Gautam Singhania Email : रेमंड कंपनीचे मालक गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी हे दोघेही विभक्त झाल्यामुळे सध्या चर्चेत आहेत. दिवाळीनंतर गौतम सिंघानिया यांनी नवाजपासून वेगळे होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर गौतम सिंघानिया यांनी मौन पाळले होते. दरम्यान, नवाज मोदींनी अनेक आरोप केले आणि संपत्तीत ७५ टक्के वाटाही मागितला. याशिवाय वडील विजयपत सिंघानिया यांनीही एका मुलाखतीत आपली कटुता व्यक्त केली होती. कंपनीचे शेअर्स (रेमंड शेअर्स) सतत घसरत राहिले आणि रेमंडला सुमारे १७०० कोटी रुपयांचे बाजारमूल्य गमवावे लागले. आता गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या बोर्ड आणि कर्मचाऱ्यांना एक भावनिक ईमेल लिहिला आहे. यामध्ये त्यांनी रेमंडला आपल्या वैयक्तिक आयुष्यातील समस्यांवर परिणाम होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले आहे.
मी कंपनीला समर्पित
या ईमेलमध्ये रेमंडचे अध्यक्ष आणि एमडी गौतम हरी सिंघानिया यांनी लिहिले की, ते कंपनी आणि व्यवसायासाठी पूर्णपणे समर्पित आहेत. माझ्या वैयक्तिक आयुष्याच्या बातम्यांनी प्रसारमाध्यमे भरलेली आहेत. त्यामुळे माझ्या कुटुंबाची इज्जत जपण्यासाठी मला गप्प बसणेच बरे वाटले. मी फक्त तुम्हाला आठवण करून देण्यासाठी लिहित आहे की, मला अध्यक्ष आणि एमडी म्हणून माझी जबाबदारी पूर्णपणे समजली आहे आणि मी त्यासाठी समर्पित आहे. या कठीण काळातही मी तुम्हाला आश्वासन देतो की, कंपनीच्या कामकाजात कोणताही व्यत्यय येणार नाही.
हेही वाचाः नारायण मूर्ती अन् बिल गेट्सनंतर आता थरूर यांची कामाच्या तासांच्या वादात उडी; ‘हे’ विधान करत म्हणाले…
नवाजने मारहाणीचे आरोपही केले
नवाजने पती गौतमवर तिच्या आणि मुलीच्या हत्येचा आरोप केल्यानंतर हा मेल समोर आला आहे. सेटलमेंटसाठी नवाजने कंपनीच्या सुमारे १.४ अब्ज डॉलर्सच्या ७५ टक्के मालमत्तेवर दावा केला आहे. रेमंड ग्रुपची टेक्सटाईल आणि कपड्यांच्या क्षेत्रात मजबूत पकड आहे. याबरोबरच हा समूह देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत ग्राहक सेवा, रियल्टी आणि अभियांत्रिकी क्षेत्रातही काम करतो.
हेही वाचाः १०, २०, ५० लाख रुपये नव्हे, तर ‘या’ व्यक्तीने लग्नात खर्च केले ५०० कोटी
या ईमेलमध्ये आणखी काय लिहिले?
सिंघानिया यांनी या ईमेलमध्ये पुढे लिहिले की, तुम्हा सर्वांना माहिती आहे की रेमंड ग्रुपने गेल्या काही महिन्यांत सातत्याने प्रगती केली आहे. आमचे त्रैमासिक निकालही उत्साहवर्धक होते. अभियांत्रिकी क्षेत्रातील आमचा व्यवसाय दुपटीने वाढला आहे. याशिवाय आम्ही संरक्षण, एरोस्पेस आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातही प्रवेश करीत आहोत. त्यामुळे मी सर्व भागधारक, कर्मचारी, ग्राहक आणि भागधारकांना आश्वासन देतो की, आम्ही एकत्रितपणे कंपनीला पुढे नेऊ.