पीटीआय, नवी दिल्ली
दुचाकी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या बजाज ऑटोने पुन्हा एकदा लोकप्रिय दुचाकी बजाज चेतकचा पुरवठा सर्व वितरकांकडे सुरळीत सुरू झाल्याचे सांगितले आहे. दुर्मिळ खनिज चुंबकाच्या पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे निर्माण झालेल्या अडचणींवर मात करून बजाज ऑटोने पुरवठा सुरळीत झाल्याचे शुक्रवारी सांगितले.

चीन सरकारने एप्रिलमध्ये दुर्मिळ खनिज चुंबकाच्या निर्णयातीवर निर्बंध लादले होते. शिवाय सात दुर्मिळ खनिज चुंबक आणि संबंधित चुंबकांसाठी विशेष निर्यात परवाने अनिवार्य केले आहेत. परिणामी आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज उपलब्धतेशी संबंधित तात्पुरत्या पुरवठ्याच्या अडचणींमुळे पुरवठा कमी झाला. चेतकच्या वाढत्या मागणीमुळे पुरवठ्यावर आणखी दबाव निर्माण झाला, असे बजाज ऑटोने म्हटले आहे.

मात्र विद्यमान महिन्यात २० ऑगस्ट रोजी उत्पादन आणि शिपमेंट पुन्हा सुरू झाले, ज्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने पूर्ण क्षमतेने परतणे शक्य झाले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. येत्या सणासुदीच्या हंगामात उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी दुर्मिळ खनिज चुंबकाचा आणि इतर प्रमुख साहित्यांचा पुरेसा पुरवठा होईल याची व्यवस्था करण्यात आली आहे. चेतकची मागणी मजबूत राहिली आहे, पुरवठा सामान्य झाला आहे आणि बुकिंगच्या तुलनेत डिलिव्हरी सुरू झाली आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी  उत्पादन वाढवत असल्याचे बजाज ऑटोचे अध्यक्ष एरिक वास म्हणाले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरच्या पार्श्वभूमीवर, इलेक्ट्रिक वाहनांचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या दुर्मिळ खनिज चुंबकाच्या निर्यातीवर चीनने निर्बंध लादले आहेत, त्याचा फटका भारतातील वाहन उत्पादकांसह जागतिक वाहन उत्पादकांना बसला आहे. प्रवासी वाहनांच्या विविध निर्मिती प्रक्रियांमध्ये वापरल्या जाणाऱ्या दुर्मिळ खनिज चुंबकाच्या आयातीसाठी चीन सरकारकडून जलद मंजुरीसाठी वाहन उद्योगाने सरकारी मदत मागितली आहे. इलेक्ट्रिक मोटर्स, ब्रेकिंग सिस्टम, स्मार्टफोन आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञानामध्ये आवश्यक असलेले समारियम, गॅडोलिनियम, टर्बियम, डिस्प्रोसियम आणि ल्युटेशियम हे महत्त्वाचे घटक आहेत.

सरकार दरबारी प्रयत्न

भारतात दुर्मिळ खनिज चुंबकांच्या उत्पादनाला उत्तेजन म्हणून १,३४५ कोटी रुपयांच्या अनुदान योजनेसाठी आंतर-मंत्रालयीन सल्लामसलत सुरू आहे आणि दोन निवडक उत्पादकांना यातून प्रोत्साहन दिले जाण्याचे प्रस्तावित आहे. अणुऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा सार्वजनिक उपक्रम ‘इंडियन रेअर अर्थ मॅग्नेट लिमिटेड’ हा भारतातील दुर्मिळ खनिजाचा एकमेव भांडार आहे. प्रस्तावित योजनेतून चुबंकाच्या उत्पादनाची सुविधा स्थापन करण्यासाठी गुंतवणूक सुलभ होणे अपेक्षित आहे. चीनने अलिकडेच महत्त्वाच्या धातूंच्या निर्यातीवर निर्बंध लादल्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये वाहन उद्योग आणि सेमीकंडक्टर चिप्सच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात व्यत्यय आला आहे.