लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
पुणे : अनेक वर्षे भागीदारी सुरू असलेल्या प्रीमियम आणि स्पोर्ट्स दुचाकींची ऑस्ट्रियाची नाममुद्रा ‘केटीएम’वर ताबा मिळविण्याचा निर्णय बजाज ऑटोने घेतल्याचे गुरुवारी संकेत दिले. बजाज ऑटोची उपकंपनी बजाज ऑटो इंटरनॅशनल लिमिटेड होल्डिंग्ज बीव्हीकडून हा संपादन व्यवहार होणार आहे.
याबाबत बजाज ऑटोने म्हटले आहे की, जागतिक पातळीवरील केटीएम कंपनीत बजाज ऑटोचा हिस्सा होता. आता संपूर्ण मालकी हिस्सा बजाज ऑटो विकत घेणार आहे. यातूनच्या केटीएमच्या सध्याच्या व्यवसायाला गती दिली जाणार आहे. केटीएम दुचाकींचे उत्पादन आणि विक्रीचा व्यवसाय हा भारताबाहेरून चालतो. केटीएम नेटवर्कच्या माध्यमातून भारतासोबत जगभरातील ८० देशामंमध्ये या दुचांकीच्या विक्री केली जाते. त्याला यापुढील काळात बळ दिले जाईल.
बजाज ऑटो इंटरनॅशनल लिमिटेड होल्डिंग्ज बीव्ही कंपनीकडून केटीएमला ८० कोटी युरोचा मोबदला दिला जाणार आहे. त्यातून केटीएमच्या कर्जाची पुनर्रनचा केली जाणार आहे. याला ऑस्ट्रियातील न्यायालयाने मंजुरी दिली आहे. कंपनीच्या व्यवसायाचे पुनरूज्जीवन आणि भांडवलासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. या ८० कोटी युरोच्या निधीपैकी २० कोटी युरो आधीच देण्यात आले असून, आता ६० कोटी युरो देण्यात आले, असे बजाज ऑटोने नमूद केले आहे.