एकएक निकाल जाहीर होऊ लागले.. शिवसेना भाजपच्या पुढे असल्याचे चित्र येऊ लागले.. सेना ९० जागांवर आघाडीवर असल्याचे आकडे माध्यमांमधून येऊ लागले, भाजप ५४ जागांवर होती आणि सेनेच्या जल्लोषाला उधाण आले.. भाजप प्रदेश कार्यालयासमोर सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरात ढोल बडवायला सुरुवात केली. शिवसेना भवनासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला.. फटाके फुटू लागले.. आता आम्हाला कोणाचीच गरज नाही, अशा गर्जना सेनानेत्यांनी केल्या आणि वाहिन्यांवरही सेनेच्या विजयाची सावली उमटू लागली.. दुपारनंतर मात्र, हळूहळू वारे बदलत गेले.. भाजपच्या जागा वाढू लागल्या, आणि सेना ८४ जागांवर स्थिरावली. पुढे भाजप ८० जागांवर पोहोचली, तरीही सेना मात्र तेथेच होती.. मग जल्लोषाचे सूर बदलले.. हवा पालटली, आणि ढोल ताशांचा आवाज भाजपच्या बाजूने अधिक दमदार झाला.. ‘करून दाखवतो’, आणि ‘पाणी पाजून दाखवेन’, या आव्हानांची भाषा निर्णायक टप्प्यावर आली, आणि सेनेच्या तंबूत शांतता वाढू लागली..

राज्यातील दहा महापालिका व २५ जिल्हापरिषदांच्या निवडणुकांच्या कल सकाळपासून जाहीर होत होते. जागोजागी भाजप आघाडीवर असल्याचे चित्र पुढे येत होते. तथापि साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या त्या मुंबई महापालकेच्या निकालाकडे.. माध्यमेही‘बुम’ सरसावून बसली होती. विश्लेषणासाठी ज्येष्ठ पत्रकार फडावर बसले होते. एकापाठोपाठ निकालांचे कल जाहीर होऊ लागले तसतसे शिवसेना नव्वद जागांच्या पुढे जाईल, असे अंदाज सांगण्यात विश्लेषकांमध्ये स्पर्धा लागली.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर, स्पष्ट बहुमत मिळेल.. शाहिस्तेखानाची बोटे तुटली.. भाजपला ४० जागाही मिळणार नाहीत, अशा डरकाळ्या फोडण्यास सुरुवात केली.. निकाल पुढे सरकू लागले.. थोडय़ा वेळातच भाजपने पन्नासहून अधिक जागांवर आघाडी घेतल्याचे स्पष्ट होऊ लागले. जिल्हा परिषदा व अन्य महापालिकांमध्ये भाजपचा झेंडा फडकू लागला, आणि भाजप प्रदेश कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी सुरू केली. लगेचच चर्चेचे सूर बदलू लागले. त्याचवेळी सेनेला आता स्पष्ट बहुमत मिळणार का, न मिळाल्यास सेना काय करणार, असे सवाल पुढे येऊ लागले.. त्याच दरम्यान भाजप हळूहळू पुढे सरकू लागला. सुरुवातीला गप्प असलेल्या भाजपनेत्यांना कंठ फुटू लागला.. मुंबईतील शिवसेना भवनासमोरच्या जल्लोषी वातावरणाने काढता पाय घेऊन भाजपच्या कार्यालयाची वाट धरली.

मुंबईचे चित्र जेव्हा पुरते स्पष्ट झाले तेव्हा सेनाभनासमोर शांतता होती, आणि भाजपच्या कार्यालयापुढे नव्याने जल्लोष सुरू होता. ढोल वाजू लागले, फटाके फुटू लागले, आणि वाघाचा ‘घसा’ बसला!..