मुंबई : शिखराला भिडल्यानंतर आता सोन्याच्या किमतीतील स्थिरता आणि जागतिक अनिश्चिततेमुळे जून महिन्यात गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड अर्थात गोल्ड ईटीएफमध्ये २,०८ कोटी रुपयांचा नक्त ओघ राहिला. ही पाच महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (ॲम्फी) ताज्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात २९२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. तर त्याआधीच्या एप्रिलमध्ये ६ कोटी रुपये आणि मार्चमध्ये ७७ कोटी रुपयांचा निव्वळ निधी ‘गोल्ड ईटीएफ’मधून काढून घेण्यात आला होता. यासह, वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (जानेवारी-जून) गोल्ड ईटीएफमध्ये निव्वळ ८,००० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. यातून या श्रेणीतील व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) जूनअखेर ४ टक्क्यांनी वाढून ६४,७७७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जी मे महिन्यात ६२,४५३ कोटी रुपये होती.
जागतिक पातळीवरील अस्थिर वातावरण आणि सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा गोल्ड ईटीएफला पसंती दिली आहे. स्थिर उत्पन्न बाजारपेठेतील अस्थिरता आणि सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे. आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओला पुनर्संतुलित करण्याचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा आकर्षक पर्याय आहे, असे मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्च इंडियाचे वरिष्ठ विश्लेषक – व्यवस्थापक संशोधन नेहल मेश्राम म्हणाले.
जूनमधील गुंतवणूक ही जानेवारीनंतरची सर्वाधिक मोठी मासिक गुंतवणूक होती, त्यावेळी गोल्ड ईटीएफने ३,७५१ कोटी रुपये आकर्षित केले होते. तसेच जूनमध्ये दोन नवीन गोल्ड ईटीएफ बाजारात दाखल झाले आहेत, ज्यांनी एकत्रितपणे ४१ कोटी रुपये जमवले. नवीन ईटीएफच्या माध्यमातून माफक निधी जमा झाला असला तरी, एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्तेत भर घातली आहे, असेही मेश्राम म्हणाले.
गेल्या काही वर्षांत सोन्याने त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसह, गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि फोलिओ खात्यांमध्ये सातत्याने होणारी वाढ त्याच्या आकर्षकतेचा पुरावा आहे. मे महिन्यात गोल्ड ईटीएफमधील फोलिओ क्रमांक २.८५ लाखांनी वाढून ७६.५४ लाख झाले आहेत. हे सोन्याशी संबंधित निधींकडे गुंतवणूकदारांचा वाढता कल दर्शवते. या फंड प्रकारामधील फोलिओंची संख्या मे महिन्यातील ७३.६९ लाखांवरून, जून महिन्यात २.८५ लाखांनी वाढून ७६.५४ लाख झाली. हे आकडे गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांच्या वाढत्या पसंतीला दर्शवितात.
गोल्ड ईटीएफ म्हणजे काय?
गोल्ड ईटीएफ हे म्युच्युअल फंडांच्या युनिट्सप्रमाणे शुद्ध सोन्यातील गुंतवणुकीचे युनिट्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जतन करतात आणि डिमॅट खात्यात साठवले जाते. भौतिक धातूंमध्ये गुंतवणूक करण्याइतकाच हा सरळ, सुरक्षित व सोपा पर्याय आहे. गोल्ड ईटीएफचे प्रत्येक युनिट अत्यंत उच्च शुद्धतेच्या सोन्याच्या मूल्याइतकेच असते. इतर कोणत्याही ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंड-ईटीएफ’प्रमाणे गोल्ड ईटीएफदेखील भांडवली बाजारात सूचिबद्ध आणि निरंतर खरेदी-विक्री व्यापारास खुले असते. गोल्ड ईटीएफमध्ये कमीत कमी ४५ रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. सोन्यात गुंतवणुकीसाठी गोल्ड ईटीएफ एक सुरक्षित पर्याय समजला जातो. गोल्ड ईटीएफ हा म्युच्युअल फंडच असतो.