केंद्र सरकारच्या ऑनलाइन गेमिंग विधेयकाला लोकसभा आणि राज्यसभेने मंजुरी दिल्यानंतर, भारतातील आघाडीच्या रिअल मनी गेमिंग कंपन्या, ड्रीम११ ची मूळ कंपनी ड्रीम स्पोर्ट्स, गेम्सक्राफ्ट, मोबाइल प्रीमियर लीग आणि झुपी यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर पैशांचा समावेश असलेल्या स्पर्धा आणि गेम स्थगित करण्यास सुरुवात केली आहे.
ड्रीम स्पोर्ट्सने ड्रीम पिक्सवरील सर्व ‘पे टू प्ले’ स्पर्धा स्थगित केल्या आहेत, हे नुकतेच लाँच केलेले फॅन्टसी स्पोर्ट्स ॲप आहे जे युजर्सना चार खेळाडूंचा संघ तयार करू देते आणि दोन्ही डावांमध्ये स्पर्धा करू देते. कंपनी त्यांचे कॅज्युअल रिअल मनी गेमिंग ॲप, ड्रीम प्ले देखील निलंबित करत आहे. दोन्ही ॲप्स अलिकडच्या काही महिन्यांत फॅन्टसी स्पोर्ट्स मेजरने लाँच केले होते.
ड्रीम११ ने काय सांगितले?
दरम्यान ड्रीम११ ने एक त्यांच्या ॲपवर एक सूचना जाहीर केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, “ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक २०२५, च्या संबंधित घडामोडी लक्षात घेता, आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरील सर्व ‘पे टू प्ले’ फॅन्टसी स्पोर्ट्स स्पर्धा थांबवत आहोत. तुमचे खात्यातील शिल्लक रक्कम सुरक्षित आहे आणि तुम्ही ड्रीम११ ॲपमधून पैसे काढू शकता.”
राष्ट्रपतींच्या संमतीनंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर ड्रीम स्पोर्ट्स त्यांच्या प्रमुख ड्रीम११ ॲपवरील सशुल्क स्पर्धा स्थगित करण्याची योजना आखत आहे, असे सूत्रांनी सांगितल्याचे वृत्त मनीकंट्रोलने दिले आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २३ मध्ये ६,३८४ कोटी रुपयांच्या ऑपरेटिंग महसुलावर १८८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला. दरम्यान ड्रीम स्पोर्ट्सने यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

एमपीएल वरील पैसे काढता येणार का?
दरम्यान, रिअल मनी गेमिंग प्लॅटफॉर्म मोबाइल प्रीमियर लीगने सांगितले की, त्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील पैशांशी संबंधित सर्व गेमिंग ऑफर निलंबित केल्या आहेत. “यापुढे ॲप नव्याने पैसे जमा करता येणार नाहीत, परंतु युजर्स त्यांची शिल्लक रक्कम काढू शकतील”, असे त्यांच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. याबाबतही मनी कंट्रोलच्या वृत्तात उल्लेख आहे.
एमपीएल त्यांच्या अँड्रॉइड आणि आयओएस ॲप्सवर डेली फॅन्टसी स्पोर्ट्स, क्विझिंग, बोर्ड गेम्स, पझल आणि कॅज्युअल गेम्स अशा विविध श्रेणींमध्ये ६० हून अधिक गेम चालवते.
‘अॅड कॅश’ सेवा बंद
बेंगळुरूस्थित गेम्सक्राफ्ट त्यांच्या रमी ॲप्सवरील ‘अॅड कॅश’ आणि ‘गेमप्ले सेवा’ देखील थांबवत आहे, ज्यामध्ये रमीकल्चरचा समावेश आहे.