वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सरलेल्या २०२४-२५ आर्थिक वर्षात भारतीय कंपन्यांचा एकत्रित नफ्याने महत्त्वाचा टप्पा गाठत १७ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर मजल मारली आहे. निफ्टीमधील आघाडीच्या ५०० कंपन्यांचा नफा ते सकल देशांतर्गत उत्पादनाचे (प्रॉफिट टू जीडीपी) गुणोत्तर हे ४.७ टक्के नोंदवले गेले आहे, असे मोतीलाल ओसवालने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालाने पुढे आणले.

देशांतर्गत भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपन्यांसाठी नफा ते जीडीपी गुणोत्तर हे ५.१ टक्क्यांहून अधिक असे १४ वर्षांचा उच्चांक गाठणारे आहे. अनेक प्रमुख क्षेत्रांमधील कंपन्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे नफा-जीडीपी गुणोत्तर वाढत आहे. गेल्या सात वर्षांपासून नकारात्मक योगदान देणारे दूरसंचार क्षेत्र हे सरलेल्या वर्षात सकारात्मक बनले. या वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या इतर क्षेत्रांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका (ज्यांनी गुणोत्तरात ०.०७ टक्के भर घातली), आरोग्यसेवा (०.०४ टक्के), ग्राहक (०.०४ टक्के), धातू (०.०३ टक्के) आणि पायाभूत सुविधा (०.२ टक्के) यांचा समावेश आहे.

मात्र, काही क्षेत्रांच्या नफा-जीडीपी गुणोत्तरातील वाट्यात ०.२८ टक्के घट झाली. तेल आणि वायू क्षेत्राची सर्वाधिक पीछेहाट झाली असून, त्यानंतर वाहन निर्मिती (०.०३ टक्के), सिमेंट (०.०२ टक्के), खासगी बँका (०.०१ टक्के) यांचा क्रमांक लागतो.

आव्हानात्मक वातावरण असूनही, निफ्टीतील आघाडीच्या ५०० कंपन्यांच्या नफ्यातील वाढीने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये वार्षिक आधारावर १०.५ टक्के अशी दुहेरी अंकातील वाढ नोंदवली, तर गेल्या पाच वर्षांत ती ३०.३ टक्क्यांच्या चक्रवाढ दराने वाढली आहे. देशांतर्गत आघाडीवर सार्वत्रिक निवडणुका त्या परिणामी सरकारी खर्चात झालेली घट आणि जागतिक अनिश्चिततेमुळे निर्यात घटल्याने पहिल्या सहामाहीत कंपन्यांची कामगिरी निराशानजनक राहिली.

देशांतर्गत कंपन्यांचे नफा-जीडीपी गुणोत्तर आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील ५ टक्क्यांवरून, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ५.१ टक्क्यांपर्यंत असे किंचित वधारले. सूचिबद्ध आणि असूचिबद्ध अशा दोन्ही कंपन्यांचा समावेश केल्यास हे गुणोत्तर आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील ६.३ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ७.३ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. मुख्यतः सूचिबद्ध कंपन्यांच्या नफ्यात जोमदार वाढ झाल्याने हे गुणोत्तर वधारले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निफ्टी-५०० मधील खासगी कंपन्यांमध्ये, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये नफा-जीडीपी गुणोत्तर २.८ टक्क्यांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहे, जे आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २.६ टक्क्यांवर होते. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये हे प्रमाण गेल्या वर्षीच्या १.८ टक्क्यांवरून किंचित कमी होऊन १.६ टक्क्यांपर्यंत खाली आले. दरम्यान, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ०.३१ टक्के हे असे सर्वोच्च गुणोत्तर नोंदवले, जे आधीच्या आर्थिक वर्षात ०.२९ टक्के होते.