मुंबई : सोन्याच्या वाढत्या किमती या मौल्यवान धातूंच्या खरेदीस इच्छुक असलेल्यांना चिंतेच्या बनल्या असल्या, तरी किमतीचा हा चढता पारा गुंतवणूकदारांसाठी मात्र खूपच फलदायी ठरला आहे. विशेषतः अमेरिकेच्या आयात शुल्काच्या वृत्तामुळे तेजाळलेले सोने पाहता, जुलैमध्ये गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्समधील (ईटीएफ) नवीन गुंतवणुकीचा ओघ ४० टक्क्यांनी घटून १,२५६ कोटी रुपयांवर मर्यादित राहिला. तरी याच महिन्यांत गुंतवणूक मोडून नफा गाठीशी बांधून घेणाऱ्या गुंतवणूकदारांचे प्रमाणही उच्च राहिले.

दागिने आणि नाणी या रूपातील सोने खरेदीपेक्षा म्युच्युअल फंडांनी प्रस्तुत केलेला गोल्ड ईटीएफ हा सोय, सहजता, किफायतशीरता आणि मुख्य म्हणजे सुरक्षिततेची हमी असलेला गुंतवणूक पर्याय अलीकडे लोकप्रिय ठरत आहे. सरलेल्या जुलैमध्ये नफावसुलीसाठी या गुंतवणुकीतून अनेक जण बाहेर पडले असले तरी, सलग तिसऱ्या महिन्यांत ‘गोल्ड ईटीएफ’मधील गुंतवणुकीत सकारात्मक वाढीचा क्रम कायम राहिला आहे.गेल्या दोन वर्षांत सोन्याचे भाव अतिशय वेगाने वाढले आहेत. परिणामी गुंतवणूकदारांमध्ये खरेदी किमतीबाबत घालमेल वाढली आहे. अनेक गुंतवणूकदार जागतिक पातळीवरील वाढत्या अस्थिरतेमुळे त्यांच्या पोर्टफोलिओत सोन्याला स्थान देत, खरेदीस इच्छुक आहेत. मात्र सध्याच्या वाढत्या किमतीमुळे सोने खरेदी टाळण्याचे प्रमाणही मोठे आहे, असे जर्मिनेट इन्व्हेस्टर सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोसेफ म्हणाले.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (ॲम्फी) आकडेवारीनुसार, जुलैमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये १,२५६ कोटी रुपयांचा निव्वळ प्रवाह आला, जो आधीच्या जून महिन्यांत नोंदवलेल्या २,०८१ कोटी रुपयांपेक्षा खूप कमी आहे. विद्यमान वर्षात मे महिन्यात २९२ कोटी, एप्रिलमध्ये ६ कोटी रुपये आणि मार्चमध्ये ७७ कोटी रुपयांचा निव्वळ प्रवाह दिसून आला होता. खरेदीदारांसह, वरच्या भावावर विक्री करणारेही वाढले आहेत. परिणामी गोल्ड ईटीएफमध्ये २०२५ या कॅलेंडर वर्षात (जानेवारी ते जुलै) ९,२७७ कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक झाली आहे.

ईटीएफच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत ४.४ टक्क्यांनी वाढ झाली, जी जुलैमध्ये मागील महिन्यातील ६४,७७७ कोटी रुपयांवरून ६७,६३४ कोटी रुपयांवर पोहोचली. याचा अर्थ जुलैमध्ये १,२५६ कोटी रुपयांचे गुंतवणूकदार जसे पुढे आले, त्याचप्रमाणे १,६०१ कोटी रुपयांची विक्री करून नफा कमावणारेही होते. तरीही जुलै महिन्यात गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूकदार खाती अर्थात ‘फोलिओं’ची संख्या २.१५ लाखांनी वाढून ७८.६९ लाख झाली. जून महिन्यात हीच संख्या ७६.५४ लाख होती.

जागतिक पातळीवरील व्याजदर अस्थिरता आणि भू-राजकीय जोखीम यासारख्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, शाश्वत मूल्य असलेल्या सोन्याचे आकर्षण कायम असल्याचे दिसून येत आहे, असे मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्च इंडियाच्या वरिष्ठ विश्लेषक व्यवस्थापक नेहल मेश्राम म्हणाले.

सोन्याच्या किंमती वाढल्या असल्या तरी, जागतिक स्तरावर मध्यवर्ती बँकाकडून सुरू असलेल्या सोने खरेदीमुळे आणि शेअर बाजारातील अस्थिरतेच्या चिंतेमुळे सोने खरेदी सध्या फायदेशीर ठरताना दिसत आहे.