scorecardresearch

वित्तीय तूट दहा महिन्यांत ११.९ लाख कोटी रुपयांवर; वार्षिक अंदाजाच्या ६७.८ टक्क्यांवर

केंद्र सरकारला संपूर्ण आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी, तूट १७.५५ लाख कोटी रुपये सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) तुलनेत ६.४ टक्के मर्यादेत राखली जाणे अपेक्षित आहे.

Fiscal deficit, expenditure, revenue collection, economy
वित्तीय तूट दहा महिन्यांत ११.९ लाख कोटी रुपयांवर; वार्षिक अंदाजाच्या ६७.८ टक्क्यांवर

पीटीआय, नवी दिल्ली

केंद्र सरकारचे महसुली उत्पन्न आणि खर्च यातील दरी असणारी देशाची वित्तीय तूट एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ या दहा महिन्यांच्या कालावधीत ११.९ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. संपूर्ण चालू वित्त वर्षांसाठी सरकारने निर्धारित केलेल्या अंदाजाच्या तुलनेत हे प्रमाण ६७.८ टक्के आहे.

वर्षभरापूर्वी याच कालावधीत म्हणजेच आर्थिक वर्षांच्या पहिल्या दहा महिन्यांमध्ये वित्तीय तुटीचे प्रमाण तत्कालीन अंदाजाच्या तुलनेत ५८.९ टक्के राहिले होते. केंद्र सरकारला संपूर्ण आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी, तूट १७.५५ लाख कोटी रुपये सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) तुलनेत ६.४ टक्के मर्यादेत राखली जाणे अपेक्षित आहे.

एप्रिल ते जानेवारी या पहिल्या दहा महिन्यांत सरकारला करापोटी मिळालेले महसुली उत्पन्न वार्षिक तुलनेत १६.८८ लाख कोटी रुपये असे अर्थसंकल्पातील अंदाजाच्या प्रमाणात ८०.९ टक्के राहिले आहे. तर करोत्तर आणि करापोटी मिळालेले एकत्रित महसुली उत्पन्न १९.७६ लाख कोटी राहिले आहे. तर जानेवारीपर्यंत दहा महिन्यांत सरकारचा खर्च ३१.६७ लाख कोटी रुपये झाला आहे. जो संपूर्ण आर्थिक वर्षांसाठी अंदाजाच्या तुलनेत ७५.७ टक्के इतका आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२३ रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात आगामी आर्थिक वर्ष म्हणजेच २०२३-२४ या वर्षासाठी ५.९ टक्के वित्तीय तुटीचे लक्ष्य जाहीर केले आहे. तर आर्थिक वर्ष २०२५-२६ या आर्थिक वर्षात वित्तीय तुटीचे प्रमाण सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) तुलनेत ४.५ टक्क्यापर्यंत खाली आणण्याचा सरकारचा मानस आहे.

निर्गुंतवणुकीतून ३१ हजार कोटी

निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून केंद्र सरकारने एप्रिल ते जानेवारी दरम्यान ३१,१२३ कोटी रुपये उभे केले आहेत, जे ५०,००० कोटी रुपये या सुधारित उद्दिष्टाच्या ६२ टक्के राहिले आहेत. तर एप्रिल-जानेवारी या कालावधीत सरकारने बाजारातून १०.०५ लाख कोटी रुपयांचे कर्ज उभे केले आहे, जे आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या उद्दिष्टाच्या तुलनेत ते ८४ टक्के आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त ( Finance ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 11:42 IST