मुंबईः डिस्प्ले तंत्रज्ञानांतील तैवानची जागतिक आघाडीची कंपनी बेन्क्यू कॉर्पोरेशनचे अंग असलेल्या बेन्क्यू इंडियाने देशातील होम सिनेमा प्रोजेक्टर्स बाजारपेठेबाबत महत्त्वाकांक्षी अंदाज बांधताना, चालू वर्षात निम्मा हिस्सा मिळविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. येत्या तीन वर्षात त्यात दुपटीने वाढ करून, एकूण २०० कोटी रुपयांच्या उलाढाल पातळी गाठण्याची कंपनीला आशा आहे.

कंपनीने होम प्रोजेक्टर श्रेणीतील तिच्या ‘डब्ल्यू’ मालिकेचा विस्तार करीत, डब्ल्यू ५८५० आणि डब्ल्यू ४१०० आय अशा दोन अद्ययावत उत्पादने शुक्रवारी प्रस्तुत केली. दोन्ही ४ के अल्ट्रा एचडी वियोजन असलेले होम प्रोजेक्टर हे घरात बसून सिनेमागृहात बसल्यासारखा चित्रपट प्रक्षेपण पाहण्याचा आनंद ग्राहकांना देतील, असा दावा बेन्क्यू इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजीव सिंग यांनी केला. अगदी छोट्या अंतरावरूनही १०० ते २०० इंच मोठ्या पडद्यावर चित्र-प्रक्षेपणाचे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण त्यांनी अधोरेखित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या २३ वर्षांपासून भारताच्या बाजारात अस्तित्वात असलेल्या बेन्क्यूचा पोर्टेबल प्रोजेक्टर्समध्ये जवळपास ५१ टक्के बाजारहिस्सा आहे. तथापि तंत्रज्ञान व किमतीच्या दृष्टीने प्रीमियम श्रेणीत असलेल्या होम सिनेमा प्रोजेक्टरच्या सध्या सुमारे २०० कोटी रुपयांच्या भारतीय बाजारपेठेत, नवीन उत्पादन विस्तारातून हिस्सेदारी ५० टक्क्यांहून अधिक होईल, असा विश्वास सिंग यांनी व्यक्त केला. ३० ते ३५ टक्के दराने विक्रीत वाढीसह पुढील तीन वर्षात २०० कोटी रुपयांच्या उलाढालीचा टप्पा गाठण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.