नवी दिल्ली :नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) थर्ड पार्टी यूपीआय अ‍ॅप पुरवठादारांच्या (टीपीएपी) माध्यमातून पार पडणाऱ्या देयक व्यवहार संख्या मर्यादित करण्याच्या निर्णयाला डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे. यामुळे गूगल पे, फोन पे, पेटीएम यांसारख्या डिजिटल मंचांना मोठा दिलासा मिळाला.

फोन पे, गूगल पे आणि पेटीएम या डिजिटल मंचांच्या बँक खात्यांशी संलग्नतेच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) व्यवहार पार पडतात. एनपीसीआयने नोव्हेंबर २०२० मध्ये या डिजिटल मंचाच्या माध्यमातून पार पडणाऱ्या व्यवहार संख्येवर मर्यादा घालण्याची घोषणा केली होती. यूपीआयच्या माध्यमातून एकंदर पार पडणाऱ्या व्यवहारांच्या केवळ ३० टक्के व्यवहारांना डिजिटल मंचांच्या माध्यमातून परवानगी देणारा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यामुळे सर्व डिजिटल मंचाच्या माध्यमातून होणाऱ्या अगणित व्यवहारांवर मर्यादा येणार होती. एनपीसीआयने ही मर्यादा १ जानेवारी २०२१ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला होता.

करोनाकाळात डिजिटल व्यवहारांना मोठय़ा प्रमाणावर चालना मिळाली आणि तो क्रम निरंतर कायम आहे. विविध बँक खात्यांद्वारे मोबाइल फोनसारख्या एकाच माध्यमातून देयक व्यवहार पूर्ण करता येऊ शकणारी ‘यूपीआय’ ही अत्यंत सोपी, सुरक्षित व तात्काळ सुविधा एनपीसीआयद्वारे संचालित केली जाते.

‘फोन पे’चे मोठे योगदान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फोनपेच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्यात ४७.२६ टक्के तर गूगल पेच्या माध्यमातून ३४ टक्के व्यवहार पार पडले. तर पेटीएमच्या माध्यमातून १५ टक्के व्यवहार झाले आहेत. या तीनही डिजिटल मंचांनी एकत्रित सुमारे ९६ टक्के बाजार हिस्सा व्यापला आहे. तर व्हॉट्सअ‍ॅप पे, अ‍ॅमेझॉन पे आणि इतर डिजिटल मंचांचा सध्या नगण्य वाटा आहे.