Adani Group Stocks : अदाणी ग्रुपने गुजरातमधील मुंद्रामध्ये ३४,९०० कोटी रुपयांचा प्रकल्प थांबवला, असा रविवारी एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता. त्यामुळे अदाणी ग्रुपचे १० पैकी ९ कंपन्यांचे शेअर्स घसरले. आता अदाणी ग्रुपने यासंदर्भात खुलासा करत वृत्ताचं खंडन केलं आहे. ग्रीनफील्ड कोल टू पॉलिविनाइल क्लोराइड प्रोजेक्टसाठी पुढच्या सहा महिन्यांत पैसे जमा केले जातील, असं अदाणी ग्रुपनं सांगितलंय. मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष संपल्यानंतर म्हणजेच मार्च २०२३ नंतर प्लांटसंदर्भात खरेदी आणि इतर हालचाली सुरू होतील. निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यामुळे अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी आली आहे. अदाणी ग्रुपच्या शेअर्सची स्थिती आज चांगली दिसत आहे. त्यांचा एक शेअर्स तर अप्पर सर्किटवर पोहोचला आहे. अदाणी ग्रीन एनर्जी ५ टक्क्यांच्या मजबुतीसह बीएसईवर ८९१.१५ रुपयांच्या अप्पर सर्किटवर आहे. बाकीचे शेअर्स हिरव्या चिन्हात व्यापार करीत आहेत. अदाणी समूहाची मुख्य कंपनी असलेल्या अदाणी एंटरप्रायझेस ०.९४ टक्क्यांच्या उसळीसह १८२२.०५ रुपये, अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन ०.१३ टक्क्यांच्या मजबुतीसह ६६७.६५ रुपये, अदाणी टोटल गॅस ४.१६ टक्क्यांनी वाढून ८८८.६० रुपयांवर व्यापार करीत आहेत. त्याशिवाय अदाणी पॉवर २.२६ टक्क्यांनी वाढून १९४.६० रुपये, अदाणी ट्रान्समिशन १.३० टक्क्यांनी उसळी घेत १०२२.७५ रुपये, अदाणी विल्मर १.०९ टक्क्यांच्या मजबुतीसह ४१८.३५ रुपयांच्या भावावर आहे. नेमकं प्रकरण काय? न्यूज एजन्सी पीटीआयनं रविवारी माहिती दिली होती की, अदाणी ग्रुपने मुंद्रामध्ये ३४,९०० कोटी रुपयांच्या पेट्रोकेमिकल प्रोजेक्टचं काम थांबवलं आहे. परंतु अदाणी समूहानं त्या वृत्ताचं खंडन केलंय. तिथे अदाणी ग्रुपची मुख्य कंपनी असलेली अदाणी एंटरप्रायझेस एक प्लाँट तयार करीत आहे. या पेट्रोकेमिकल प्लांटमध्ये इंजिनीअरिंग डिझाइन आणि इतर गोष्टींवर वेगानं काम सुरू आहे. परंतु अदाणी ग्रुपनं खरेदीदार आणि बांधकाम हालचालींना निधी मिळेपर्यंत प्लाँटचं काम थांबवलं आहे. पॉलिविनाइल क्लोराइडचा वापर फूड कंटेनर्सपासून सांडपाण्याचे पाइप्ससारख्या प्लॅस्टिकच्या वस्तू बनवण्यासाठी होत असतो. भारतात हे मोठ्या प्रमाणात आयात केलेलं कच्चे तेल आणि इतर फीडस्टॉकपासून बनवले जाते.