या वर्षांची ग्रहस्थिती पाहाता वृषभ राशीत गुरू, मीन राशीत हर्षल, धनु राशीत प्लुटो आणि तूळ राशीत म्हणजे स्वत:च्या उच्च राशीत शनी-राहू युती आणि सध्या शनी १८ फेब्रुवारीपासून ते ८ जुलै वक्री स्थितीत असणार आहे. एकंदरीत ग्रहस्थितीचा अंदाज घेतला, तर शनी स्वत:च्या उच्च राशीत वास्तव्य करीत आहे आणि त्याच्या न्यायी दानशूर वृत्तीमुळे या वेळेचा अर्थसंकल्प मध्यम व गरीब जनतेला फारसा त्रासदायक ठरणार नाही. उलट किंबहुना तो थोडासा आशादायक आणि भार हलका करणारा जाणवेल. आतापर्यंत सादर झालेल्या अर्थसंकल्पापेक्षा एक वेगळा अर्थसंकल्प म्हणून त्याची गणना केली जाईल.
करवाढीची रक्कम मर्यादा साधारणपणे दोन लाख पन्नास हजारापर्यंत वाढवली जाईल, अशी शक्यता वाटते. लोखंड, तेलाचे भाव स्थिर राहतील. विशेषत: उद्योगधंदा, व्यापारी वर्गास हा अर्थसंकल्प फारसा लाभदायक ठरणार नाही. व्यापारी वर्गावर नवीन कायद्याची बंधने राहतील. तेल, कोळसा, खनिज पदार्थावर सरकारचे पूर्ण नियंत्रण राहील. शेतकरीवर्ग इतका आनंदी, उत्साही असणार नाही. त्यांना मिळणाऱ्या सवलती मध्यम स्वरूपाच्या असतील. साखरेच्या बाबतीतही फारशी आशादायक स्थिती नसेल. भाजीपाला, फळे, कांदे यांच्या भावात फारसा फरक जाणवणार नाही. पण देशातील धान्याचे उत्पादन समाधानकारक राहील. दूध व दुधाच्या पदार्थाच्या किमतीत वाढ होईल.
आंतरराष्ट्रीय बाजाराशी मेळ बसण्यासाठी नवीन कायदे केले जातील. सोने ३७ हजारांवर जाऊन चढत्या भावाचा उच्चांक होईल. चांदी प्रतिकिलो ७५ हजार होण्याची दाट शक्यता वाटते. चैनीच्या वस्तूंवरही करवाढ होईल. एकंदरीत हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी थोडासा दिलासा देणारा असेल, पण या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशाची आर्थिक स्थिती चांगली राहील. परकीय चलनात चांगली वाढ होईल. हे वर्ष भारताला आर्थिकदृष्टय़ा प्रगतीचे, संपन्नतेचे जाईल. काही कालांतराने एक स्थिर व संपन्न राष्ट्र म्हणून संपूर्ण जग भारताकडे आदराने पाहिल.
ता.क.
तूळ राशीतील वक्री शनी व राहूमुळे देशात मोठय़ा पुढाऱ्यांच्या पक्षातील स्थानामध्ये बदल संभवतो. राष्ट्रांतर्गत घडामोडीत अचानक बदल संभवतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: General public will get relief in coming budget says ulhas guptey
First published on: 25-02-2013 at 01:10 IST