पत्नी, मुलांसह मर्जीतल्या व्यक्तीच्या उमेदवारीसाठी विभागप्रमुखांची धावाधाव
भाजपसोबतची युती संपुष्टात आल्यानंतर शिवसेनेमध्ये नवचैतन्याची लाट उसळली असतानाच मुंबईतील शिवसेनेच्या काही विभागप्रमुखांनी पत्नी, मुलगी, मर्जीतील व्यक्ती किंवा स्वत:च्या उमेदवारीसाठी थयथयाट सुरू केला आहे. काही विभागप्रमुखांनी गटबाजी करत थेट ‘मातोश्री’वरच दबाव वाढवण्याचा प्रयत्न चालवल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज झाल्याचे वृत्त आहे. विभागप्रमुख आणि नेतेमंडळींच्या या ‘कुटुंबकल्याण’ धोरणामुळे पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते मात्र हतबल झाले आहेत.
पालिका निवडणुकीत विभागप्रमुखांना उमेदवारी देण्यात येणार नाही, असा निर्णय उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर विभागप्रमुख धास्तावले होते. तसेच दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी त्यांनी विभागप्रमुखांवर सोपविली. आता युती संपुष्टात आणल्यानंतर मुंबईमधील राजकीय समीकरण बदलू लागली आहेत. ही संधी सोडायची नाही असा चंग बांधूनच विभागप्रमुखांनी ‘मातोश्री’ गाठली. उद्धव ठाकरे यांनी जवळजवळ २२७ प्रभागांमधील उमेदवारांची यादी निश्चित केली आहे. या यादीत आपल्या मर्जीतील व्यक्ती अथवा नातेवाईकाचा समावेश नसल्याचे लक्षात आल्यानंतर या विभागप्रमुखांनी परस्परांशी संपर्क साधून दबावतंत्राचा अवलंब सुरू केला आहे. त्यांना काही खासदार आणि आमदारांचाही पाठिंबा असल्याचे समजते.
निश्चित केलेल्या यादीतील उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी आहे, असा युक्तिवाद करीत या मंडळींनी आपल्या मर्जीतील व्यक्तींसाठी उमेदवारी पदरात पाडून घेण्याचा खटाटोप केला.
शिवसेनेच्या उमेदवारांना एबी अर्जाचे वाटप करण्याची जबाबदारी विभागप्रमुखांवर सोपविण्यात येणार आहे. उमेदवारांना देण्यासाठी उद्या, परवा एबी अर्ज विभागप्रमुखांकडे सुपूर्द करण्याचा विचार वरिष्ठ पातळीवर सुरू होता. असे असताना अचानक काही विभागप्रमुखांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने ‘मातोश्री’वरील उपस्थित हैराण झाले.
पालिका निवडणुकीसाठी उमेदवार निश्चिती करण्याची प्रक्रिया उद्धव ठाकरे यांच्या करडय़ा नजरेत सुरू होती. या प्रक्रियेपासून शिवसेनेतील नेते, उपनेत्यांना दूर ठेवण्यात आले होते. शिवसेनेच्या सचिवांच्या माध्यमातून विविध व्यूहरचना आखण्यात येत होत्या. सचिवच विभागप्रमुखांच्या संपर्कात होते. या विभागप्रमुखांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सचिवही अडचणीत आले आहेत.
गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबईतील शाखाप्रमुख आणि उपशाखाप्रमुखांना ‘मातोश्री’वर बोलावण्यात आले होते. या निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच उमेदवारी देण्यात येणार आहे. शाखाप्रमुख अथवा उपशाखाप्रमुख असलेल्यांना
उमेदवारी मिळणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे इच्छुक शाखाप्रमुख आणि उपशाखाप्रमुखांच्या नावावर फुल्ली मारली गेली आहे.