मुंबई : मुख्यत: करोना टाळेबंदीच्या काळात भांडवली बाजार निर्देशांकांच्या डोळे दिपवणाऱ्या तेजीमुळे आकर्षित झालेल्या नवीन किरकोळ गुंतवणूकदारांचा शेअर बाजारावर विश्वास अजूनही टिकून राहिला असल्याने, ऑक्टोबरअखेरीस भारतातील डिमॅट खात्यांच्या एकत्रित संख्येने १०.४० कोटींचा अभूतपूर्व टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत (ऑक्टोबर २०२१) त्यात ४१ टक्के वाढ झाली आहे. केवळ समभागांतच नव्हे तर, सरकारी रोखे, बाँड्स, म्युच्युअल फंड, विमा आणि एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ) यांसारख्या साधनांमध्ये गुंतवणुकीसाठी डिमॅट खाते अनिवार्य ठरते.

गुंतवणुकीची प्रक्रिया कागदरहित हाताळली जाण्यासह, समभाग वा रोख्यांच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील जतनासाठी डिमॅट खाती उपयुक्त आहेत. भारतात सध्या कार्यरत असलेल्या एनएसडीएल आणि सीडीएसएल या दोन डिपॉझिटरी संस्था आहेत, ज्यांच्याकडे गुंतवणूकदारांना डिमॅट खाते उघडता येते. सीडीएसएल सात कोटी सक्रिय डिमॅट खात्यांसह देशातील सर्वात मोठी डिपॉझिटरी आहे. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवर निर्माण झालेला भू-राजकीय तणाव आणि वाढत्या महागाईमुळे जगभरातील बाजारांसह देशांतर्गत भांडवली बाजारात अस्थिरता असल्याने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला, त्या परिणामी गुंतवणूकदारांकडून नवीन डिमॅट खाती उघडण्याचा वेग कमी झाला. मात्र दीर्घकाळात बाजारात तेजी परतेल, असा आशावाद मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन – बँकिंग आणि विमा, संस्थात्मक इक्विटी) नितीन अग्रवाल यांनी व्यक्त केला.

वाढीचा वेग मंदावला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डिमॅट खात्यांची एकूण संख्या वाढत असली तरी चालू वर्षांत ऑगस्टपासून मात्र त्याला उतरती कळा लागली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये २६ लाख नवीन खाती उघडण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यात २० लाख, तर सरलेल्या ऑक्टोबर महिन्यात केवळ १८ लाख नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली. गेल्या वर्षी, ऑक्टोबर २०२१ मध्ये ३६ लाख डिमॅट खात्यांची नव्याने भर पडली. यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात सणासुदीच्या काळात बाजाराचे कामकाज केवळ १८ दिवस सुरू होते. आधीच्या सप्टेंबर महिन्यात २२ दिवस कामकाज सुरू राहिले, हेदेखील या महिन्यांमध्ये तुलनेने कमी डिमॅट खाती उघडली जाण्याचे कारण असावे.