मुंबई महानगर पालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता येईल असे म्हणत मुंबईतील जनता येथील शिवसेना-भाजपच्या कारभाराला कंटाळली असल्याचे काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटले आहे. मुंबई महानगर पालिकेच्या प्रचारासाठी ज्योतिरादित्य सिंधिया यांची मुंबईत रॅली झाली. साकीनाका ते जोगेश्वरी असा त्यांचा गुरुवारी रोड शो झाला. त्यानंतर त्यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अनेक गोष्टींचा खुलासा केला. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट होती. त्याच लाटेवर स्वार होत भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना-भाजपचेच सरकार मुंबई महानगरपालिकेत आहे. जनता युतीच्या कारभाराला कंटाळली असून काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचे सिंधिया यांनी म्हटले.

गेल्या कित्येक वर्षांपासून येथे त्यांची सत्ता आहे. महानगर पालिकेला भ्रष्टाचाराने ग्रासले आहे. येथील पायाभूत सुविधांची परिस्थिती पाहता येथे केवळ भ्रष्टाचार झाला आहे हे लक्षात येईल असे सिंधिया म्हणाले. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांना माफिया म्हणत आहेत परंतु या दोन्ही पक्षांमध्ये गुंडांचा भरणा असून त्यांनी जनतेच्या हितासाठी काय केले असा सवाल सिंधिया यांनी केला. भारतीय जनता पक्ष पारदर्शकतेच्या गप्पा मारत आहे परंतु त्यांनी काय पारदर्शकता आणली हे जगासमोर ठेवावे असा टोला त्यांनी लगावला. वीस वर्षांपासून ते अधिक काळ शिवसेनेसोबत सत्तेमध्ये आहे. तेव्हा त्यांनी पारदर्शकता वगैरे असे शब्द वापरू नये असे ते म्हणाले. आपण चार वार्डांमध्ये फिरून आलो परंतु आपल्याला कुठेच मोदींची लाट दिसली नाही असे ते म्हणाले. फक्त जिकडे तिकडे होलोग्राम दिसले आहेत. येथील नागरिकांना अनेक समस्यांना ग्रासले आहे. त्यावेळी नुसत्या आश्वासनांचा आणि वचनांचा काही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी म्हटले. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसचे नेते अविरत काम करत असल्याचे सिंधिया यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी तोफ डागली. देवेंद्र फडणवीस पारदर्शकेतेबाबत बोलतात, परंतु त्यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये जनतेसाठी काय केले आहे याचे उत्तर आधी द्यावे असे ते म्हणाले.