मुंबई : देशाच्या बँक, वित्त आणि नव्या युगाच्या फिनटेक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मानाचा समजल्या जाणाऱ्या ‘एफई बेस्ट बँक्स’ पुरस्कारांचे शुक्रवार, १३ ऑक्टोबरला सायंकाळी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान तसेच कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यात वितरण होत आहे. इंडियन एक्स्प्रेस समूहातील ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’ या वित्तीय दैनिकाद्वारे आयोजित या सोहळ्यात, ‘नॅबफिड’चे अध्यक्ष के. व्ही. कामथ हे प्रमुख अतिथी असतील, तर इंडियन एक्स्प्रेस समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक गोएंका हेही उपस्थित असतील.

या पुरस्कार सोहळ्यात बंधन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर घोष यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, तर कोटक महिंद्र बँकेचे सह-व्यवस्थापकीय संचालक दीपक गुप्ता यांना ‘बँकर ऑफ द इयर’ने या पुरस्काराने गौरविण्यात येईल. शिवाय सर्वोत्तम सार्वजनिक, खासगी, परदेशी, स्मॉल फायनान्स बँक तसेच डिजिटल बँक ऑफ द इयर असे विविध गटांत पुरस्कार वितरित केले जातील. पुरस्कारार्थींची निवड एल ॲण्ड टीचे संचालक व समूह मुख्य गुंतवणूक अधिकारी आर. शंकर रमण, बेन कॅपिटलचे अध्यक्ष अमित चंद्रा, टीसीएसचे माजी उपाध्यक्ष एस. रामदुरई, आयस्पिरिट फाऊंडेशनचे संस्थापक शरद शर्मा, रिझर्व्ह बँकेचे माजी कार्यकारी संचालक बी. महापात्रा या मान्यवरांची निवड समितीने केली. नॉलेज भागीदार ‘ईवाय’ने या प्रक्रियेत त्यांना मदत केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तंत्रज्ञानाचा मानवी जीवनाच्या सर्वच अंगावर प्रभाव वाढला असून, तंत्रज्ञानानेच वित्तीय प्रणालीला प्रभावी आणि कार्यतत्पर बनविले असून, बँकिंग आणि पूरक सेवांमध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणला आहे. हे पाहता या पुरस्कार सोहळ्यात नव्या युगाच्या तंत्रज्ञानाधारित वित्तीय कंपन्या अर्थात विमा, गुंतवणूक, देयक व्यवहार, नियामक तसेच कर्जदात्या फिनटेक कंपन्यांना गौरविले जाणार आहे.