जीएसटी परिषदेची ५६ वी बैठक बुधवारी दिल्लीत सुरु झाली. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटीचे आता फक्त दोन स्लॅब असतील. ५ टक्के जीएसटी आणि १८ टक्के जीएसटी. १२ आणि २८ टक्के जीएसटीचा स्लॅब सरकारने संपुष्टात आणला आहे. दरम्यान सिगारेटचे दर चटका देणारे असणा आहेत. तर मद्यही महाग होणार आहे. आपण जाणून घेऊ.

धूम्रपान करणाऱ्यांना चटका

सरकारने जीएसटीच्या दरांमध्ये जे बदल केले आहेत त्यामुळे सातत्याने धूम्रपान करणाऱ्या लोकांचं आणि तंबाखू तसंच तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. याचं कारण येत्या २२ तारखेपासून सिगारेट, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांवर १२ किंवा १८ नाही तर थेट ४० टक्के जीएसटी लागणार आहे. पान मसाला, जर्दा, तंबाखू, सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ या सगळ्यांवर आधी २८ टक्के जीएसटी होता जो आता थेट ४० टक्के करण्यात आला आहे. Sin Goods वर ४० टक्के जीएसटी अशी तरतूद केंद्र सरकारने केली आहे. त्यामुळे आता धूम्रपान करणाऱ्यांच्या सिगारेटचा पफ हा आता दिलासा नाही तर चटका देणारा ठरणार आहे. मद्याचं काय? हा प्रश्न मद्यप्रेमींनाही पडला असेलच. त्याबाबतही जाणून घेऊ.

मद्याचे दर वाढणार का?

मद्याच्या दरांवर उत्पादन शुल्क लावलं जातं. हा कर राज्य सरकार लावत असतं. त्यामुळे मद्याचे दर जैसे थे राहणार का हे आता जीएसटीची अंमल बजावणी २२ सप्टेंबरपासून होईल त्यानंतरच ठरु शकणार आहे. राज्य सरकारने कर वाढवले तर मद्याचे दरही वाढण्याची शक्यता आहे.

कॅसिनो, रेस क्लब यांवर ४० टक्के जीएसटी

कॅसिनो, रेस क्लब, आयपीएल सारख्या क्रीडा स्पर्धा, जुगार, घोड्यांच्या शर्यती आणि लॉटरी यासारख्या उच्च-मूल्याच्या सेवांवरील कर २८% वरून ४०% पर्यंत वाढू शकतो, ज्यासोबत आयटीसी देखील असेल. हे पाऊल लक्झरी आणि गेमिंग उद्योगावर सरकारचे लक्ष असल्याचं उदाहरण आहे. त्यामुळे या भागातून महसूल उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर, १०,००० रुपयांच्या कॅसिनो तिकिटावर आता २,८०० रुपयांऐवजी ४,००० रुपयांचा कर येईल, जो जुगार प्रेमींना धक्कादायक ठरू शकतो. सध्याच्या जीएसटी प्रणालीमध्ये ५%, १२%, १८% आणि २८% असे चार स्लॅब आहेत, परंतु १२% आणि २८% काढून टाकल्याने कर रचना अधिक स्पष्ट होण्याची चिन्हं आहेत. आता या नव्या बदलांचा कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. टाइम्स नाऊने हे वृत्त दिलं आहे.