मुंबई : स्पेन आणि युरोपीय महासंघातही अमूलचे दूध उपलब्ध करण्यासाठी गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड अर्थात अमूलने स्पेनच्या कोऑपरेटिव्हा गणदेरा डेल व्हॅले डे लॉस पेड्रोचेस (सीओव्हीएपी) या सहकारी कंपनीशी भागीदारी बुधवारी घोषित केली.
या भागीदारीद्वारे, सुरुवातीला माद्रिद, बार्सिलोना आणि त्यानंतर पोर्तुगालमधील मालागा, व्हॅलेन्सिया, एलिकॅन्टे, सेव्हिल, कॉर्डोबा आणि लिस्बन येथे अमूलची उत्पादने उपलब्ध होतील.भविष्यात, जर्मनी, इटली आणि स्वित्झर्लंडसह इतर युरोपीय देशांमध्ये उत्पादनांच्या विक्रीची योजना अमूलकडून आखली जात आहे.
युरोपमध्ये अमूलचे ताजे दूध मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमूलवरील वाढता विश्वास आणि संयुक्त राष्ट्रांने घोषित केलेल्या २०२५ च्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात, अमूल युरोपात उत्पादने उपलब्ध करणार आहे. स्पॅनिश कंपनी सीओव्हीएपीसोबत सहयोग करताना खूप सन्मान आणि आनंद होत आहे, असे अमूलचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता म्हणाले.