वृत्तसंस्था, नवी दिल्ली
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ११३ कोटी रुपयांचे मानधन मिळाले आहे. त्यात कंपनीच्या नफ्यावर मिळालेल्या १०० कोटी रुपयांच्या कमिशनचाही समावेश आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात चंद्रशेखरन यांना १०९ कोटी रुपयांचे मानधन मिळाले होते.
टाटा समुहाची पालक कंपनी टाटा सन्सच्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार, टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांना दिवसाला सरासरी ३० लाख रुपयांचे मानधन मिळाले आहे. कार्यकारी संचालक सौरभ अग्रवाल यांना २७.८२ कोटी रुपयांचे मानधन मिळाले असून, त्यात २२ कोटी रुपयांच्या कमिशनचा समावेश आहे. कंपनीचे बिगर कार्यकारी संचालक व टीव्हीएस ग्रुपचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांनी २०१६ पासून कोणतेही मानधन घेतलेले नाही.
हेही वाचा – जुलैमध्ये ‘एसआयपी’ ओघ विक्रमी १५,००० कोटींवर
पिरामल ग्रुपचे अध्यक्ष व अब्जाधीश उद्योगपती हेही टाटा सन्सचे बिगर कार्यकारी संचालक असून, त्यांनी मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये २.८ कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे. टाटा सन्सचे संचालक विजय सिंह, हरीश मनवाणी, लिओ पुरी, भास्कर भट आणि राल्फ स्पेथ यांना मागील आर्थिक वर्षात प्रत्येकी २.८ कोटी रुपयांचे मानधन देण्यात आले आहे. कंपनीच्या स्वतंत्र संचालक अनिता जॉर्ज यांची नियुक्ती जुलै २०२२ मध्ये झाली असून, त्यांना २.१ कोटी रुपयांचे मानधन मिळाले आहे.