देशातील सर्वसाधारण विमा क्षेत्रात आणखी काही कंपन्यांचा प्रवेश होऊ घातला आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडून (इर्डा) नुकताच क्षेम जनरल इन्शुरन्स कंपनीला परवाना बहाल करण्यात आला असून, आयुर्विमा क्षेत्रात दोन कंपन्या मंजुरी मिळविण्याच्या उंबरठ्यावर असून, नियामकांकडून एकूण २० अर्जांवर विचार सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

‘इर्डा’चे अध्यक्ष देवाशीष पांडा यांनी फिक्की या उद्योग संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बुधवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, नुकताच परवाना देण्यात आलेल्या क्षेम जनरल इन्शुरन्स कंपनीबरोबरीने, चालू वर्षात क्रेडिट ॲक्सेस लाइफ आणि ॲको लाइफ या आयुर्विमा क्षेत्रातील दोन नवीन कंपन्यांना परवाना दिला गेला आहे.

याआधी आयुर्विमा क्षेत्रासाठी नवीन कंपनीला परवाना २०११ मध्ये देण्यात आला होता. सध्या देशात २३ आयुर्विमा आणि ३३ सर्वसाधारण विमा कंपन्या कार्यरत आहेत. फेब्रुवारी २०२३ अखेर या कंपन्यांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता ५९ लाख कोटी रुपये आणि त्यांचे विमा हप्ता मूल्य १० लाख कोटी रुपये होते. विमा हप्ता मूल्यात वर्षागणिक १६ टक्के वाढ नोंदवण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वांसाठी २०४७ पर्यंत विमा या उद्दिष्टाकडे फक्त घोषणा म्हणून विमा उद्योगाने पाहू नये. हे उद्दिष्ट प्रत्यक्षात येण्यासाठी विमा उद्योगाने आतापासून पावले उचलावीत. – देवाशीष पांडा, अध्यक्ष, भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण (इर्डा)