सरकार नोटीस पिरियडवर आहे, असे सांगून सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर त्याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शिवसेनेने पाठिंबा काढला तर सरकार कोसळेल, असा दावा केला आहे. शिवसेना सरकारमधून बाहेर पडली तर विरोधी आमदारांची संख्या दीडशेपर्यंत पोहोचेल, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची बारामतीतील कन्हेरीमध्ये प्रचारसभा झाली. या सभेत त्यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. भाजपच्या डोक्यात सत्ता भिनली आहे, अशी तोफ त्यांनी डागली. भाजपवर सर्वच मित्रपक्ष नाराज आहेत. सरकारमध्ये सहभागी झालेल्या शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना कोणतेही अधिकार नाहीत. त्यामुळे ते नाराज असून, महापालिका निवडणुकीनंतर सरकार राहील की नाही, याबाबत संभ्रम आहे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले. सध्याच्या घडीला शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास सरकार कोसळेल. साधारण दीडशेच्या आसपास आमदार त्यांच्याविरोधात जातील. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्षांसह इतर डावे पक्ष भाजप आणि शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षांना कधीच समर्थन करणार नाहीत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. शिवसेनेने पाठिंबा काढला तर, त्यांच्याविरोधातील आमदारांची संख्या दीडशे होईल. त्यामुळे हे सरकार कसे टिकेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप सरकारला समर्थन देणार नाही, असे अप्रत्यक्ष संकेत त्यांनी दिले आहेत.

तत्पूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकार नोटिस पिरियडवर असल्याचे सांगून सरकारमधून बाहेर पडण्याचे संकेत दिल्यानंतर शिवसेनेचे सर्व मंत्री राजीनामा देणार असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. यावरून विरोधकांनीही टीका करण्यास सुरूवात केली आहे.