उमेदवारांकडून आधुनिक उपकरणाचा वापर
पालिकेकडून मतदार चिठ्ठी वितरणात झालेली दिरंगाई राजकारण्यांच्या पथ्यावर पडली असून मतदारांपर्यंत मतदान चिठ्ठी पोहोचविण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये अहमहमिका लागली आहे. आयत्या वेळी जलदगतीने मतदान चिठ्ठीची छापून मिळणे अवघड असल्याने काही उमेदवारांनी त्यासाठी आधुनिक उपकरणाचा वापर केल्याचे निदर्शनास आले असून या उपकरणाचा प्रथमच निवडणुकीमध्ये वापर करण्यात येत आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पक्षाचे, आपले नाव आणि निवडणूक चिन्ह असलेल्या मतदान चिठ्ठय़ा या उपकरणाच्या साह्य़ाने तयार केल्या असून त्या मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज तैनात केली आहे, तर काही उमेदवारांनी मतदाराच्या मोबाइलवर थेट मतदान चिठ्ठीचा संदेश पाठविला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार रविवारी संपुष्टात आला. गेले काही दिवस धडधडलेल्या राजकीय पक्षांच्या तोफा रविवारी रात्री थंडावल्या. मात्र त्यानंतर सोमवारी राजकीय पक्षांनी अत्यंत सावधपणे छुप्या पद्धतीने आपल्या प्रचाराचे सत्र सुरू ठेवले होते. त्याचाच एक भाग म्हणजे मतदान चिठ्ठी. मतदानापूर्वी मतदारांपर्यंत मतदान चिठ्ठी पोहोचावी यासाठी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची धडपड सुरू झाली आहे. कमी काळात ५०-५५ हजार मतदारांच्या मतदान चिठ्ठय़ा छापून मिळणे अवघड काम आहे. या चिठ्ठय़ा वेळेवर मिळाव्या यासाठी छापखान्यात कार्यकर्त्यांना ठिय्या मांडून बसावे लागते. छापून मिळालेल्यानंतर त्या मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांवर विसंबून राहावे लागते. आपल्या प्रभागातील मतदारांपर्यंत मतदान चिठ्ठी पोहोचविण्यासाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांमध्ये अहमहमिका लागली होती. उमेदवाराचे नाव, पक्षाचे नाव, पक्षाची निशाणी, मतदान केंद्र क्रमांक, मतदार क्रमांक आदी माहितीचा समावेश असलेल्या मतदान चिठ्ठय़ा उमेदवारांनी घरोघरी पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज तैनात केली होती. दिवसाला प्रतिकार्यकर्ता सुमारे ५०० ते १००० रुपये मोजून या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने चार पैसे पदरात पाडून घेण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी मोठय़ा संख्येने ही कामे करताना दिसत होते.बेस्ट उपक्रमाच्या बसगाडय़ांमध्ये प्रवाशांना तिकीट देण्यासाठी ‘इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्युइंग मशीन’ (ईटीआयएम)चा वापर केला जात आहे. अशाच प्रकारच्या उपकरणाचा प्रथमच पालिका निवडणुकीत उमेदवारांकडून वापर करण्यात आला आहे. या उपकरणाद्वारे झटपट मतदान चिठ्ठी तयार करण्यात येत आहे. या उपकरणामध्ये उमेदवाराचे नाव, पक्षाचे नाव, निशाणी यासह प्रभागातील सर्व मतदारांची यादी संकलित करण्यात आली आहे. मतदान चिठ्ठी हवी असल्यास मतदाराच्या नावातील सुरुवातीची दोन अक्षरे टाइप केल्यानंतर त्याची सर्व माहिती उपलब्ध होते. मतदाराचे नाव, आडनाव, पत्ता अशी माहिती उपकरणावर दिसते. योग्य माहिती आल्यानंतर या उपकरणावरील कळ दाबल्यानंतर मतदान चिठ्ठी उपलब्ध होते.काही उमेदवारांनी आधीपासूनच प्रभागांतील मतदारांची इत्थंभूत माहिती गोळा केली आहे. प्रभागातील मतदारांना त्यांच्या मोबाइलवर संदेश पाठवून मतदान केंद्र, मतदार क्रमांक आदींची माहिती दिली.
वेळ, खर्चात बचत
पूर्वी उमेदवारांना मतदान चिठ्ठीच्या छपाईवर मोठी रक्कम मोजावी लागत होती. तसेच या मतदान चिठ्ठय़ा वेळेवर छापून न मिळाल्याने त्यांच्या वितरणास कमी वेळ मिळत होता. आता या उपकरणाच्या साह्य़ाने झटपट मतदान चिठ्ठी तयार होत आहे. हे उपकरण प्रभागात कोठेही घेऊन जाता येऊ शकते. एखाद्या ठिकाणी मतदाराला मतदान चिठ्ठी हवी असल्यास कार्यकर्ते तो असलेल्या ठिकाणी उपकरणासह पोहोचून त्याला ती देऊ शकतात. मतदारांना मतदान चिठ्ठी वितरित करण्यास विलंब झाल्याने अनेक मतदारांना त्या मिळालेल्या नाहीत. मतदानाच्या दिवशी प्रभागामध्ये काही ठिकाणी मतदारांच्या सोयीसाठी ही उपकरणे मुख्य कार्यकर्त्यांच्या हाती देण्यात येणार आहेत.