CBI Raids On Anil Ambani’s Mumbai Home: १७ हजार कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी सकाळी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापा टाकला. सकाळी ७ वाजताच्या सुमारास अधिकारी कफ परेड येथील सीविंड येथील अंबानी यांच्या निवासस्थानी पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सात ते आठ अधिकारी अंबानी यांच्या निवासस्थानाची झडती घेत आहेत. शोधमोहीम सुरू असताना अंबानी आणि त्यांचे कुटुंबीयही निवासस्थानी उपस्थित होते. कथित बँक फसवणूक प्रकरणाच्या चौकशीचा एक भाग म्हणून सीबीआयची ही कारवाई करत आहे.

या प्रकरणात स्टेट बँकेला २००० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. एसबीआयने १३ जून रोजी आरकॉम आणि अनिल अंबानी यांना “फ्रॉड” म्हणून वर्गीकृत केले होते आणि २४ जून रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (आरबीआय) अहवाल पाठवला होता.

आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँकेने एखाद्या खात्याला “फ्रॉड” म्हणून वर्गीकृत केल्यानंतर, कर्ज देणाऱ्याने याचा शोध लागल्यानंतर २१ दिवसांच्या आत आरबीआयला कळवावे आणि सीबीआय किंवा पोलिसांनाही प्रकरणाची तक्रार करावी.

तत्पूर्वी, २४ जुलै रोजी, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) १७,००० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगच्या चौकशीसंदर्भात त्यांच्या कंपन्यांशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते, त्यानंतर ते ईडीसमोर हजर झाले होते.

१७,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या अनेक बँक कर्ज घोटाळ्यांशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीत ५ ऑगस्ट रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अंबानी यांची सुमारे १० तास चौकशी केल्यानंतर हे छापे टाकण्यात आले आहेत. दरम्यान, हे व्यवहार चौकशी टाळण्यासाठी केले गेले होते का याची ईडी तपासणी करत आहे, कारण या प्रकरणाची कर्जदार, कॉर्पोरेट्स आणि संबंधित वित्तीय संस्थांमध्ये व्याप्ती वाढत आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबानी यांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी १० दिवसांची मुदत मागितली होती, परंतु तपासकर्त्यांना अद्याप खात्री पटलेली नाही. ईडीला येस बँकेने दिलेल्या कर्जांमध्ये अनियमितता आणि शेल कंपन्यांद्वारे निधी वळवल्याची शक्यता असल्याचा संशय आहे.

प्राथमिक चौकशीत असे दिसून आले की, येस बँकेचे ३,००० कोटी रुपये कर्ज (२०१७ ते २०१९ दरम्यान वितरित झालेले) चुकीच्या पद्धतीने वळवण्यात आले आहे.