Dream Money App Launched By Dream11 Parent Company: ड्रीम११ ची मूळ कंपनी असलेल्या ड्रीम स्पोर्ट्सने ‘ड्रीम मनी’ नावाच्या एका नवीन पर्सनल फायनान्स अ‍ॅपची चाचणी सुरू केली आहे, जे लोकांना सोने आणि मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्यास आणि त्यांच्या दैनंदिन खर्चाचा मागोवा ठेवण्यास मदत करेल. याबाबत मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तात उल्लेख आहे.

कंपनीने त्यांचे मुख्य फॅन्टसी स्पोर्ट्स अ‍ॅप, ड्रीम११ वर सर्व सशुल्क स्पर्धा बंद केल्या आहेत. यानंतर कंपनी नवीन क्षेत्रांमध्ये विस्तार करण्याचा विचार करत असून, त्याचाच भाग म्हणून हे पाऊल उचलले आहे. भारताच्या नवीन ऑनलाइन गेमिंग कायद्याचे पालन करण्यासाठी ते आता फक्त फ्री-टू-प्ले सोशल गेम चालवतात. शुक्रवारी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपयांतर झाले. या कायद्यात पैसे जिंकण्याच्या उद्देशाने रिअल मनी डिपॉझिट असलेल्या ऑनलाइन गेमवर बंदी घालण्यात आली आहे.

ड्रीम मनी अ‍ॅपद्वारे, युजर्स सोन्यात गुंतवणूक करू शकतात किंवा फक्त १० रुपयांपासून दररोज किंवा मासिक सुरू होणारा एसआयपी (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) सुरू करू शकतात. यासाठी, ड्रीम स्पोर्ट्सने ऑगमॉन्ट या डिजिटल गोल्ड ट्रेडिंग प्लॅटफॉर्मशी करार केला आहे.

याशिवाय, ड्रीम मनीने सेबी-नोंदणीकृत एआय गुंतवणूक मार्गदर्शक सिग्फिनसोबत भागीदारी केली आहे जेणेकरून युजर्सना त्यांचे खर्च, उत्पन्न आणि गुंतवणूक एकाच ठिकाणी ट्रॅक करण्यास मदत होईल.

या अ‍ॅपद्वारे युजर्सना बँक खात्याशिवाय १००० रुपयांपासून सुरू होणाऱ्या मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा मिळते आणि हे पैसे कधीही काढता येतात, असे मनीकंट्रोलच्या वृत्तात म्हटले आहे.

कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “भारताला जागतिक क्रीडा महासत्ता” बनवण्याच्या महत्त्वाकांक्षेचा आदर करतात आणि त्यांना कंपनीचा पाठिंबा आहे आणि म्हणूनच ते कायद्यानुसार चालत आहेत.

कंपनीने शुक्रवारी सकाळी ड्रीम११ वरील सर्व पेड गेम्स बंद केल्याची घोषणा केली आणि असेही म्हटले की, त्यांचा हिस्सा अमेरिकेतील फॅन्टसी स्पोर्ट्स मार्केटच्या १% इतका देखील नाही.

पंतप्रधान मोदींनी गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक, २०२५ मंजूर झाल्याचे कौतुक केले आणि हे एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे म्हटले. आता हा कायदा ऑनलाइन मनी गेमिंगच्या नकारात्मक परिणामापासून समाजाचे रक्षण करत ई-स्पोर्ट्सला चालना देईल, असेही त्यांनी नमूद केले.