Air India Flight Crashes near Ahmedabad: Boing Dreamliner 787-8 या श्रेणीतील एअर इंडियाचं प्रवासी विमान अहमदाबादजवळच्या मेघानीनगर परिसरात कोसळलं. आज दुपारी दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर एकीकडे घटनास्थळी बचावकार्य वेगाने सुरू झालेलं असताना दुसरीकडे विमान अपघातामागचं नेमकं कारण काय असू शकेल? यावर मोठी चर्चा सुरू झाल्याचं दिसत आहे. मात्र, यादुर्घटनेनंतर अमेरिकेतील शेअर बाजारात मोठी घडामोडी पाहायला मिळत आहे.
Boing चे शेअर्स कोसळले
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या ताफ्यातील ७८७ बोईंग विमान कोसळण्याच्या घटनेमुळे आता थेट बोईंग विमान कंपनीच्या उत्पादनांच्या दर्जासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे. याचाच परिणाम म्हणून अमेरिकन शेअर बाजारात बोईंग कंपनीचे शेअर्स तब्बल ८ टक्क्यांनी कोसळले आहेत. हे शेअर्स १९६.५२ डॉलर्सपर्यंत खाली आल्याचं पाहायला मिळालं आहे.
दरम्यान, बोईंगसाठी या दुर्घटनेमुळे मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या काही काळापासून बोईंग विमान कंपनीच्या उत्पादनांवर मोठी चर्चा पाहायला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर कंपनीची घसरलेली पत व उत्पादनाचा वेग या दोन्ही बाबींवर कंपनीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात CEO केली ऑर्थबर्ग यांच्या नेतृत्वाखाली बोईंगनं नव्याने कामाला सुरुवात केली होती.
कसा झाला अहमदाबाद विमान अपघात?
भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दुपारी दीडच्या सुमारास अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानानं लंडनच्या दिशेनं टेकऑफ केलं होतं. मात्र, टेकऑफनंतर काही वेळातच हे विमान खाली कोसळलं. विमानतळाच्या नजीकच्या मेघानीनगर या निवासी भागात हे विमान कोसळलं. विमानात अपघातावेळी २४२ प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात १६९ भारतीय तर इतर विदेशी प्रवासी होते. याशिवाय १० क्रू मेंबर्स व दोन पायलट दुर्घटनेवेळी विमानात होते.
वैमानिकानं दिला MAYDAY चा संदेश
दरम्यान, विमान उड्डाणाची जबाबदारी असणारे वैमानिक सुमीत सभरवाल यांनी उड्डाणानंतर काही वेळातच MAYDAY अर्थात विमान अपघातासारख्या संकटकाळी पाठवण्यात येणारा संदेश एटीसी अर्थात एअर ट्रॅफिक कंट्रोलला पाठवला होता. मात्र, त्यानंतर लगेचच विमानाचा एटीसीशी संपर्क तुटला. हे विमान निवासी भागात कोसळल्यामुळे यात झालेली जीवित तसेच वित्तहानी मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.