‘भाजप हॉटेलचे उद्घाटन- या गुंडांनो या, मावळे व्हा’अशा आशयाचे होर्डिग तयार करून, कोणत्या श्रेणीच्या गुंडाना घेतल्यास काय पद मिळेल असे मार्मिक ‘मेन्यू कार्ड’ असलेला फलक घेऊन भाजपच्या कार्यालयासमोरून जाणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर ठाणे पोलिसांनी जातीय तेढ, विद्वेष पसरवणे आदी गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल केला. भाजप नेत्यांच्या दबावातून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याला मनसे स्टाईलनेच आता उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.

महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून भाजपने गुंडा-पुंडाना पक्षात प्रवेश देण्यास सुरुवात केल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यापासून सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत साऱ्यांनीच सुरु केली आहे. याचा मार्मिकपणे वापर करत ठाण्यातील मनसेचे कार्यकर्ते ओंकार माळी यांनी ‘भाजपा हॉटेल’च्या उद्घाटनाचा फलक तयार करून गुंडगिरीच्या श्रेणीनीहाय पक्षपदाचे ‘मेन्यू कार्ड’च तयार केले. सहकार क्षेत्र व सहकारी बँकांमध्ये घोटाळे केल्यास आमदारकी निश्चित (खास डिश प्रवीण दरेकर), पोलिसांना मारहाण करणे व विधानसभेत मारहाण केल्यास आमदारकी (खास डिश राम कदम), राष्ट्रीय पातळीवर नेतेपदासाठी राजभवनात सेक्स स्कॅडल अथवा मुख्यमंत्री निवासस्थानी नोटांच्या गादीचा बिछाना, बिल्डरला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे व टाडा तसेच पालिकेतील घोटाळ्यात न्यायालयाने दोषी ठरवल्यास आमदारकीचे आश्वासन व पत्नीला नगरसेवकाचे तिकीट देऊन मागील दाराने पक्षप्रवेश असे मार्मिक मेन्यू कार्ड तयार केलेला फलक नौपाडा येथील भाजप कार्यालयासमोर घेऊन आंदोलनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी ओंकार माळी यांना ताब्यात घेतले तसेच फलक जप्त करून १५३ अ-अ आणि ५०५ अ (२) ही जातीय तेढ व विद्वेष परसरविण्याचा आरोप करणारी कलमे लावून गुन्हा दाखल केला.

या आंदोलनासाठी कोणताही परवानगी घेण्यात आली नव्हती, असे पोलिसांचे म्हणणे आहे.लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा हक्क असून ओंकार हा फलक घेऊन भाजप कार्यालयासमोरून जात असताना पत्रकार व माध्यमांनी चित्रणासाठी थांबविताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून भाजपच्या काही नेत्यांनी आणलेल्या दबावामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याचे नांदगावकर यांनी सांगितले. भाजपने गुंडाना प्रवेश द्यायचे व मनसेने आंदोलन केले म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे हे खपवून घेतले जाणार नाही, असे बाळा नांदगावकर यांनी या वेळी स्पष्ट केले.