How to Update Children’s Aadhaar Card : युनिक आयडेंटिफिकेशन प्राधिकरणाने (UIDAI) ५ ते १५ वर्षांचा वयोगट असलेल्या मुलांसाठी आधार कार्डातील तपशील पूर्ण करण्याच्या दृष्टीने नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. UIDAI चे प्रमुख भुवनेश कुमार यांनी राज्यांमधील शाळांनी आणि केंद्रशासित प्रदेशातील शाळांनी या संदर्भात शिबीरं घ्यावीत असं पत्र लिहिलं आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने २७ ऑगस्टला दिलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे. यासंदर्भात UIDAI ने शालेय शिक्षण विभागासह मिळून काम करायचं ठरवलं आहे.
मुलांसाठी आधार बायोमॅट्रिक अपडेट का महत्त्वाचं आहे?
५ ते १५ या वयोगटातील विद्यार्थ्यांनी आधार कार्डमध्ये बायोमॅट्रिक्सचे तपशील समाविष्ट करणं आवश्यक आहे. तसं झालं नाही तर सरकारी योजना, त्यासाठीचं प्रमाणीकरण, NEET, JEE, CUET या परीक्षांच्या नोंदणीसाठी अडचणी येऊ शकतात. अशा वेळी विद्यार्थी किंवा पालक ऐनवेळी आधार अपडेट करायला जातात आणि ते होत नाही. त्यामुळे वेळीच आधार अपडेट करणं त्यात सगळे तपशील भरणं आवश्यक असतं.
शाळांनी कँप आयोजित करण्याचं आवाहन
यूआयडीएआयच्या सीईओंनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात त्यांना या उपक्रमाची माहिती दिली आणि त्यांनी यासंदर्भातली एमबीयू शिबिरे आयोजित करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. शाळांनी यासंदर्भात कँप आयोजित केले तर ज्यांचं बायोमॅट्रिक अपडेट अशा सगळ्याच विद्यार्थ्यांना मदत मिळणार आहे. शाळांकडेही या विद्यार्थ्यांची माहिती असेल. युआयडीएआयने दिलेल्या माहितीनुसार १७ कोटी मुलांचे आधार हे बायोमॅट्रिक अपडेट नाहीत. ते करणं आवश्यक आहे. तसं केलं नाही तर विविध स्पर्धा परीक्षांची नोंदणी करता येणार नाही. सरकारी योजनांसाठी नोंदणी करणं कठीण होईल. आधार कार्ड हे आपल्या भारतीय असण्याचं प्रमुख ओळखपत्र आहे. मागच्या वर्षी UIDAI ने ५ वर्षांवरील मुलांच्या आधार कार्डात बायोमॅट्रिक अपडेट करणं अनिवार्य केलं होतं. तरीही १७ कोटी मुलांच्या आधार कार्डमध्ये अपडेशन झालेलं नाही. मुलांची माहिती त्यात येणं आवश्यक आहे असंही भुवनेश्वर कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. आता हे कँप किती दिवसांचे असतील आणि कशा प्रकारे आयोजित केले जातील हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.