मुंबईः आगामी काळात उर्वरित जगासाठी जे प्रतिकूल मानले जाणारे घटकच, भारताच्या दृष्टीने उज्ज्वल व्यवसायसंधी ठरताना दिसतील. विशेषतः गोदरेज समूहाच्या कृषी-रसायने, पाम तेल आणि जैवइंधन व्यवसायासाठी येणारा काळ खूपच उज्ज्वल असेल, असे आश्वासक मत गोदरेज इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि गोदरेज ॲग्रोव्हेटचे अध्यक्ष नादिर गोदरेज यांनी व्यक्त केला.
सध्याच्या जागतिक अनिश्चितता आणि मंदीबाबत केल्या जाणाऱ्या भाकितांच्या पार्श्वभूमीवर तब्बल १२५ वर्षांचा वारसा असलेल्या गोदरेज समूहातील ज्येष्ठ उद्योगधुरीण या नादिर गोदरेज यांनी ‘लोकसत्ता’शी विशेष संवाद साधला. महागाई आणि यंदा जसे भाकीत केले जाते त्याप्रमाणे पाऊस तुटीचा झाल्यास कृषी व्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा काहीसा परिणाम दिसून येईल. शिवाय दूध व्यवसाय सध्या संकटात आहे आणि या आघाडीवरील आव्हानांचा पुढे आणखी काही काळ सामना करावा लागेल. तरी या गोष्टींची भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीला झळ बसून, लक्षणीय प्रमाणात ती बाधित होईल, असे वाटत नसल्याचे गोदरेज म्हणाले.
हेही वाचा >>> RBI नवीन पाच वर्षांचा बाँड आणणार, विक्री ‘या’ तारखेपासून सुरू होणार
उलट नजीकच्या भविष्यात भारतासाठी तसेच गोदरेज इंडस्ट्रीजच्या व्यवसायासाठी दोन उज्ज्वल बाबी ठळकपणे दिसून येतात, अशी पुस्ती गोदरेज यांनी जोडली. जगातील आघाडीच्या ओलिओकेमिकल्स निर्मात्यांपैकी एक गोदरेज समूहासाठी ‘रसायने’ हा सर्वात जुना व्यवसाय आहे. अन्न, औषधी आणि ग्राहकोपयोगी वस्तूंसह अनेक उद्योगांद्वारे कच्चा माल म्हणून वापरल्या जाणाऱ्या या क्षेत्रात, चीनला पर्याय म्हणून भारताला सुसंधी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘संशोधन व विकासावर भर दिल्यामुळे बरेच फायदे आम्हाला मिळाले आहेत. जसे भाजीपाला आणि प्राण्यांच्या चरबीपासून मिळणारी रसायने यावर बेतलेल्या ओलिओकेमिकल्स व्यवसायासाठी सरलेले वर्ष भरघोस यशाचे ठरले.” जगभरात ८० देशांमध्ये ग्राहक असलेल्या फॅटी अल्कोहोलच्या उत्पादनासाठी नवीन प्रकल्पात गुंतवणुकीचे गोदरेज इंडस्ट्रीजचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>> रेरा कायद्यानुसार माहिती न देणाऱ्या १६ हजार प्रवर्तकांना महारेराची नोटीस, १५ दिवसांत पूर्तता करा अन्यथा…
गोदरेज ॲग्रोव्हेटची उपकंपनी ॲस्टेक लाइफ सायन्सेस नवीन संशोधन व विकास केंद्राची स्थापना करत आहे. काही दिवसांत उद्घाटनानंतर हे नवीन केंद्र कार्यान्वित होईल, अशी माहिती नादिर गोदरेज यांनी दिली. “कृषी-रसायनांच्या व्यवसायात विस्तारासाठी आमच्या रणनीतीसाठी ते उपयुक्त ठरेल. चीन मागे हटल्याने कंत्राटी संशोधनासाठी आणि नवीन उत्पादने विकसित करण्याच्या व्यवसायात मोठ्या मुसंडीसाठी ही गुंतवणूक खूपच फलदायी ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तेल भडका पथ्यावरच
गोदरेज ॲग्रोव्हेटमध्ये तेल पाम व्यवसाय झपाट्याने वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. सर्व नर्सरींचा विस्तार सुरू आहे आणि उत्कृष्ट लागवड साहित्यासाठी मलेशियन कंपनीशी बोलणे सुरू असल्याची गोदरेज यांनी माहिती दिली. लागवडीला प्रोत्साहनाचे केंद्र सरकारचे धोरण पाहता, ईशान्येकडील राज्य, तेलंगणामध्ये लागवड क्षेत्र विस्तारण्यावर भर दिला जात असून, आंध्र प्रदेशात या आधीच चांगली उपस्थिती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पामतेलाचा वापर बायोडिझेल तयार करण्यासाठी केला जातो आणि खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती जसजशा वाढत जातील तसे बायोडिझेलला मागणीदेखील वाढते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.