scorecardresearch

अदाणी समुहाच्या प्रकरणावर निर्मला सीतारमण यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “भारताची आर्थिक स्थिती…”

“एलआयसी आणि एसबीआयची अदाणी समूहात गुंतवणूक…”

sitharaman
निर्मला सीतारमण ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

अमेरिकास्थित गुंतवणूक सल्लागार संस्था ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहावर फसवे व्यवहार आणि समभागांच्या किमती फुगवणाऱ्या लबाड्यांसह अनेक आरोप केले आहेत. परिणामी अदाणी समूहाच्या बहुतांश कंपन्यांचं समभाग घसरले आहेत. त्यामुळे अदाणी समूहाच्या १० कंपन्यांचं तब्बल ८.७६ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. तसेच, ‘हिडेंनबर्ग’च्या आरोपांनतर लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घालत चौकशीची मागणी केली आहे. यावर आता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भाष्य केलं आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की, “भारताची आर्थिक परिस्थिती चांगल्या स्थितीत आहे. गौतम अदाणी यांच्यासंबंधी सुरु असलेल्या वादामुळे गुंतवणूकदारांवर कोणताही परिणाम होणार नाही. जागतिक स्तरावर काहीही बोललं तरी, भारताची आर्थिक बाजारपेठ ही किती सुस्थितीत आहे, याच्यासारखं उत्तम उदाहरण कोठेही नसणार,” असं सीतारमण यांनी म्हटलं.

हेही वाचा :  Adani Shares: अदाणींच्या शेअर्सची वाताहत सुरूच; एकूण ११८ अब्ज डॉलर्सचा फटका!

“भारतीय जीवन आयुर्विमा ( एलआयसी ) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ( एसबीआय ) यांच्या प्रमुखांनी अदाणी समूहातील गुंतवणूकीबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. एलआयसी आणि ‘एसबीआय’ची अदाणी समूहात गुंतवणूक ही मर्यादेतच आहे. बँक आणि एलआयसी दोन्ही फायद्यात आहे,” असं निर्मला सीतारमन यांनी स्पष्टीकरण दिलं.

“‘एसबीआय’ने अदाणी समूहाला दिले २१ हजार कोटी रुपये”

दरम्यान, ‘एसबीआय’ने अदाणी समूहाला दिलेल्या कर्जाची माहिती दिली आहे. अदाणी समूहाला ‘एसबीआय’ने २.६ बिलियन डॉलर ( २१ हजार कोटी रुपये ) कर्ज दिलं आहे. तसेच, २०० मिलियन परदेशी युनिटचा देखील सहभाग ‘एसबीआय’ने दिलेल्या कर्जात आहे.

हेही वाचा : ‘Hindenburg’च्या आरोपांनंतर अदाणी समूहाकडून ४१३ पानांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “हा भारतावर…”

“बँकेने दिलेल्या कर्जाबद्दल कोणतीही…”

‘एसबीआय’चे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांनी सांगितलं, “अदाणी समूह आपल्या कर्जाची परतफेड करत आहे. बँकेने दिलेल्या कर्जाबद्दल कोणतीही काळजी करण्याचं कारण आता दिसत नाही.” पण, गुरुवारी रिझर्व्ह बँकेने ( आरबीआय ) अदाणी समूहाला दिलेल्या कर्जाला तपशील सादर करण्याचे आदेश सर्व बँकांना दिले आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त ( Finance ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 20:09 IST