भारतात दुर्मिळ खनिज चुंबकांच्या उत्पादनाला उत्तेजन म्हणून १,३४५ कोटी रुपयांच्या अनुदान योजनेसाठी आंतर-मंत्रालयीन सल्लामसलत सुरू आहे आणि दोन निवडक उत्पादकांना यातून प्रोत्साहन दिले जाण्याचे प्रस्तावित आहे, असे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी शुक्रवारी सूचित केले.
चीनने दुर्मिळ खनिज चुंबकांच्या निर्यातीवर निर्बंध लादल्यामुळे त्याच्या जागतिक पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या भारतासह विद्युत वाहनांच्या (ईव्ही) उत्पादकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
आंतर-मंत्रालयीन सल्लामसलत पूर्ण झाल्यानंतर हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवला जाऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. देशातील दोन उत्पादकांना या १,३४५ कोटी रुपयांच्या योजनेसाठी निश्चित करण्यात आले आहे, असे कुमारस्वामी यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव कामरान रिझवी म्हणाले की, दुर्मिळ खनिज ऑक्साईडचे चुंबकात रूपांतर करण्यासाठी दोन उत्पादकांना आवश्यक ती मदत मिळवूण देणारी ही १,३४५ कोटी रुपयांची ही उत्तेजन योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. ते म्हणाले, ‘आम्हाला चुंबकांमध्ये रस आहे. जो कोणी आम्हाला चुंबक देईल त्याला उत्तेजन दिले जाईल. आंतर-मंत्रालयीन सल्लामसलतीसाठी पाठवलेली पहिली रूपरेषा आहे. या कामी दोन उत्पादक निश्चित केले गेले आहेत.
अणुऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा सार्वजनिक उपक्रम ‘इंडियन रेअर अर्थ मॅग्नेट लिमिटेड’ हा भारतातील दुर्मिळ खनिजाचा एकमेव भांडार आहे. प्रस्तावित योजनेतून चुबंकाच्या उत्पादनाची सुविधा स्थापन करण्यासाठी गुंतवणूक सुलभ होणे अपेक्षित आहे. चीनने अलिकडेच महत्त्वाच्या धातूंच्या निर्यातीवर निर्बंध लादल्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये वाहन उद्योग आणि सेमीकंडक्टर चिप्सच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात व्यत्यय आला आहे.