पुणे : टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लिमिटेडची ब्रिटिश उपकंपनी आर्टिफेक्स इंटिरियर सिस्टिम्स लिमिटेडने (आर्टिफेक्स) स्लोव्हाकियातील आयएसी ग्रुप ताब्यात घेण्याची घोषणा केली आहे. या कंपनीतील शंभर टक्के भागभांडवल अधिग्रहित करण्यासाठी आर्टिफेक्सने सशर्त करार केला आहे.
या धोरणात्मक अधिग्रहणामुळे टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्सची क्षमता वाढणार होणार असून, ब्रिटन व युरोपमधील बाजारपेठेत कंपनीच्या विस्तारास मदत होणार आहे. या पावलामुळे टाटा ऑटोकॉम्पच्या महत्त्वाकांक्षी वाढीच्या योजनांना चालना मिळणार आहे. या अधिग्रहणाची पूर्तता नियामक मंजुरींसह काही सशर्त अटींवर अवलंबून आहे.
याबाबत टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लिमिटेडचे उपाध्यक्ष अरविंद गोयल म्हणाले की, आयएसी ग्रुपचे अधिग्रहण हे टाटा ऑटोकॉम्पच्या जागतिक वाढीच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल. यापूर्वीच्या आर्टिफेक्सच्या अधिग्रहणानंतरचे हे पाऊल आमची युरोपमधील उपस्थिती अधिक मजबूत करेल. या माध्यमातून आम्हाला जागतिक पातळीवरील वाहन निर्मिती कंपन्यांना अधिक प्रभावीपणे सेवा देता येईल. आयएसी ग्रुपची कार्यान्वयन क्षमता, कुशल मनुष्यबळ आणि धोरणात्मक भौगोलिक स्थान आमच्या इंटेरिअर सिस्टिम्स पुरविण्याच्या क्षमतेत वाढ करेल. या पावलामुळे जागतिक वाहन पुरवठा साखळीत आमचे स्थान आणखी बळकट होईल.
टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कोल्हटकर म्हणाले की, आयएसी ग्रुुपच्या क्षमतांचा वापर युरोपमधील आमच्या विस्तारासाठी होईल. दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया वेगाने पार पाडली जाईल. आमच्या वाहन निर्मिती क्षेत्रातील ग्राहकांना यामुळे मूल्यवर्धित सेवा जलद गतीने देता येईल.