मुंबई : बहुतांश म्हणजे तब्बल ८८ टक्के लार्ज-कॅप इक्विटी म्युच्युअल फंड सरलेल्या वर्षात (२०२२) कामगिरीच्या बाबतील मानदंड निर्देशांकाला (बेंचमार्क) मागे टाकण्यात अयशस्वी ठरले, सक्रियपणे व्यवस्थापित या फंडांनी सरलेल्या वर्षात ‘एस अँड पी बीएसई १००’ या मानदंड निर्देशांकाच्या तुलनेत कमी परतावा दिला, असे मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या एस अँड पी डाऊ जोन्स निर्देशांकाच्या अभ्यास अहवालाने स्पष्ट केले.
याच काळात मिड/स्मॉलकॅप इक्विटी फंडांनी मात्र ‘एस अँड पी बीएसई ४०० मिड-स्मॉलकॅप निर्देशांका’च्या तुलनेत २ टक्के अधिक परतावा दिला. तर या श्रेणीतील ५५ टक्के सक्रिय व्यवस्थापित फंडांनीदेखील या कालावधीत निर्देशांकापेक्षा खराब कामगिरी केली. सरलेल्या २०२२ मध्ये ‘एस अँड पी बीएसई २०० निर्देशांका’त ६ टक्क्यांनी वाढ झाली आणि तर इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम अर्थात ईएलएसएस फंडांनी या मानदंड निर्देशांकाच्या तुलनेत निराशाजनक कामगिरी राहिली.‘एस अँड पी इंडायसेस व्हर्सेस ॲक्टिव्ह (स्पिव्हा) फंड्स इंडिया स्कोअरकार्ड २०२२’ या शीर्षकाच्या या अहवालानुसार, एस अँड पी बीएसई इंडिया बाँड इंडेक्सच्या तुलनेत भारतातील कंपोझिट बाँड फंडांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
भारतीय भांडवली बाजाराने २०२२ मध्ये बहुतांश जागतिक भांडवली बाजारांच्या तुलनेत खूप चांगली कामगिरी केली. मुख्य इक्विटी आणि निश्चित उत्पन्न मानदंड निर्देशांक पहिल्या सहामाहीत घसरले, तरीही त्यांनी वर्षाच्या उत्तरार्धात उल्लेखनीय उभारी दर्शवली. व्याजदर वाढ आणि कर्ज देण्याची मानके अधिक कडक झाल्याने लहान कंपन्यांवर त्याचा सर्वाधिक दुष्परिणाम झाला. परिणामी ‘एस अँड पी बीएसई ५०० मिड-स्मॉलकॅप निर्देशांका’ने बड्या कंपन्यांचा समावेश असलेल्या ‘बीएसई २०० निर्देशांका’पेक्षा ४ टक्क्यांनी सुमार कामगिरी नोंदवली, अशी माहिती एसअँडपी डाऊ जोन्स इंडायसेसचे गुंतवणूक रणनीतीकार संचालक बेनेडेक व्होरोस यांनी दिली.
अहवालानुसार, २०२२ मध्ये एस अँड पी बीएसई इंडिया गव्हर्नमेंट बाँड इंडेक्स जवळजवळ तीन टक्क्यांनी वाढला. विशेष म्हणजे, एक तृतीयांशापेक्षा कमी सक्रिय व्यवस्थापित फंडांची कामगिरी या निर्देशांकापेक्षा सरस राहिली.