25 November 2020

News Flash

मुंबईचा महापौर मराठीच आज अर्ज भरणार

भाजपने शुक्रवारी कोकणभवन येथे अधिकृत नोंदणी केली.

महानगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना व भाजप यांच्यामध्ये  रस्सीखेच सुरू असली तरी मुंबईच्या महापौरपदी मराठी व्यक्तीच येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. या दोन्ही पक्षांच्या राजकीय डावपेचांबाबात कमालीची गुप्तता बाळगली जात आहे. दोघांकडूनही महापौरपदाच्या उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवले असले तरी भाजपकडून मराठी उमेदवारच दिला जाणार असल्याचे समजते. काँग्रेस-राष्ट्रवादीनेही महापौरपदासाठी मराठी उमेदवार उभा केला आहे. आज, शनिवारी महापौरपदासाठी अर्ज भरण्यात येणार असून ८ मार्च रोजी मुंबईला मराठीच महापौर मिळेल.

भाजपने शुक्रवारी कोकणभवन येथे अधिकृत नोंदणी केली. यावेळी नेतेपदी पुन्हा मनोज कोटक यांच्या नावाची वर्णी लागली. भाजपच्या ८२ नगरसेवकांमध्ये २३ गुजराती व ११ उत्तर भारतीय असले तरी महापौरपदासाठी मराठी नाव पुढे येणार असल्याची चर्चा आहे.  गुजरातीपणाचा शिक्का बसू नये याची भाजपच्या उच्चपदस्थांकडून काळजी घेण्यात येत आहे. गटनेतेपदी गुजराती नगरसेवकाची नेमणूक करून महापौरपदी मराठी उमेदवार देण्याचा भाजप धुरीणांचा विचार आहे. सुधार समितीचे अध्यक्षपद सांभाळलेले प्रकाश गंगाधरे तसेच सभागृहेनेतेपदाचा अनुभव असलेले व नुकतेच सेनेतून भाजपमध्ये आलेले व प्रभाकर शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. महापौरपद व स्थायी समितीचे अध्यक्ष यांच्याबाबत सेनेत अनेक नावांची चर्चा सुरू होती, तरी शुक्रवारी रात्रीपर्यंत महापौरपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले नव्हते.

काँग्रेस- राष्ट्रवादीकडून संध्याकाळी उशिरा विठ्ठल लोकरे यांचे नाव महापौरपदाच्या उमेदवारीसाठी निश्चित करण्यात आले. मानखूर्दमधून काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या लोकरे यांना राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी उपमहापौरपदासाठी उमेदवार देणार नाही. सपकडून अजून पाठिंब्याबाबत माहिती मिळालेली नाही, सपच्या निर्णयानंतर उपमहापौरपदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित केले जाईल, असे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी लोकसत्ताला सांगितले.

‘मनसेचे पर्याय’

सर्व पर्याय खुले असले तरी मराठी माणसालाच पाठिंबा असेल असे मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 2:26 am

Web Title: bmc election results 2017 bjp shiv sena ncp mns 2
Next Stories
1 सेना नगरसेवक नजरकैदेत!
2 शिवाजी पार्कावर तीन-तीन सेल्फी पॉइंट!
3 नगरसेवकांपैकी ४३ जणांवर गुन्हेगारी स्वरूपाच्या तक्रारी
Just Now!
X