

सेनेचा ४ ला मेळावा

शिवसेनाही आक्रमक प्रत्युत्तर देण्याचा विचार करीत असून पदाधिकाऱ्यांचा मेळावा ४ जानेवारीला रंगशारदामध्ये होणार आहे. त्र्यंबकेश्वर येथील पुजाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाने धाडी घातल्याने शिवसेनेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.गोव्यात भाजपविरोधातील ‘संघात’ शिवसेना सामील असून उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांमध्ये भाजपविरोधात लढणार आहे.

कठोर वक्तव्यांचा अडसर

ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत व अन्य नेत्यांनी पंतप्रधान मोदी, अमित शहा व भाजप विरोधात केलेल्या वक्तव्यांचा युती होण्यात अडसर असून शिवसेनेबद्दल भाजप पक्षश्रेष्ठींच्या मनात अढी असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. शिवसेना नेत्यांनी जर वक्तव्ये थांबविली, तरच युतीचा विचार होऊ शकतो, अशी अटच भाजपकडून घातली जाणार असल्याचे समजते.

फडणवीस-उद्धव ठाकरे आज एकत्र

मुंबई  : महानगरपालिका निवडणुकींच्या पाश्र्वभूमीवर सेना -भाजपाच्या एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येत आहेत. पालिका सभागृहात सोमवारी प्रबोधनकार केशव ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण होत असून इतर पालिकेच्या अनेक उपक्रमांचेही लोकार्पण होत आहे.

महानगरपालिका सभागृहात सध्या विविध नेत्यांचे १३ पुतळे आहेत. त्यामुळे प्रबोधनकार ठाकरे यांचा पुतळा सभागृहाच्या नूतनीकरणानंतर लावण्यात येणार असून सध्या त्यांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. त्याच वेळी दुकाने व आस्थापना खात्याकडून ऑनलाइन नोंदणी व नूतनीकरणासाठी संगणकीय प्रणाली, शिक्षण खात्याच्याकडून प्राथमिक शाळांना पूर्वपरवानगी, प्रथम मान्यता आणि मान्यता मुदतवाढ प्रस्तावासाठी ऑनलाइन प्रणाली, महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये सॅनिटेरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन, महापालिकेच्या अद्ययावत संकेतस्थळ या उपक्रमांचे लोकार्पण आणि अग्निशमन दलाच्या ‘कॉफी टेबल बुक’ चे प्रकाशनही यावेळी होईल.

आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर शह-काटशहाचे राजकारण सुरू असल्याच्या पाश्र्वभूमीवर हे दोन नेते एकाच मंचावर येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2017 3:07 am

Web Title: bjp to sweep the bmc elections without shiv sena as per bjp secret survey
Next Stories
1 मुंबईत कृष्णनीतीच चालणार!
2 सेनेचे नाराज नगरसेवक भाजपच्या गळाला?
3 कोटय़वधींचा अर्थसंकल्प असताना मुंबई अविकसित
Just Now!
X