AI shift will take employees Job: एआय तंत्रज्ञान अर्थात कृत्रिम प्रज्ञा किंवा कृत्रिम बुद्धिमता अनेकांसाठी सोयीचे असले तरी यामुळे काही जणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. याबद्दलचे भाकीत तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत होते. मात्र आता याची प्रचिती सत्यात उतरू लागली आहे. भारतातील एका मोठ्या टेक कंपनीने थोडे थोडके नाही तर तब्बल १२ हजार कर्मचाऱ्यांना घरी पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे एआय किती विघातक असू शकते, याबद्दलची धक्कादायक परिस्थिती समोर येत आहे. योगायोगाने आजच राजकीय क्षेत्रातूनही एआयवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसचने नेते नाना पटोले यांनी एआयमुळे ४ ते ५ कोटी लोक बेरोजगार होतील, असे म्हटले आहे.

भारतातील सर्वात मोठी टेक कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) तिच्या एकून कर्मचाऱ्यांपैकी दोन टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुढील वर्षभरात १२ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. यात बहुतेक करून मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील कर्मचारी असतील, असे सांगितले जात आहे.

टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. कृतिवासन यांनी मनीकंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, जलद गतीने बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानाला आत्मसात करण्यासाठी आणि त्यावर निर्णय घेण्यासाठी कंपनीने काही तातडीचे पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी नव्या बाजारपेठेत प्रवेश करणार आहे. तसेच काही कामांसाठी एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे.

दरम्यान कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात करण्यात येणार असली तरी सध्या क्लाईंटच्या कामावर कोणताही परिणाम होणार नाही, असेही टीसीएसने सांगितले आहे. मनीकंट्रोलच्या मुलाखतीमध्ये कृतिवासन यांना कर्मचारी कपातीचे कारण विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, काम करण्याची पद्धत झपाट्याने बदलत आहे. कंपनीला यश प्राप्त करून द्यायचे असेल आणि भविष्यातील आव्हानांसाठी तयार व्हायचे असेल तर काही कठीण निर्णय घ्यावे लागतात.

AI मुळे नोकरकपातीचा निर्णय?

कृतिवासन पुढे म्हणाले, आम्ही एआय आणि ऑपरेटिंग मॉडेलसारख्या नव्या तंत्रज्ञानाची मागणी करत आहोत. भविष्यात आवश्यक असलेल्या कौशल्यांचे बारकाईने मूल्यांकन करत मोठ्या प्रमाणात एआय तंत्रज्ञान स्वीकारले जाईल, असेही ते म्हणाले. दरम्यान नोकरकपातीसाठी थेट एआय तंत्रज्ञान जबाबदार नसल्याचेही त्यांनी सांगितले. याबद्दल बोलताना कृतिवासन म्हणाले की, भविष्यातील कौशल्यांना जोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेशी याचा काही संबंध नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीसीएसचे कर्मचारी किती?

जून २०२५ पर्यंत टीसीएसचे जगभरात ६,१३,००० कर्मचारी होते. कंपनीने २ टक्के नोकरकपात करणार असल्याचे सांगितले आहे. यानुसार ही संख्या १२,२०० वर जाते. कृतिवासन यांनी सांगितल्यानुसार, कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना धक्का न लावता वरिष्ठ आणि मध्य श्रेणीतील कर्मचाऱ्यांना काढले जाऊ शकते.