मुंबईः बटाट्याचा शुष्क बारीक कीस (फ्लेक्स) उत्पादक, पुरवठादार आणि निर्यातदार असलेल्या शिवाश्रित फूड्स लिमिटेडची प्रारंभिक सार्वजनिक भागविक्री (आयपीओ) शुक्रवार, २२ ऑगस्टला खुली होत आहे. ‘एनएसई इमर्ज’ मंचावर सूचीबद्धतेसाठी असलेल्या या समभागांसाठी प्रत्येकी १३५ रुपये ते १४२ रुपये किमतीवर गुंतवणूकदारांना बोली लावता येईल.

शिवाश्रित फूड्सला या आयपीओमधून ७०.०३ कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित आहे. हा निधी नवीन उत्पादन सुविधेच्या इमारतीच्या बांधकामासाठी, तसेच बॉयलर, ईटीपी संयत्र, पॉवर जनरेटर, सोलर पॅनेल आदी सामग्रीच्या खरेदीसाठी आणि नियोजित विस्तारासाठी खेळत्या भांडवलाच्या गरज अंशतः पूर्ण करण्यासाठी केला जाणार आहे. मार्क कॉर्पोरेट अॅडव्हायझर्सकडून व्यवस्थापित होत असलेली ही भागविक्री २६ ऑगस्ट २०२५ रोजी बंद होणार आहे.

कंपनीकडे शिवाश्रित, श्री आहार आणि फ्लेकर्स अशा तीन उत्पादन नाममुद्रा आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील रेडी-टू-इट खाद्यान्न आणि स्नॅक्स उत्पादकांना शिवाश्रितकडून बी२बी पद्धतीने दर्जेदार उत्पादनांचा पुरवठा केला जातो. पश्चिम उत्तर प्रदेशातील अलिगड येथे कंपनीची अत्याधुनिक बटाटा प्रक्रिया आणि उत्पादन सुविधा आहे. मोठ्या प्रमाणात उत्पादन क्षमतेसाठी कंपनी आणखी नवीन उत्पादन सुविधा स्थापणार आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये, कंपनीने १०४.६९ कोटी रुपयांच्या महसूलावर, १२.०५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे.